लढाऊ विमानाचे जमिनीवरील धावपट्टीवरून उड्डाण, अवतरण आणि समुद्रात विमानवाहू नौकेच्या धावपट्टीवर तशीच प्रक्रिया घडणे यात फरक आहे. जमिनीवर पुरेशी जागा असते. सतत हालचाल करणाऱ्या नौकेवर धावपट्टीची लांबी कमी असते. उड्डाणासाठी विशिष्ट रचना केली जाते. वेगात परतणाऱ्या विमानांना सुरक्षितपणे उतरता यावे म्हणून खास प्रणाली असते. नौकेवर विमानाचे उड्डाण आणि अवतरण हे कठीण कार्य मानले जाते. भारतीय नौदलात पहिल्या ‘लढाऊ वैमानिक’ म्हणून दाखल होणाऱ्या सबलेफ्टनंट आस्था पुनिया यांचे कौशल्य त्यामुळेच वेगळे ठरते. विशाखापट्टणम येथील आयएनएस देगामध्ये द्वितीय प्राथमिक हॉक रूपांतरण अभ्यासक्रमाच्या पदवीदान सोहळ्यात त्यांना ‘विंग्ज ऑफ गोल्ड’ या प्रतिष्ठित पदवीने सन्मानित करण्यात आले. नौदलाच्या लढाऊ विमानांच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आघाडीवर तैनात लढाऊ विमानांचे सारथ्य करण्यापूर्वी लष्करी वैमानिकांना प्रगत हॉक या प्रशिक्षणार्थी विमानावर प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यानुसार २० वर्षीय पुनिया या आणखी वर्षभर प्रगत हॉक विमान चालवतील. त्यानंतर नौदलाच्या विमानवाहू नौकेवर कार्यरत मिग – २९ के अथवा लवकरच समाविष्ट होणाऱ्या राफेल – एम ही लढाऊ विमाने उडविण्यास त्या सज्ज होतील. त्यानंतर कोणत्याही कामगिरीवर जाऊ शकणाऱ्या लढाऊ नौदल-वैमानिकांच्या ताफ्यात त्यांचाही समावेश झालेला असेल. तोवर, त्या ‘सबलेफ्टनंट’ न राहाता ‘लेफ्टनंट’ झालेल्या असतील.
उत्तर प्रदेशातील मेरठ हे आस्था यांचे जन्मगाव. कुटुंबातील कुणीही सैन्य दलात नाही. तंत्रज्ञान क्षेत्रात बी.टेक. पदवी घेऊन त्यांनी शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे नौदलात प्रवेशाचा पर्याय निवडला. केरळच्या कण्णनूर जिल्ह्यातील एळिमला येथील भारतीय नौदल प्रबोधिनीत प्रारंभीचे प्रशिक्षण घेतले. पुढे पिलाट्स पीसी-७ एमके दोन या विमानाच्या मूलभूत उड्डाण प्रशिक्षणासाठी त्या तेलंगणातील दुंडीगल येथील हवाई दल प्रबोधिनीत गेल्या. या ठिकाणी लष्करी वैमानिकांच्या महत्त्वाकांक्षेला आकार देणारा पहिला शिक्षणक्रम त्यांनी पूर्ण केला. दुसऱ्या टप्प्यात त्यांची रवानगी विशाखापट्टणमच्या ‘आयएनएस देगा’ या युद्धनौकेवर करण्यात आली, तेथे त्यांनी हॉक एजेटी अर्थात प्रशिक्षणार्थी विमान चालवले. कौशल्य, वेग आणि अचूकतेच्या बळावर अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला.
भारतीय सैन्य दलांनी महिलांना सर्व क्षेत्रे खुली केली आहेत. हवाई दलात महिला आधीपासून लढाऊ वैमानिकाच्या भूमिकेत आहेत. नौदलातही २०१९ मध्ये, लेफ्टनंट शिवांगी सिंह यांचा समावेश जरी ‘वैमानिक’ म्हणून झाला असला तरी त्यांचे काम हे ‘लढाऊ वैमानिका’पेक्षा निराळे होते. तेव्हापासून नौदलाने महिलांना टेहेळणी विमाने आणि हेलिकॉप्टर वैमानिक तसेच नौदल हवाई कार्यवाही अधिकारी म्हणून समाविष्ट केले आहे, त्यापैकी लेफ्टनंट शिवांगी सिंह या पहिल्या ठरल्या होत्या. त्यापुढला टप्पा ‘लढाऊ वैमानिक’ म्हणून नौदलात महिलांच्या समावेशाचा असणार होता, तो गाठणाऱ्या सबलेफ्टनंट आस्था पूनिया या पहिल्या ठरणार असल्या तरी पुढल्या काळात त्या एकमेव निश्चितच नसतील. भारतीय नौदलाकडे आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य या दोन विमानवाहू नौका आहेत. पुनिया यांनी सर्व आव्हानांवर मात करून नौदलात महिला लढाऊ वैमानिकांच्या नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवली आहे.