‘आक्रमक पद्धतीने बचाव हेच आपल्या पक्षाच्या यशाचे गमक आहे. आता तर आपल्या माजी प्रवक्त्यांचाच बचाव करण्याची पाळी आपल्यावर आली आहे. तेव्हा कसलाही मुलाहिजा न बाळगता विरोधकांवर तुटून पडा’ पक्षाच्या माध्यम विभागाच्या प्रमुखाचे हे उद्गार ऐकून हजर असलेल्या सर्व प्रवक्त्यांमध्ये चैतन्य पसरले. ते बघून प्रमुख आणखी उत्साहात येत म्हणाले, ‘ती अब्राहम लिंकनने केलेली लोकशाहीची व्याख्या ठेवा बाजूला.
आपली व्याख्या साधी व सरळ आहे.
आपल्या विचारासाठी आपल्या विचाराच्या लोकांकडून चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही. त्याला अनुसरूनच आरतीताईंची शिफारस आपण न्यायवृंदाकडून करवून घेतली. याचे जोरकसपणे समर्थन करताना नीतिमत्तेचा वगैरे फार विचार करायचा नाही. पक्षीय विचार महत्त्वाचा. काँग्रेसचे खासदार राहिलेले व नंतर न्यायमूर्ती झालेले बहरुल इस्लामचे उदाहरण आपण शोधलेच. आणखी जुने संदर्भ धुंडाळा. काही नावे मिळतीलच. ती व्यक्ती अल्पसंख्याक असली तर उत्तमच.’ हे ऐकताच काही प्रवक्ते गूगलवर जाऊन भारतीय न्यायसंस्थेचा इतिहास चाळू लागले. त्यातला एक मात्र अस्वस्थ होता. तो हळूच म्हणाला, ‘आपण इस्लामचे उदाहरण दिल्यावर लोक प्रतिप्रश्न करताहेत.

काँग्रेसने शेण खाल्ले म्हणून तुम्हीही खाणार का?’ हे ऐकताच प्रमुख जाम भडकले. ‘अरे ते प्रश्न विचारणारे दिवटे काहीही टीका करू देत. आपल्याला न्यायव्यवस्थेत आपल्या विचाराचे ‘साठे’ करून ठेवायचे आहेत. इतकी वर्षे सत्तेबाहेर राहिलो. या व्यवस्थेकडून होणारे अनेक घाव सहन केले. आता विरोधकांवर वार करण्याची वेळ आलीय. तेव्हा त्या शेणाबिणाकडे लक्ष देऊ नका. कुणी जास्तच नडला तर श्रावणीत शेण खातातच की, तसाही सध्या श्रावण सुरू आहे असे थातूरमातूर उत्तर देऊन मोकळे व्हा. निर्लज्जच म्हणतील ना! म्हणू देत. मात्र न्यायव्यवस्थेत आपल्या विचाराचा शिरकाव करण्यासंदर्भात कसलीही तडजोड नाही म्हणजे नाही’ यावर कुणीच काही बोलले नाही, मात्र तो मगाशी प्रश्न विचारणारा अस्वस्थ होता.

धाडस करून तो बोललाच. ‘मग आपल्यात व काँग्रेसमध्ये फरक उरतो कुठे?’ हे ऐकताच प्रमुख चिडलेच. ‘अरे, तुला प्रवक्ता केले कुणी? हा भलताच मागास व जुन्या विचाराचा दिसतो. तुम्ही आणखी काही वर्षे कार्यकर्ता म्हणून काम करा. तेव्हाच तुम्हाला आताचा पक्ष कळेल. आता तुम्ही प्रश्न विचारायचा नाही.’ मग काही काळ बैठकीत शांतता पसरली. शांततेचा भंग करत पुन्हा प्रमुख म्हणाले, ‘आरतीताईंच्या समर्थनार्थ आपल्या विचारांच्या वकिलांची फौज मैदानात उतरवा. सगळ्यांना भगवे टिळे लावून ठिकठिकाणी पत्रपरिषदा घ्यायला सांगा. त्यांचे आईवडील जरी परिवारातील असले तरी त्या कशा निष्पक्ष न्यायदाता ठरू शकतील, हे ठणकावून सांगा.’ यावर एका सुरात साऱ्यांनी होय असे उत्तर देताच ते सुखावले.

‘लोकशाही प्रभावीपणे राबवायची असेल तर ही व्यवस्था आपल्या ताब्यात हवीच. यात सध्या असलेले व आपल्याला अनुकूल झालेले न्यायनिवाडाकार काही बोलणार नाहीत. त्यांनी त्यांचे काम केले. तेही आपल्या सांगण्यावरून. म्हणून त्यांचा बचाव आपल्यालाच करायचा आहे, हे पक्के लक्षात ठेवा. एकदा का ही पक्षीय विचाराची व्यक्ती नेमण्याची पद्धत रूढ झाली की विरोधक आपोआपच शांत होतील. चला जा व लागा कामाला’ बैठक संपताच त्यातल्या एकाने बाहेर निघाल्यावर आरतीताईंना फोन करून सारा वृत्तांत कथन केला. ते ऐकून एक मोठा सुस्कारा टाकत त्या शपथ घेतल्यावर विरोधकांना कसे ठेचता येईल यावर विचार करू लागल्या.