आधुनिक काळात प्रगत राष्ट्र म्हणून घ्यावयाचे असल्यास आणि पुंड राष्ट्रांच्या गोतावळ्यात सुरक्षित राहायचे असल्यास अत्यावश्यक ठरतील अशा दोन महत्त्वपूर्ण चाचण्या भारताने रविवार, २४ ऑगस्ट या एकाच दिवशी यशस्वीरीत्या पार पाडल्या. या दोन्ही चाचण्या वरकरणी परस्परांशी संबंधित नाहीत; पण दोन्हींच्या तंत्रज्ञानातील व्यामिश्रता उच्च कोटीची असल्यामुळे आणि भारताच्या तंत्रज्ञ-शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांतून त्या यशस्वी झाल्यामुळे दखलपात्र आणि कौतुकपात्र ठरतात.
भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिन भाषणात नमूद केलेल्या बहुचर्चित आणि व्यापक ‘सुदर्शन चक्र संरक्षण प्रणाली’ विकासाच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने गगनयान मोहिमेतील अत्यंत मोलाच्या इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट म्हणजेच, अवकाशकुपी पृष्ठभागावर अलगद सोडण्याच्या प्रक्रियेची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. या चाचणीत पॅराशूटच्या साह्याने अवकाशकुपीचे अवत्वरण किंवा वेग कमी करण्याची प्रक्रिया समाविष्ट असते. या दोन्ही चाचण्या अनुक्रमे डीआरडीओ आणि इस्रो या संस्थांनी घेतल्या असल्या, तरी दोन्हींमध्ये या संस्थांचे परस्पर सहकार्यही महत्त्वाचे होते.
इस्रोच्या चाचणीमध्ये डीआरडीओबरोबरच हवाईदल, नौदल आणि तटरक्षकदलाचा सक्रिय सहभाग होता. क्षेपणास्त्र बचाव प्रणाली ही सर्वस्वी उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या संकेत आणि संपर्कांवर अवलंबून असते. त्यामुळे ती विकसित करण्यात डीआरडीओला इस्रोची मदत लागतेच. दोन्ही चाचण्या आपापल्या मोहिमांमधील पहिला आणि आश्वासक टप्पा ठरतो. त्यांच्या यशस्वितेबद्दल संबंधित संस्थांचे तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, तसेच सरकारही अभिनंदनास पात्र ठरते. अवकाश आणि सामरिक क्षेत्रातील अत्युच्च सामग्रीबाबत इतर देशांवर अवलंबून राहण्याचे दिव सरू लागले आहेत.
अमेरिकेसारखा सहकारी देशही डोनाल्ड ट्रम्पसारख्यांच्या आमदानीत पूर्णपणे बेभरवशाचा ठरू शकतो. इतर देशांबाबतही कमी-अधिक प्रमाणात हेच वास्तव ठरू लागले आहे. आज परिस्थिती अशी आहे की अमेरिका आणि चीन या दोन महासत्ता (वेगवेगळ्या कारणांसाठी) भारताला मदत करण्याच्या स्थितीत नाहीत. युरोपीय देश किंवा इस्रायलच्या मदतीस मर्यादा आहेत. रशियाची मदत घ्यायची तर विद्यमान परिस्थितीत त्यासाठी सोसावे लागणारे नुकसान फायद्यापेक्षा अधिक ठरते. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ ही केवळ घोषणा न राहता, ती सवय आचरणात आणणे गरजेचे आहे. हवाई संरक्षण प्रणाली आणि गगनयान चाचण्यांनी ही प्रगती अधोरेखित केली.हवाई संरक्षण प्रणालीअंतर्गत दोन क्षेपणास्त्रे आणि एक लेझर अस्त्राचा एकात्मिक रचनेमध्ये अंतर्भाव आहे.
एकाच वेळी तीन लक्ष्यांचा वेध या यंत्रणेअंतर्गत घेतला गेला. साधारण ३० किलोमीटरच्या टप्प्यात विविध वेगांची क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन यांचा वेध घेण्याची या यंत्रणेची सिद्धता आहे. हवाई संरक्षण प्रणाली ही बहुस्तरीय आणि अत्यंत व्यामिश्र रचना असते. यात विविध क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रे आणि इतर आयुधे असतात. सध्या अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांकडे अशा प्रणालीची विकसन क्षमता आहे. त्यामुळे ज्यांना ती हवी असते, असे देश या तीन देशांवर अवलंबून असतात. भारताकडे सध्या रशियन बनावटीची एस-४०० क्षेपणास्त्र बचाव प्रणाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानी प्रतिहल्ले रोखण्यासाठी या प्रणालीचा खूप फायदा झाला होता. रशियाने आणखीही प्रारूपे भारताला देऊ केली आहेत. पण यांतील धोके आणि जोखीम ओळखून पंतप्रधान मोदी यांनी २०३५पर्यंत ‘सुदर्शन चक्र’ प्रणाली विकसित करण्याला प्राधान्य दिले ते अतिशय योग्य आहे.
‘इस्रो’ची गगनयान अवत्वरण चाचणीही अत्यंत महत्त्वाची आहे. अंतराळात मानवी मोहिमा घेण्याचे अनेक टप्पे असतात. यातील शेवटचा टप्पा म्हणजे अंतराळवीरांना सुखरूप पृथ्वीवर, जलपृष्ठावर उतरवणे. अवकाशातून पृथ्वीच्या वातावरणात शिरकाव कोणत्याही मोहिमेतील अत्यंत जोखमीचा मानला जातो. मोहिमेचे सारथ्य इस्रोकडे असले, तरी या अखेरच्या टप्प्यामध्ये हवाईदल, नौदल, तटरक्षकदल आणि डीआरडीओ यांची एकात्मिक आणि एकल सिद्धताही महत्त्वाची असते. या सर्वांच्या प्रयत्नांतून ही चाचणी यशस्वी झाली. अशा प्रकारे यशस्वी चाचणी घेणारा भारत हा जगातील चौथाच देश ठरला, यावरून तिचे महत्त्व लक्षात येते. तीन किलोमीटर उंचीवरून हवाईदलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने अंतराळवीरांची प्रतिकुपी सोडली. ही स्थिती अंतराळ मोहिमेच्या अंतिम टप्प्यासारखी असते. तेवढ्या उंचीवरून वेगाने झेपावणाऱ्या कुपीचे अवत्वरण करण्यासाठी पॅराशूटचा वापर झाला. प्रत्येक टप्प्यावर संबंधित यंत्रणांची कसोटी लागली. संरक्षणसिद्धतेची अशी दुहेरी गगनभरारी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली.