महेश सरलष्कर
कर्नाटक भाजपने जिंकले तर मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या अन्य तीनही राज्यांमध्ये निवडणूक लढवणे भाजपला सोपे जाऊ शकेल.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी संपेल. महिना-दीड महिने प्रचाराची रणधुमाळी सुरू होती, अखेरच्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला. त्यांनी बंगळूरुमध्ये रोड शो केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही रोड शो केले. काँग्रेसकडून प्रियंका गांधी-वाड्रा यांनीही रोड शो केले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सोनिया गांधी यांचीही हुबळीमध्ये जाहीर सभा झाली. भाजप व काँग्रेसच्या तारांकित प्रचारकांनी कर्नाटक पिंजून काढले. जनता दल (धर्मनिरपेक्ष) या प्रादेशिक पक्षाच्या देवेगौडा, कुमारस्वामी या नेत्यांनीही प्रचार केला. कर्नाटकमधील तिहेरी लढतीत या तीनही पक्षांना बहुमताची अपेक्षा आहे. सध्या कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. या राज्यामध्ये एकाच पक्षाला सलग सत्ता मिळत नाही, ही परंपरा भाजपला मोडून काढायची आहे. त्यांना सलग दुसऱ्यांदा कर्नाटक राज्यावर कब्जा करायचा आहे.
गुजरातमध्ये भाजपला अभूतपूर्व विजय मिळाला, तिथे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री व मंत्री बदलले. नव्या चेहऱ्यांना संधी दिली. तिथे अपेक्षित यश मिळाले. कर्नाटकमध्ये भाजपने आधीच मुख्यमंत्री बदलला होता, त्यामुळे पुन्हा बदलला गेला नाही. येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली होती. बोम्मई यांच्या पाठीशी भाजपचे केंद्रीय नेतृत्व असल्याचे दिसले. कर्नाटकमध्ये गुजरात प्रारूप पूर्णपणे लागू करण्याचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा इरादा दिसला. इथे पन्नासहून अधिक नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली गेली. त्यामध्ये बरेच व्यावसायिक आहेत. भाजपचे लक्ष नेहमी भविष्याकडे असते असे म्हणतात. हा पक्ष दूरगामी विचार करतो. त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये सतत भाकरी फिरवत राहतो. कर्नाटकमध्येही भाजपला भाकरी फिरवायची असावी. त्यांनी प्रदेश भाजपमध्ये तरुण व नवे चेहरे आणून नवी पिढी तयार करण्याची प्रक्रिया हाती घेतली असे म्हटले जाते. कर्नाटकमध्ये भाजपला दुसऱ्यांदा सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री कोण असेल हे अजून भाजपने सांगितलेले नाही. भाजप नेहमी मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असल्याने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महत्त्वाचा नसावा. कर्नाटकमध्ये बोम्मई मुख्यमंत्री असले तरी, इथली निवडणूक मोदींचा चेहरा समोर ठेवून लढवली जात आहे. स्थानिक प्रभावी लिंगायत चेहरा म्हणून येडियुरप्पा प्रचारात उतरले.
भाजपला कर्नाटकमध्ये नवे नेतृत्व निर्माण करायचे असल्याने त्यांनी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासारख्या जुन्या-जाणत्या, वाजपेयींचा काळ बघितलेल्या नेत्याला उमेदवारी नाकारली. शेट्टर यांना उमेदवारी मिळेल अशी येडियुरप्पांना आशा होती, तसे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले होते. शेट्टर दिल्लीला आले, त्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. पण, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मग त्यांनी नाराज होऊन बंडखोरी केली. कर्नाटकमध्ये भाजपच्या अनेक जणांनी बंडखोरी केली. गुजरातमध्ये बंडखोरी झाली नाही, इथे मात्र बंडखोरी करण्याचे धाडस दाखवले गेले. हुबळी-धारवाड-मध्य हा विधानसभा मतदारसंघ हा शेट्टर यांचा बालेकिल्ला आहे. ते काँग्रेसमध्ये गेले, त्यांना त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. तिथे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रचारसभा घेतली.
भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये समान नागरी कायदा हा प्रमुख मुद्दा आहे. उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा होता. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, तिथे या पक्षाचे नेते समान नागरी कायदा राज्यामध्ये लागू करण्याचे वचन देत आहेत. महाराष्ट्रातही तसे दिले गेले होते. हा कायदा देशभर लागू करावा लागेल. त्यासाठी घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल. फक्त राज्य सरकार हा कायदा लागू करू शकत नाही. अनुच्छेद ३७०, राम मंदिर वगैरेप्रमाणे भाजपसाठी समान नागरी कायदा लागू करणे हे कित्येक वर्षांचे स्वप्न आहे, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये हा मुद्दा भाजप ऐरणीवर आणत आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आली तर समान नागरी कायदा अमलात आणण्यासाठी तीन सदस्यांची राज्यांतर्गत समिती नेमली जाणार आहे.
भाजपने काही मोफत योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. नंदिनी दूध संस्थेवर गुजरातमधील अमूलच्या संभाव्य कब्जाचा वाद रंगला होता. त्यानंतर भाजपने दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना अर्धा लिटर नंदिनी दूध, पाच किलो धान्य व वर्षभरात तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन वचननाम्यात दिले आहे. गरिबांच्या उन्नतीसाठी मोफत योजना लागू करणे गैर नाही असे भाजपचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या निवडणुकीवेळी आम आदमी पक्षाच्या मोफत योजनांच्या घोषणांवर टीका केली होती. रेवडी संस्कृती देशाला देशोधडीला लावेल, असे मोदी म्हणाले होते. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या रेवडी संस्कृतीवर मोदींनी टीका केली आहे. भाजपच्या वचननाम्यामध्ये अन्न, अभय, अक्षरा, आरोग्य, अभिवृद्धी आणि आदाय असे सहा प्रमुख मुद्दे आहेत. म्हणजे पोटाला अन्न, शिक्षणाची आणि आरोग्याची सुविधा, सुरक्षा, विकास आणि उत्पन्नवाढीची शाश्वती!
काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील राग अनावर झाला. ते मोदींना विषारी साप म्हणाले. त्यावरून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा व त्यांना प्रचार करण्यास मनाई करावी, अशी मागणी केली. निवडणूक आयोगाने खरगेंना नोटीस बजावली आहे. खरगेंची ही टिप्पणी मोदींच्या प्रचारसभा सुरू होण्यापूर्वी झाली होती. मग मोदींनी कर्नाटकमध्ये प्रचारसभांमध्ये खरगेंच्या टीकेला उत्तर दिले. मोदी म्हणाले की, देशातील जनता ही माझ्यासाठी शंकराचे रूप आहे. या शंकराच्या मानेभोवती असलेला विषारी साप होण्याची माझी तयारी आहे. मी विषारी साप बनून जनतेचे रक्षण करत राहीन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांमध्ये काँग्रेसवर खूप टीका केली. ते म्हणाले की, माझ्यावर काँग्रेसजनांनी ‘९१ वेळा’ अभद्र भाषेत हल्लाबोल केला आहे. काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते माझ्यावर टीका करत असतात! कर्नाटकमध्ये काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा हा प्रचारातील प्रमुख मुद्दा बनवला आहे. मोदींनी प्रचाराच्या भाषणामध्ये काँग्रेसची सरकारे अधिक भ्रष्ट होती, असे सांगितले. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेवर आले तर राज्यात पुन्हा भ्रष्टाचार बोकाळेल असे मोदींचे मतदारांना सांगणे होते. काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावरून भाजपने काँग्रेसला झोडपून काढले. कर्नाटक ही बजरंगबलीची जन्मभूमी असून तिथेच बजरंगाला कोंडून घालण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, अशी टीका भाजपने केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही श्रीराम व हनुमानाचा संदर्भ देत उत्तर प्रदेश व कर्नाटकच्या प्राचीन अतूट नात्याची आठवण मतदारांना करून दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, काँग्रेसला सत्ता मिळाली तर धार्मिक दंगली होतील, असे सांगितले. भाजप कधीही निवडणुकीसाठी धोरणे राबवत नाही, पुढील पंचवीस वर्षांच्या विकासाची दिशा लक्षात घेऊन योजना आखल्या जातात व त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामध्ये भेदभाव केला जात नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. कर्नाटकनंतर मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या तीन राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. कर्नाटक भाजपने जिंकले तर अन्य तीनही राज्यांमध्ये निवडणूक लढवणे सोपे जाऊ शकेल. त्यामुळे भाजपसाठी कर्नाटक जिंकणे महत्त्वाचे असावे. मतदार भाजपला कौल देतात की, काँग्रेसला हे बघायचे.