गिरीश कुबेर  

‘एडीआर’ या संस्थेच्या  कामामुळे सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल आला आणि एखादा बांध फुटल्यावर भसाभसा चिखल वाहू लागावा तसं झालं..

घरात पाऊल टाकल्या टाकल्या कोणती एखादी गोष्ट नजरेत भरत असेल तर ती म्हणजे घुबडं. चांदीचं घुबड. खऱ्या सोन्याच्या वर्खाचं घुबड. स्फटिकातलं घुबड. चंदनाचं घुबड. अतिशय गोंडस असं बालघुबड. एक घुबड तर पदवी-स्वीकारताना विद्वान घालतात तशा पायघोळ झग्यातलं. चेहऱ्यावर प्राध्यापकी भाव. एकात बुद्धाच्या मागे असतं तसं झाड आणि त्यावर श्री. – सौ. घुबड बसलेले. पलीकडच्या फांदीवर एक मांजर. इतकंच काय पण सोफ्याच्या पाठीच्या पट्टीवर कापसापासनं बनवलेलं अत्यंत गोंडस घुबड. समोरच्या टेबलावर भलामोठा टेबललँप. त्या दिव्याच्या वळत्या खांबाच्या मानेवर घुबड. भिंतीवर एक छानसं पेंटिंग. अर्थातच घुबडाचं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कमालीचे निरागस. घुबड भिंतीवर. कपाटांवर. कपाटात. पुस्तकांच्या फडताळात. फ्रिजच्या मॅग्नेटमध्ये. अशी सगळया जगातनं वेचून आणलेली घुबडंच घुबडं. त्यांची संख्या साधारण पाचशे-साडेपाचशेच्या घरातली.

जगदीप चोक्करांशी बाकी काही चर्चा व्हायच्या आधीच, आगत-स्वागत व्हायच्याही आधी मी घुबडांनाच हात घातल्यानं ते जाम खूश झाले. पत्नी किरण यांना त्यांनी मारलेल्या हाकेतून हा आनंद जाणवत होता. ‘चला, घुबडांविषयी प्रेमानं बोलणारं कोणीतरी तरी घरी आलं,’ अशी काहीशी ही भावना. आमच्याही घरात अनेक घुबडप्रेमी आहेत हे ऐकून त्यांना बरं वाटलं.

यावेळच्या दिल्ली फेरीत चोक्कर यांच्या घरी गप्पा ठरल्या होत्या. त्यांची सुरुवात ही अशी घुबडानं झाली. त्यांना म्हटलं या विद्वान, पंडिती पक्ष्याचं मराठीतलं नाव फारच खरखरीत आहे उच्चारायला. ते म्हणाले हिंदीनं तर वाट लावलीये या पक्ष्याची. इंग्रजीतल्या ‘ऑऊल’चं हिंदीत उल्लू झालं आणि मग पाठोपाठ आले उल्लू के पठ्ठे, उल्लुमशाल वगैरे. त्यांनाही या हुशार पक्ष्याचा हा वाचिक अपमान सहन होत नव्हता. हा एकमेव पक्षी आहे जो उडताना पंखाचा जराही आवाज होत नाही आणि जो ३६० अंशात आपली मान वळवू शकतो वगैरे वगैरे उभयतांस माहीत असलेल्या घुबडगुणांची उजळणी झाली.

हेही वाचा >>> बुकमार्क : ती वीसेक आणि आताची दहा वर्षे!

हा काळ दिल्लीत रम्य असतो. आकसून टाकणारा गारवा गेलेला असतो आणि घाबरवून टाकणारा उन्हाळा सुरू व्हायचा असतो. रस्त्यारस्त्यातल्या बागा नुसत्या रंगीबेरंगी फुलांनी बहरून गेलेल्या. त्यात निवडणुकांची घोषणा (एकदाची) झालेली. पण तरी म्हणावी अशी लगबग दिसत नव्हती. केंद्रातला सत्ताधारी पक्षाचा खरं तर आत्मविश्वास सर्वांगानं नुसता फुललाय. दिल्लीतल्या बागांसारखा. पण हा स्टेट बँकेच्या बाँड प्रकरणातला निकाल आला आणि अकाली पावसात वेली-फुलांनी माना टाकाव्या तसं भाजपचं झालं. संपूर्ण दिल्लीत न्याहारीच्या बैठकांपासनं मध्यरात्रीपर्यंत रंगणाऱ्या कॉकटेल पाटर्य़ात सध्या तरी दोनच विषय आढळले. आता आणखी काय काय आणि किती उघडं करावं लागणार हा एक. आणि दुसरा म्हणजे याचा परिणाम.

जगदीप चोक्कर यांच्याकडे गप्पा मारायला जायचा उद्देशच तो होता. त्यांनी आणि त्यांच्या ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक राइट्स’ ऊर्फ ‘एडीआर’ या संस्थेनं तर हे सगळं घडवून आणलं.  त्यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं स्टेट बँकेला तो ऐतिहासिक आदेश दिला आणि एखादा बांध फुटल्यावर भसाभसा चिखल वाहू लागावा तशी ही रोख्यांची मैली गंगा चहुबाजूंनी वाहू लागली. निवडणुकीत राम इतका प्रकर्षांनं समोर असतानाही ही रोखे-गंगा इतकी मैली असेल आणि मुख्य म्हणजे तिचं हे स्वरूप कधी उघड करायची वेळ येईल असं कोणाला वाटलंच नसणार.

‘‘कोणाला काय.. आम्हालाही तसं कधी वाटलं नाही’’, ही चोक्कर यांची प्रतिक्रिया. साधारण २५ वर्षांपूर्वी एडीआर स्थापन झाल्यापासनं ही संघटना राजकीय प्रक्रियेत पारदर्शीपणा यावा यासाठी लढतीये. चोक्कर अहमदाबादला आयआयएममध्ये प्राध्यापकी करत असताना त्यांचे सह-प्राध्यापक प्रा. त्रिलोचन शास्त्री वगैरेंच्या डोक्यात या कामासाठी अशी एखादी संस्था काढावी अशी कल्पना आली. माणसं जोडली जाऊ लागली. प्रा. शास्त्री अमेरिकेत असताना तिथल्या विद्यापीठात शिकवत असलेले त्यांचे मित्र, अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे हे यात सहभागी झाले. आणखीही काही मान्यवर पुढे आले आणि बघता बघता या संस्थेचं काम सुरू झालं. चोक्कर लुधियानातल्या एका आयटी कंपनी प्रमुखाबाबत सांगत होते. या तरुणाची स्वत:ची कंपनी आहे. चांगला व्यवसाय आहे. पण तो एडीआरच्या कामात मनापासनं सहभागी झालाय. म्हणजे किती, तर या संस्थेच्या खटल्यातली सगळी संगणकीय कामं तो स्वत:च्या कंपनीमार्फत करतो. प्रसंगी हातातली व्यवसायाची कामं बाजूला ठेवून द्यायला तो कमी करत नाही. ‘‘आमची ही संस्था या अशा झपाटलेल्यांमुळे  सुरू आहे’’, असं चोक्कर सांगतात.

हेही वाचा >>> बुकबातमी : उत्सवाच्या पलीकडचा रॉबर्ट फ्रॉस्ट! 

या झपाटलेपणाचं पहिलं यश या संस्थेला स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षांत मिळालं. निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मतदारांपुढे उघड केली जावी यासाठी २००२ साली त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहितार्थ एक याचिका दाखल केली आणि पुढच्याच वर्षी सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेत याबाबतचा आदेश जारी केला. आता निवडणुकांतल्या उमेदवारांची शैक्षणिक-सांपत्तिक-गुन्हेगारिक स्थिती वगैरे तपशील आपल्यासमोर येतो तो एडीआरच्या प्रयत्नांमुळे ! हे असले उद्योग करायचे, लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या तर त्यासाठी खर्चही फार असणार..

पण न्यायालयातल्या बुद्धिकौशल्यासाठी एरवी लाखो रुपये आकारणारे प्रशांत भूषण, वृंदा ग्रोवर किंवा शाम दिवाण यांच्यासारखे वकील एडीआरकडून एक रुपयाही घेत नाहीत. एडीआरच्या कार्यालयात तर अगदी एमबीए वगैरे झालेले तरुण आहेत कामाला. जेमतेम पगारावर ते काम करतात. ‘‘बाकी कंपन्या त्यांना आमच्या तिप्पट-चौपट पगार सहज देतील’’, चोक्कर म्हणाले. त्यांना म्हटलं संस्थेत काम करणाऱ्यांचेही काही आवडते-नावडते पक्ष असतीलच ना..! ‘‘अर्थातच आहेत. पण आम्ही व्यवस्थेशी लढतोय.. राजकीय पक्षांशी नाही. त्यामुळे सत्तेवर हा आला आणि तो गेला तरी आमच्या परिस्थितीत, मानसिकतेत काहीच फरक पडत नाही.’’

मध्येच चहा आला. किरण चोक्कर आल्या आणि घुबडंही आली. तुमची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता घुबडांना तुम्ही अशुभ वगैरे मानायला हवं.. माझ्या या विधानावर जगदीप म्हणाले.. अरे यार, लक्ष्मी का वाहन माना जाता है वो..! ‘‘म्हणजे त्यामुळे तुम्हाला तुमचे परिचित घुबड प्रेमामुळे श्रीमंत मानत असतील..’’, या माझ्या वाक्यावर किरण चोक्कर यांची प्रतिक्रिया : ‘‘हाँ.. लक्ष्मी का वाहन है वो.. मगर उस के लिये ये घर सिर्फ पार्किंग लॉट.. लक्ष्मी को कही और छोडा..’’ यावर चोक्कर खळखळीत हसले. 

बरोबर आहे. स्टेट बँकेच्या रोख्यात लपलेली लक्ष्मी या पार्किंग लॉटमधल्या वाहनामुळेच समोर आली..

girish.kuber@expressindia.com

@girishkuber