‘आकार, अक्कल, आवाज…’ या अग्रलेखात (११ जुलै) इथल्या व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे. बहुसंख्य अर्थनिरक्षर असलेली इथली प्रजा आपण जपानला मागे टाकून कशा प्रकारे जगातली सगळ्यात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनलो याचे ढोल बडवत असते. पण त्याच वेळी जपानच्या तुलनेत तुटपुंज्या असलेल्या आपल्या दरडोई उत्पन्नाबाबत मात्र मौन बाळगते. असो. वास्तविक अग्रलेखात उल्लेख असलेल्या, ‘एनवीडिया’ कंपनीची घोडदौड अचंबित करणारी अशीच आहे आणि या सगळ्यात आपण कुठे आहोत हे तपासून बघितले तर फारसे वाईट वाटत नाही. त्यापेक्षा वाईट या गोष्टीचे वाटते की तशी काही देदीप्यमान प्रगती करण्यासाठी आपण करत नसलेल्या प्रयत्नांबद्दल. इथल्या सरकार आणि प्रशासनासाठी शिक्षण आणि उच्च तंत्रशिक्षण हे विषय तोंडी लावण्यापुरतेच असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आपली गुंतवणूक गेली कित्येक वर्षे जीडीपीच्या १.५ टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणजे दरवर्षी आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या शोधनिबंधांची बोटावर मोजण्याइतपत संख्या, त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत आपली विद्यापीठे कायमच पिछाडीवर असतात. त्यामुळे आइन्स्टाइनच्या उक्तीप्रमाणे ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची हे तरुणांमध्ये रुजत नाही. इतिहासात जास्त न रमता वर्तमानात काय करायला हवे हे जोपर्यंत आपण नव्या पिढीवर बिंबवत नाही तोपर्यंत आपण ती स्वप्ने पाहायची नाहीत.

● सागर माने, (राजाचे कुर्ले) सातारा</p>

लाज वाटण्याचे कारण नाही…

‘आकार, अक्कल, आवाज!’ हे संपादकीय (११ जुलै) वाचले. परंतु अमेरिकेतील ‘एनवीडिया’ कंपनीचे बाजार भांडवल चार लाख कोटी डॉलर आहे, याची आपल्याला (भारतीयांना) लाज वाटण्याचे अजिबात कारण नाही. आपल्या कंपन्यांची तुलना पाकिस्तानशी करणे हे एक वेळ बढाईखोरपणाचे म्हणता येईल; पण आपण अमेरिकन कंपन्यांची बरोबरी करू शकत नाही यात कमीपणा कसला? जवळपास ११०० वर्षे गुलामगिरीत गेल्यानंतर आपली अर्थव्यवस्था अशा परिस्थितीत असणे स्वाभाविक आहे. तिला चालना देण्याचे काम जोर पकडू शकत नाही, याचे मूळ कारण योग्य नेतृत्वाचा अभाव व दारिद्र्य हे आहे!

● अरविंद करंदीकर, तळेगाव दाभाडे

ठोकशाहीकडे प्रवास

‘गुंड, असंस्कृत, मुजोर, उद्दाम, मस्तवाल, गणंग इत्यादी…’ हा ‘अन्वयार्थ’ (११ जुलै) वाचला. कायद्याद्वारे स्थापित झालेल्या संविधानाची शपथ घेऊन आमदार झालेल्या संजय गायकवाड यांना कायद्याचा विसर पडला आहे की हा सत्तेचा उन्माद आहे? जणू काही राज्यभरातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार, लाचखोरीचा निपटारा करण्यात प्रशासन व न्यायालयालाही अपयश येत असल्याने ती जबाबदारी आपलीच, अशा थाटात हे महाशय ‘ढाई किलो का हाथ’ या फिल्मी स्टाइलने हे परिवर्तन आणू इच्छितात! लोकशाही राज्य व्यवस्थेत ही न्यायिक पद्धत भूषणावह नाही. हा तर लोकशाहीचा ठोकशाहीकडे जाणारा प्रवास आहे.

● कुमार बिरदवडे, छत्रपती संभाजीनगर

यातील अपराध्यांना शासन व्हावे

शहापुरातील एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत भिंतीला लागलेले रक्ताचे डाग पाहून तेथील विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी करण्यात आल्याची बातमी वाचली. हे उदाहरण आधुनिक म्हणवून घेणाऱ्या लोकांच्या प्रतिगामित्वाचा दाखला देण्यास पुरेसे आहे. इयत्ता आठवी व त्यापुढील विद्यार्थिनींना मासिक पाळी येणे हा निसर्गाचा नियम आहे. पण तरीही भिंतीवर रक्ताचे डाग आढळून आले म्हणून सरसकट अनेक विद्यार्थिनींना कपडे उतरवायला लावत तपासणी करणे हे सर्वथा धिक्कारार्हच होय. या सगळ्या प्रकरणात मग पोलिसांनीही उतरणे, संबंधित मुख्याध्यापिकेला अटक आणि बडतर्फी, पाच जणांना अटक आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी हे सगळे घडून आले. या सगळ्यात संस्थेने शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी १० जुलै रोजी शाळेला तसेच शहापूर पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाबद्दलची माहिती घेतली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने योग्य ती कारवाई करावी अशा सूचनाही दिल्या, हे त्यातल्या त्यात दिलासा देणारे! त्या शाळेतील एखाद्या मुलीने मासिक पाळीचे रक्त भिंतीला चुकून पुसलेही असेल तर ते सारे प्रकरण संवेदनशीलपणे, वेगळ्या प्रकारे व बाहेर वाच्यता होऊ न देता हाताळताही आले असते. पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्या समस्या हाताळण्यात शालेय व्यवस्थापनाला आलेले हे घोर अपयशच असून त्याबद्दल संबंधित अपराध्यांना कठोर शासन झालेच पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● राजेंद्र घरत, वाशी, नवी मुंबई</p>