‘वार्ता विघ्नाची…?’ हा अग्रलेख (२७ ऑगस्ट) वाचला. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र या मराठी सणांमध्ये राजकारण्यांचा शिरकाव झाला तेव्हापासून उत्सवांचे पावित्र्य लयाला गेले आहे. उत्सव म्हणजे नुसता पैशांचा पाऊस आणि मतांचा जोगवा मिळवण्याचा व्यवसाय झालेला आहे. या सणांच्या आगेमागे कुठल्या ना कुठल्या निवडणुका असतातच, त्यामुळे युवाशक्तीचा उपयोग सारेच राजकीय पक्ष करून घेतात. देशाचा नवा ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ याकामी खर्ची पडू लागला आहे. गोविंदांचा उच्छाद, गणपती दर्शनासाठी भल्यामोठ्या रांगा, गणेश मंडळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची अरेरावी, डीजेचा आवाज, डोळ्यांना त्रास देणारी रोषणाई सर्वत्र दिसते. पुण्यात तर दरवर्षी मानाचे गणपती, त्यांच्या मिरवणुका, अग्रक्रम यावरून वाद होतात. सगळेच गणपती ‘माना’चे झाल्याने सगळीकडे मानापमानाचे नाट्य दिसून येत आहे. सामान्य नागरिकांना रस्त्यावरील गर्दीत स्वत:चा जीव मुठीत धरून वावरावे लागते. स्टेजवर सुपारी घेऊन नाचणाऱ्या नट्या पाहून तमाशा बरा म्हणायची वेळ आली आहे. या उन्मादासाठी पैसा कुठून येतो यावर मात्र सारेच चिडीचूप.

● शुभदा गोवर्धन, ठाणे

उत्सवांना शिस्त लावता येईल?

‘वार्ता विघ्नाची…?’ हे संपादकीय वाचले. गणेशोत्सवाचा इव्हेंट झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे एवढे स्तोम माजविण्याचे, तिथे नवससायास करण्याचे कारण काय? घरचा गणपती पावत नाही का? मूर्ती कोणत्या आकारात, कोणत्या रूपात आणि किती उंचीची असावी याला काही धरबंध राहिलेला नाही. हात-पाय सोन्याचांदीचे होत आहेत. गल्लोगल्ली राजा, महाराजांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्याकरिता गल्लीतील समाजसेवक आपल्या नेत्यांचे फोटो असलेले स्वागताचे होर्डिंग्ज लावतात. अशा या गणेशोत्सवाला शिस्त लावता येईल का?

● विजय कदम, लोअर परळ (मुंबई)

लोकशाही सक्षम करणारी नीती

‘देशविरोधाची ‘लोकनीती’’ हा ‘पहिली बाजू’सदरातील लेख (२६ ऑगस्ट) वाचला. आरोप निवडणूक आयोगावर होतात, मात्र आयोगाच्या बचावार्थ भाजप नेतेच सातत्याने पुढे येतात. यामागील गूढ आता जनतेच्या लक्षात आले आहे. निवडणूक आयोगाकडून फारसे सहकार्य मिळालेले नसतानाही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमधील गैरप्रकार उघड केले. मात्र, निवडणूक आयोगाने त्याला उत्तरे न देता, भलत्याच मुद्द्यांवर हास्यास्पद स्पष्टीकरण दिले. नंतर भाजपचे अनुराग ठाकूर यांनीही पत्रकार परिषद घेऊन काही मतदारसंघांमध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा केला. मात्र, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनाच माफी मागण्याविषयी व शपथपत्र देण्याविषयीची नोटीस बजावली, अनुराग ठाकूर यांना ती बजावली नाही, यावरून निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा स्पष्ट होतो. निवडणूक आयोगातील नियुक्त्यांची प्रक्रिया बदलण्यात आल्यामुळे आयोग हे सरकारच्या हातातले कळसूत्री बाहुले ठरेल, अशी शंका उपस्थित केली जात आहे. गांधी यांच्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोग आणि उपाध्ये यांच्याकडे नाहीत. राहुल यांची देशविरोधाची ‘लोकनीती’ नसून लोकशाही सक्षम करणारी लोकनीती आहे आणि हीच गोष्ट भाजपची झोप उडविणारी आहे. तोच त्रागा उपाध्ये यांच्या लेखातून व्यक्त झालेला दिसतो.

● राजेंद्र फेगडे, नाशिक

प्रश्नपत्रिका अचूक का नसतात?

‘बारा प्रश्न रद्द, दोन प्रश्नांमध्ये बदल’ ही बातमी (लोकसत्ता- २७ ऑगस्ट) वाचली. एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेनंतर प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाते. त्यावर हरकती मागवल्या जातात आणि अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाते. ही पद्धत नक्कीच योग्य आहे. सदर गट ब मुख्य परीक्षेत बारा प्रश्न रद्द करण्यात आले आणि दोन प्रश्नांत बदल करण्यात आला. प्रथम उत्तरतालिकेनुसार एखादा पर्याय बरोबर ठरतो, पण विद्यार्थ्यांकडून आलेल्या हरकतीनुसार त्यात बदल करण्यात येतो. अशी चुकांमध्ये होणारी दुरुस्ती नक्कीच स्वागतार्ह आहे. पण उर्वरित १२ प्रश्नसुद्धा रद्द करण्यात आले. या प्रश्नांमध्ये काही छपाईतील चुका असतील, काही वेळा योग्य उत्तर दिलेल्या पर्यायांत नसेल किंवा काही वेळा दोन पर्याय योग्य असू शकतात, त्यामुळे ते प्रश्न रद्द करण्यात आले असावेत. ४०० गुणांच्या परीक्षेतील १२ प्रश्न रद्द झाल्यामुळे परीक्षा ३७६ गुणांचीच झाली. प्रश्न योग्य रीतीने विचारले असते तर ज्यांचा अभ्यास चांगला आहे ते विद्यार्थी स्वत:ला सिद्ध करू शकले असते. प्रश्न नीट न विचारल्यामुळे विद्यार्थ्याने गोंधळून जाऊन चुकीचा पर्याय निवडलेला असू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून प्रश्न रद्द करणेच फायदेशीर ठरू शकते. येत्या काळात एमपीएससीने अधिक अचूक प्रश्नपत्रिका काढल्यास विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन होईल.

● विशाल कुंभार, कोल्हापूर