scorecardresearch

Premium

खेळ, खेळी खेळिया :  चला, ‘बकरा बकरा’ खेळू!

भारताचे शेर बहादूर खेळाडू अपेक्षेपेक्षा फारच लवकर गळपटले आणि उपान्त्यपूर्व फेरीही न गाठता गारद झाले

hockey
पाकिस्तान हॉकी संघ भारतात खेळणार(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

सिद्धार्थ खांडेकर

१९८० मध्ये आपण ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतर आपली कामगिरी उत्तरोउत्तर खालावतच गेली आहे. त्यानंतरच्या ४२ वर्षांचा इतिहास खेळाचा नाही, तर खेळखंडोब्याचाच आहे..

IND vs ENG 4th Test Match Result Updates in marathi
IND vs ENG : भारताच्या युवाशक्तीचा विजय; चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली
7 great batsmen who never averaged 50
जगातले सात महान फलंदाज ज्यांची कसोटीतली सरासरी ५० पेक्षा कमी, तरीही सर्वांचे लाडके; दोन दिग्गज भारतीयांचाही समावेश
loksatta analysis why india lost world cup final against australia
ऑस्ट्रेलिया ३ – भारत ०… विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये भारत ऑस्ट्रेलियासमोर का ढेपाळतो?
Indian tennis team wins Davis Cup match during tour of Pakistan
भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय; अपेक्षित कामगिरीसह जागतिक गट ‘१’मध्ये प्रवेश

घरच्या मैदानावर हॉकी विश्वचषक असूनदेखील भारताचे शेर बहादूर खेळाडू अपेक्षेपेक्षा फारच लवकर गळपटले आणि उपान्त्यपूर्व फेरीही न गाठता गारद झाले. स्पर्धा संपल्यानंतर संयुक्त नववा क्रमांक हे भारतीय हॉकीच्या विद्यमान दर्जाचे निदर्शक खचितच नाही. स्पर्धेआधीच्या क्रमवारीनुसार आपण सहावे होतो. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपण ऐतिहासिक ठरावे असे कांस्यपदक जिंकले होते. यंदा जगज्जेत्या ठरलेल्या जर्मनीला आपण त्या वेळी हरवले होते. जुलै २०२१ नंतर जानेवारी २०२३ पर्यंत असे काय घडले, ज्यामुळे आपली कामगिरी ढेपाळली हे तपासावे लागेल. पण तसे करण्याची इच्छाशक्ती किंवा सबुरी किंवा क्षमता विद्यमान हॉकी राष्ट्रीय संघटकांकडे नसावी. तशी ती एरवीही फारशी ज्ञात नव्हतीच. पण गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी प्रशिक्षक बदलणे हाच कोणत्याही समस्येवरील जालीम उपाय इथल्या हॉकी व्यवस्थेला वाटत आला आहे. त्यातून परदेशी हॉकी प्रशिक्षकांच्या रोजगार हमी योजनेपलीकडे आपल्या हॉकीची वाटचाल अशीही होत नव्हतीच. स्पेन, जर्मनी, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियातून प्रशिक्षक येथे आणले गेले. त्यांतील काही खरोखर त्या योग्यतेचे होते, काहींनी पार माती केली. त्यामुळे इथे आलेल्या परदेशी प्रशिक्षकांचा सरासरी कार्यकाळ एक ते दीड वर्षांपलीकडे गेलाच नाही.

ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहॅम रीड हे यांतले सर्वात अलीकडचे उदाहरण. त्यांचा ‘बायो-डेटा’ फार लखलखीत होता अशातला भाग नाही. परंतु त्यात ‘ऑलिम्पिक पदका’चा ठसठशीत उल्लेख आहे, तो नाकारता कसा येईल? एखाद्या वस्तूचे मोल ती किती दुर्मीळ आहे यावरही ठरत असते. हॉकीतील ऑलिम्पिक पदक ही अशीच दुर्मीळ बाब ठरू लागली होती. इतकी, की इतर खेळांमध्ये १९९६ पासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पदक मिळू लागले आणि पदकासाठी हॉकीवर अवलंबून राहण्याची सवयही मोडीत निघाली. ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवलेली आठपैकी सात सुवर्णपदके ही आपल्या आजी-आजोबांच्या जमान्यातली ठरतात. उरलेले एक सुवर्णपदक (मॉस्को १९८०) आई-वडिलांनी पाहिले-अनुभवलेले. त्यानंतर चार दशकांनंतर भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळणे ही खरोखर कौतुकास्पद बाब होती. ती तशी का ठरते, यासाठी थोडा इतिहास धांडोळावा लागेल. हॉकी स्टिक हाताळण्याचे मनगटी कौशल्य आणि पळण्यातले चापल्य या गुणद्वयीच्या जोरावर मूळ ब्रिटिशांच्या या खेळात भारतीयांनी विक्रमांचे इमले रचले. त्या सुवर्णयुगाला पहिली घरघर लागली पाकिस्तानच्या उदयानंतर. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारताला हरवून पाकिस्तानने पहिले सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतरच्या स्पर्धामध्ये, अनेकदा हा संघ भारताला भारी ठरत आला. १९७६ च्या माँट्रिएल ऑलिम्पिकमध्ये प्रथमच नैसर्गिक हिरवळीऐवजी कृत्रिम हिरवळीवर हॉकी खेळवले जाऊ लागले. त्याच्या एक वर्ष आधी आपण नैसर्गिक हिरवळीवरील आपले एकमेव जगज्जेतेपद पटकावले होते. १९७६ मध्ये कृत्रिम हिरवळ किंवा अ‍ॅस्ट्रोटर्फचा वापर सुरू झाला आणि भारतीय हॉकीचा नूर बिघडला. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीतले अखेरचे सुवर्णपदक जिंकले, पण त्या विजयाची झळाळी बहिष्कार पर्वामुळे झाकोळली होती. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड (१९७६ ऑलिम्पिक विजेते),  ब्रिटन, नेदरलँड्स,यांचे हॉकी संघ त्या स्पर्धेत खेळलेच नाहीत. स्पेन, पोलंड, सोव्हिएत रशिया हे त्यातल्या त्यात बरे संघ खेळले. त्यानंतरच्या विश्वचषक  ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारताची कामगिरी सामान्य, सुमार आणि अतिसुमार या तीनच दर्जामध्ये हेलकावत राहिली. याउलट पाकिस्तानने नवीन पृष्ठबदलाशी तुलनेने चकटन जुळवून घेतले आणि त्यांची विजयधडाडी सुरू राहिली. नव्वदच्या दशकाअखेरीस हॉकीतील ऑफ-साइडचा नियम जवळपास पूर्णतया शिथिल करण्यात आला. त्यामुळे ड्रिबल करत चेंडू प्रतिस्पर्च्याच्या क्षेत्रात नेण्याच्या कौशल्याला फारसा अर्थ राहिला नाही, कारण पल्लेदार लांब पासेस पुरवत विशेषत: युरोपियन संघांनी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. पाकिस्तानचा ऱ्हास हा साधारण तेव्हापासून सुरू झाला.

१९८० च्या दशकात भारतात हॉकी युग अस्ताला निघाले होते आणि १९८३ मधील अनपेक्षित जगज्जेतेपदामुळे कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप व लोकप्रियतेच्या बाबतीत क्रिकेटने हॉकीने मागे टाकले. पुढे या दोन्ही निकषांवर दोन खेळांमधील तफावत रुंदावतच गेली. तरी या मातीतून हॉकी हा खेळ नामशेष झाला नाही. अगदी अलीकडेपर्यंत हॉकीची गुणवत्ता भारताच्या विविध भागांमध्ये निपजत होती. संपूर्ण पंजाब, लखनऊ-भोपाळमधील मुस्लीमबहुल मोहल्ले, ओडिशा-झारखंडमधील आदिवासी पट्टे, मुंबईतील ख्रिस्ती गावठाणे, बंगळूरु-पुणे भागांतली कन्टोन्मेंट्स, झाशी-ग्वाल्हेरमधील मध्यमवर्गीय वसाहती ही भारतीय हॉकीची ‘कॅचमेंट’ क्षेत्रे असायची. आता ती बऱ्यापैकी आटलेली असली, तरी हॉकीस्टिक धरू इच्छिणाऱ्या युवकांची संख्या अपेक्षेइतकी घटलेली नाही, उलट ती (क्रिकेटइतकी नसली तरी) वाढते आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मिळालेले कांस्यपदक या गुणवत्तेचेच निदर्शक असते. कोणी कितीही नावे ठेवली, तरी पंजाबमधील गुणवत्ता आणि नवीनबाबू पटनायकांच्या ओडिशा सरकारचे पाठबळ यांच्यामुळेच अत्यंत निराशाजनक कालखंडावर मात करून पुरुष आणि महिला भारतीय हॉकी संघ पाकिस्तानप्रमाणे मुख्य वर्तुळाच्या बाहेर फेकले गेले नाहीत. आज परिस्थिती अशी आहे, की हॉकी या खेळाचा भारत हाच प्रमुख आश्रयदाता ठरतो. इतर आघाडीच्या संघांच्या बाबतीत हे म्हणता येत नाही. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँड्स, जर्मनी या देशांमध्ये हॉकी मर्यादित प्रमाणात लोकप्रिय असले, तरी या खेळाला तेथे भारतासारखे भक्कम व्यावसायिक पाठबळ नाही. या देशांमध्ये मुळातच क्रीडा संस्कृती, पायाभूत सुविधा वगैरे असतातच. त्यामुळे अलीकडे जवळपास पूर्णत: फिटनेसवर निर्णायक ठरणाऱ्या या खेळामध्ये हे देश आजही पहिल्या पाचात असतात.

गेल्या साधारण चार वर्षांमध्ये वेगवान हालचाली, फिटनेस आणि डावपेचांच्या बाबतीत भारतीय हॉकी संघाने विलक्षण प्रगती केली, याचे श्रेय काही प्रमाणात तरी रीड यांना द्यावे लागेल. टोक्योमध्ये भारताने स्पेन, अर्जेटिना, ब्रिटन या संघांना सहज हरवले. जर्मनीविरुद्ध पिछाडी भरून काढत विजय मिळवला. ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियमविरुद्ध भारतीय संघ काही काळ आघाडीवरही होता. ती स्पर्धा कोविड निर्बंधांमुळे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवली गेली होती. यंदाचा विश्वचषक भुवनेश्वर आणि रौरकेलातल्या खचाखच भरलेल्या मैदानांत खेळवला गेला. या प्रेक्षकसंख्येचा परिणाम भारताच्या खेळावर झालाच. इंग्लंडविरुद्ध बरोबरी आणि न्यूझीलंडविरुद्ध पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव हे मानसिक स्तर उंचावता न आल्यामुळे घडले. आता भारताच्या काही खेळाडूंना रीड यांचे काही निर्णय व धोरणे पटली नव्हती असे कारण पुढे केले जात आहे. खेळाडूंच्या मताला किती किंमत द्यायची याविषयी आपल्या हॉकी संघटकांमध्ये गोंधळ नेहमीच दिसून येतो. मागे मुंबईकर सेड्रिक डिसुझांसारख्या उत्तम प्रशिक्षकाच्या हकालपट्टीमागील एक कारण, ते हिंदीतून संवाद साधू शकत नाही असेही दिले गेले होते. परदेशी प्रशिक्षक येणार तेव्हा ते येथील गुणवत्तेची सांगड त्यांच्या देशातील क्रीडा व तंदुरुस्ती मूल्यांशी घालण्याचा प्रयत्न करणार हे ओघानेच आले. आपल्या बाबतीत मेख अशी, की गेली काही वर्षे आपल्याकडे हॉकीचा कारभार पाहणाऱ्या संघटनेतच दोन तट पडून कोर्टकचेऱ्या झाल्या होत्या. संघटनात्मक निवडणुकीचे निकष न पाळल्यामुळे परवाच्या विश्वचषक स्पर्धेचेोजमानपदही आपल्या हातून गेलेच होते. असली बेशिस्त आणि अजागळपणा आपल्याला जगज्जेते आणि ऑलिम्पिकजेते बनण्यापासून नेहमीच परावृत्त करत राहणार. रीड यांची समजूत घालून, संघातील सीनियर हॉकीपटूंशी त्यांचा संवाद घडवून हे प्रकरण मिटवायला हवे होते. आता नवीन प्रशिक्षक, नवीन संकल्पना, नवे रुसवे-फुगवे हे चक्र त्यामुळे थांबेलसे दिसत नाही. ऑलिम्पिक पदकानेही या चक्रात फरक पडला नाही, हे अधिक क्लेशकारक आहे. गुणवत्तेऐवजी दरवेळी मोठय़ा स्पर्धेतील पराभवाबद्दल नवीन बकरा शोधून त्याचा बळी देणे यापलीकडे येथील हॉकी व्यवस्थेच्या शहाणिवा विस्तारलेल्या नाहीत. अशाने भारतीय हॉकी हल्लीच्या पाकिस्तानी हॉकीच्या वाटेने जाऊन एक दिवस नामशेष होईल!    sidhharth.khandekar@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian hockey team performance in hockey world cup 2023 zws

First published on: 04-02-2023 at 01:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×