‘बिहाना दीदी’ हे ओदिशातल्या खेडोपाडी राहणाऱ्या महिलांनी डॉ. स्वाती नायक यांना दिलेले नाव, ही खरे तर त्यांच्या कामाची, कोणत्याही राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय पुरस्कारापेक्षा मौल्यवान ठरणारी पावती! ‘बिहाना’ म्हणजे बियाणे. पावसाने ओढ दिल्यावरही १०५ दिवसांत तरारणारे ‘सहभागी धान’ हे तांदळाचे बियाणे बिकसित करणाऱ्या पथकाच्या प्रमुखपदी डॉ. नायक होत्याच; पण या धानाचा प्रसार करण्यासाठी आणि लाभ घेण्यासाठी ओदिशातल्या महिला शेतकऱ्यांची संघटना बांधण्यातही त्यांचा पुढाकार होता. अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ‘वल्र्ड फूड प्राइझ फाउंडेशन’ या बिगरसरकारी संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा ‘नॉर्मन बोरलॉग पुरस्कार’ यंदा (२०२३ साठी) डॉ. नायक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या कृषी संशोधक-संघटकांना दिला जातो आणि त्याचे स्वरूप १० हजार डॉलर (सुमारे ८.३२ लाख रु.), मानपत्र आणि डॉ. बोरलॉग यांच्या चित्राची प्रतिकृती असे असते.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: डॉ. भाऊसाहेब झिटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नॉर्मन बोरलॉग’ हे नोबेल-मंडित कृषीशास्त्रज्ञ असले तरी हल्ली त्यांचे नाव घेताच कान टवकारतात.. काही कपाळांवर आठय़ाही पडत असतील.. ‘जीएम’ बियाण्यांचे ते जनक! पण बोरलॉग यांच्या नावाने पुरस्कार देताना ‘जीएम’चे आजचे व्यापारीकरण नव्हे तर सुधारणेची खरी कळकळ लक्षात घ्यावी, हे पथ्य त्यांचा वारसा चालवण्याचा दावा करणाऱ्या संस्थेमार्फत पाळले जाते. त्यामुळेच पर्यावरणनिष्ठ कामाला या पुरस्कारासाठी प्राधान्य मिळते. डॉ. स्वाती नायक यांनी २०१० मध्ये आणंद इथल्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल मॅनेजमेंट’मधून पदव्युत्तर पदवी घेतली, त्यानंतर कधीही- कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीसाठी त्यांनी काम केलेले नाही. ‘एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा’च्या समन्वयक म्हणून आंध्र प्रदेशच्या दुर्गम भागांत त्यांनी काम केले, त्यानंतर कटक येथील आंतरराष्ट्रीय तांदूळ संस्थेत (आयआरआरआय) दक्षिण आशियाई बियाणे विकास प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून त्या आल्या. तेव्हापासून ‘सहभागी धान’वर काम सुरू झाले आणि या बियाण्याचा लाभ महिलांनी अग्रक्रमाने घ्यावा, यासाठी डॉ. नायक यांनी प्रयत्न केले. ‘वल्र्ड फूड प्राइझ फाउंडेशन’तर्फे अव्वल कृषी-संशोधकांना ‘वल्र्ड फूड प्राइझ’, कृषीविकासासाठी अतुलनीय कार्य करणारे नेते अथवा संस्थांना ‘डॉ. नॉर्मन बोरलॉग मेडॅलियन’, तर तरुण कृषी- शास्त्रज्ञांना ‘डॉ. नॉर्मन बोरलॉग फील्ड प्राइझ’ असे तीन पुरस्कार दिले जातात त्यांपैकी पहिल्या पुरस्काराचा मान एम. एस. स्वामीनाथन, व्हर्गीस कुरियन, बी. आर. बारवाले तसेच अन्य तिघा अनिवासी भारतीय शास्त्रज्ञांना १९८७ पासून मिळाला आहे. पण २०१२ पासूनच सुरू झालेल्या ‘फील्ड प्राइझ’ विजेत्यांतही भारतीय अधिक आहेत. पश्चिम बंगालमधील भूजलावर संशोधन करणाऱ्या आदिती मुखर्जी (२०१२) आणि ‘धनशक्ती’ हा बाजरीचा पूर्णत: जैवबलित (बायोफोर्टिफाइड) पौष्टिक वाण २०१४ मध्येच विकसित करणारे डॉ. महालिंगम गोविंदराज (२०२२) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. नायक तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत. आजवर केवळ कॅनडाच्या शास्त्रज्ञांना दोनदा (२०१३ व २०१६) तर अमेरिका, चीन, तुर्की, बेल्जियम, रवान्डा, बेनिन व बांगलादेश येथील शास्त्रज्ञांना एकेकदा हा पुरस्कार मिळाला आहे.