एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने मिळवलेले पहिलेवहिले विश्वविजेतेपद हे मैदानाइतक्याच – किंबहुना अधिक – मैदानाबाहेरील कित्येक संघर्षगाथांचा कळसाध्याय ठरते. १९ वर्षांखालील मुलींसाठीची ही पहिलीच टी-२० विश्वचषक स्पर्धा होती. भारतीय संघातील कित्येकींचा आंतरराष्ट्रीय मैदानांवर खेळण्याचाही (स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाली) हा पहिलाच अनुभव होता. तरीदेखील महिलांच्या सीनियर संघाला जे आजवर साधले नाही, ते या मुलींनी पहिल्याच प्रयत्नात करून दाखवले. काही दिवसांपूर्वी महिलांच्या आयपीएलसाठी (डब्ल्यूआयपीएल) फ्रँचायझी मालक निश्चित झाले, लवकरच लिलावही होईल. महिला क्रिकेटच्या दृष्टीने ही स्पर्धा क्रांतिकारी ठरेल, असे सांगितले जात आहे. त्यात फारसे तथ्य नाही. फ्रँचायझी क्रिकेट कितीही लोकप्रिय झाले आणि प्रभावी वाटले, तरी त्या यशाला मैदानांवरील यशाची सर नाही. मैदानावरील पुरुष संघांची जगज्जेतेपदे येथील क्रिकेट संस्कृतीसाठी कशा प्रकारे परिणामकारक ठरली, याची प्रचीती १९८३ आणि २००७ नंतर आलेली आहेच. फ्रँचायझी क्रिकेट कधी सुरू झाले आणि त्यातील मालक मंडळी कोण हा तपशील इतिहासाच्या दृष्टीने तेथेही गौण ठरतो. तसाच तो महिला क्रिकेटच्या बाबतीतही ठरेल.
या मुलींची वाटचाल सोपी नव्हती. प्रत्यक्ष स्पर्धा हा खरे तर या वाटचालीतला अंतिम टप्पा होता. या संघाची कर्णधार शफाली वर्मा हीच सुस्थिर क्रिकेटपटू. ती काही वर्षांपासून सीनियर संघातून खेळते आहे. या स्पर्धेनंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेमध्ये महिलांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्याही संघात शफाली आहे. बाकीच्या मुली लवकरच सीनियर संघात दिसू लागतील. पण येथवर येईपर्यंत लिंगभाव भेद, आर्थिक चणचण, संधींची उणीव, सुविधांचा अभाव, पुरस्कर्त्यांचा अभाव, संघटकांचा मुर्दाडपणा, सामाजिक अवहेलना अशी अनेक अडथळय़ांची शर्यत इतर क्षेत्रांतील मुलींप्रमाणे या मुलींना आणि त्यांच्या जवळच्यांना धावावी लागली. यांपैकी कोणी अर्चना देवी असते. तिच्या आईने पतीनिधन, पुत्रनिधन आणि समाजाकडून होणाऱ्या हेटाळणीनंतरही आपल्या मुलीच्या क्रिकेटप्रेमाला आडकाठी न घालता, तिच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न केले. एखाद्या सोना यादवचे कामगार वडील कारखान्यात दोन पाळय़ांमध्ये काम करून पैसा उभा करतात. त्रिशा गोंगाडीच्या वडिलांनी भद्राचलम जिल्ह्यातील स्वत:ची व्यायामशाळा आणि नंतर जमीन विकली, जेणेकरून त्यांना आपल्या मुलीला हैदराबादसारख्या अधिक क्रिकेट सुविधा असलेल्या शहरात पाठवता यावे. कुणाकडे सामन्यात खेळण्यासाठी प्रशिक्षकाने मागितलेले २० रुपयेही नसायचे, कुणाला केवळ मुलांच्या क्रिकेट अकादमीमध्ये खेळवण्यास प्रशिक्षकाने नकार दिलेला असतो, तर एकीच्या वडिलांना संपूर्ण शहरात मुलीला क्रिकेट शिकवू शकेल असा प्रशिक्षकच सापडलेला नसतो. या संघर्षांतील घामाचे, अश्रूंचे मोल फ्रँचायझी क्रिकेटमधून येणाऱ्या पैशाने समजणार नाही.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकमेव पराभव वगळता बाकीच्या सामन्यांमध्ये भारतीय मुलींची कामगिरी उत्कृष्ट झाली. आजवर विशेषत: महिला क्रिकेट विश्वचषकांमध्ये सीनियर संघाने उपान्त्य वा अंतिम फेरीपर्यंत मजल मारूनही जेतेपद मिळू शकलेले नव्हते. केवळ उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचणे ही एक बाब असते. प्रत्यक्ष त्या दिवशी निर्णायक विजय मिळवणे ही पूर्णतया स्वतंत्र बाब ठरते. त्या दिवशीचा विजय शारीरिक क्षमता व कौशल्यापेक्षाही अधिक मानसिक कणखरपणाचा असतो. पहिल्याच स्पर्धेतील पहिल्याच अंतिम सामन्यात पोहोचूनही आपल्या मुलींची एकाग्रता भंगली नाही वा त्या कोणत्याही दबावाखाली आल्या नाहीत. या मन:स्थैर्याचे श्रेय भारताच्या मुख्य प्रशिक्षक नूशिन अल खदीर आणि इतर सहायक मंडळींनाही द्यावे लागेल. ‘एका प्रवासाला सुरुवात झाली,’ असे नूशिन आणि शफाली यांनी सामन्यानंतर सांगितले. या प्रवासात आर्थिक मदत मिळेल; परंतु खरे आव्हान अपेक्षापूर्तीचे असेल. जगज्जेत्या ठरेपर्यंत या संघातील अनेकींची नावेही फारशी ठाऊक नव्हती. परंतु त्या अनामतेच्या कवचातून त्या आता बाहेर पडल्या आहेत. यांतील काही सीनियर संघात जातील. तेथील अपेक्षांचे दडपण, दुसरीकडे फ्रँचायझी क्रिकेटमुळे प्राधान्याबाबत गोंधळ ही स्वतंत्र आव्हाने राहतील. फ्रँचायझी क्रिकेटच्या उदयानंतर भारतीय पुरुष संघाला दुसरे टी-२० जगज्जेतेपद मिळू शकलेले नाही, या वास्तवापासूनही या मुली बोध घेतीलच! बीसीसीआयने या संघासाठी पाच कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. त्याचे स्वागत. पण अशी मदत शिखर सर केल्यानंतर देण्याऐवजी, त्या प्रवासातील अगणित पथिकांना सुरुवातीपासूनच मिळत गेली तर ते अधिक अर्थपूर्ण ठरेल. प्रत्येक यशोगाथेमागे दहा अपयशगाथा असतात, ते प्रमाणही घटू शकेल. सुवर्णपर्वाची सुरुवात तेव्हाच खऱ्या अर्थाने होईल.