तरीही गगन ठेंगणे…!’ अग्रलेख (१४ जून) वाचला. एवढ्या भीषण अपघातानंतर अनेकांकडून विमान प्रवासाच्या सुरक्षेबाबत प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या मुद्द्याच्या अनुषंगाने सदर अग्रलेखात विमान प्रवास सुरक्षेबाबत अत्यंत अभ्यासपूर्ण, समर्पक आणि सुरेख असे विश्लेषण केले आहे. भारतासारख्या देशात जिथे रस्ते वाहतुकीमध्ये शिस्तीची बोंब आहे, तेथे जितकी माणसे वर्षभरात रस्ते अपघातांमध्ये मरतात तितकी गेल्या ५० वर्षांत जगभरातील एकूण विमान अपघातांमध्ये मिळूनही दगावलेली नाहीत हे अत्यंत अभ्यासपूर्ण निरीक्षण आहे. त्याबरोबरच विमान अपघातांच्या भीषणतेवरून लोकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी सुरक्षित रस्त्यांवर जीव जाणाऱ्यांची संख्या हवेतील प्रवासाची भीती कमी करण्यास मदत करेल, हेसुद्धा योग्य अनुमान आहे. प्रत्येक विमान अपघात हा मानवी ज्ञानाच्या कक्षा किती रुंदावतो आणि ते ज्ञान कसे आत्मसात केले जाते हे पाहिल्यास विज्ञानाविषयीचा आदर दुणावेल हे मतसुद्धा अभ्यासपूर्ण आहे.

तथापि अहमदाबादच्या भीषण विमान दुर्घटनेत अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातग्रस्त एअर इंडियाच्या बोइंग ड्रीमलायनर विमानाने अनेकांचे जीवन हिरावून घेतलेच शिवाय त्यांच्या किती तरी प्रियजनांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली! जगणे कसे बेभरवशाचे आणि जीवन मृत्यूच्या हिंदोळ्यावरील आहे याचाच प्रत्यय आला. जोखमीचे काम वा जोखमीच्या जागेवर काम करताना कसे दक्ष राहायला हवे याचाच धडा सदर दुर्घटनेतून मिळाला आहे. तरीही विमान अपघातांची भीषणता पाहता अग्रलेखातील विस्तृत विश्लेषणामुळे आजही मानवाला गगन ठेंगणेच आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही!- श्रीकांत जाधवअतीत (जि. सातारा)

विमान प्रवाशांतील भय टाळायला हवे!

तरीही गगन ठेंगणे…!’ हा अग्रलेख वाचला. या अपघातानंतर ब्लॅक बॉक्समध्ये अपघाताचे कारण समजेल. तोवर या बद्दल तर्क-वितर्क काढले जाऊ नयेत. हवाई मार्ग ही हौस नसून आता गरज होत आहे. त्यामुळे नियमित प्रवाशांना हवाई प्रवासासाठी पुन्हा एकदा उद्याुक्त करून त्यांच्या मनात जे भय निर्माण झाले आहे ते टाळायला हवे.- सुनील समडोळीकरकोल्हापूर

अधिक सजगता आणावी लागेल

तरीही गगन ठेंगणे…!’ हे संपादकीय वाचले. आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि यंत्रमानवाच्या हातात आपल्या झटपट सुखसोयींच्या अनेक संसाधनांचे सुकाणू सोपवण्याचा घाट घालत असू तर, प्रत्येक गगनभरारीच्या आधी, या यंत्रमानवांचा भस्मासुर होण्याची पुसटशी शंकाही राहणार नाही याची शिकस्त करण्यात अनेक मेंदू कार्यरत ठेवावे लागतील. कारण ज्ञान मार्ग दाखवते आणि त्या ज्ञानाची देखभाल अन् प्रारंभिक कसोटी निर्धोक मार्गक्रमणाची सिद्धता करते.- श्रीपाद कुलकर्णीबिबवेवाडी, पुणे</p>

विमान दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे

तरीही गगन ठेंगणे…!’ हे संपादकीय वाचले. पूर्वी विमानतळ परिसरात मोठ्या बांधकामासाठी परवानगी नव्हती. आता विमानतळ परिसरात मोठी बांधकामे होऊन नागरी वस्ती वाढत आहे. मुंबईत विमानतळाचा परिसर असुरक्षित बनले असून विमानतळाच्या आणि विमानांच्या उड्डाणांचा धोका वाढला आहे.- सुनील कुवरेशिवडी.( मुंबई )

द डे ऑफ द जॅकल’ने आयुष्यच बदलले

फ्रेडरिक फोर्सिथ’वर वाहिलेले बुकमार्कमधील संपूर्ण पान (१४ जून) वाचताना मी पुन्हा एकदा सत्तरच्या दशकात हरवून गेलो. फोर्सिथ यांचे ‘द डे ऑफ द जॅकल’ तहान, भूक, झोप विसरून एका बैठकीत वाचून काढले होते. मग त्यांच्या सगळ्या पुस्तकांचा फडशा पाडला. ‘द डे ऑफ द जॅकल’वर आधारित सिनेमादेखील तीन वेळा पाहिला. पुस्तक वाचले होते, तरीही त्या कथानकाचे स्क्रीनवरील रूपांतर मोहित करत राहिले. फोर्सिथवरचे हे सर्व लेख वाचून, नववाचकांना त्यांची पुस्तके वाचावीच लागतील. आणि जुन्या वाचकांना पुन्हा त्या पुस्तकांकडे वळावे लागेल, हे निश्चित. एक मजेशीर प्रसंग आठवतो. ऑफिसमध्ये कामाच्या वेळेत ‘द डे ऑफ द जॅकल’ वाचण्यात एवढा गुंतलो होतो की वरिष्ठ अचानक समोर आले, हे कळलेच नाही. त्यांनी हातातले पुस्तक उचलून पाहिले, किंचित चाळले. वाटले की ते आता रागावतील. पण ते पुस्तक त्यांना आवडले आणि आमच्यात फोर्सिथसह इतर पुस्तकांची देवाणघेवाण होऊ लागली. खरे तर केवळ ‘द डे ऑफ द जॅकल’मुळे माझे आयुष्यच बदलले.- राघवेंद्र मण्णूरडोंबिवली

बेंगळूरु दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळावी!

बेंगळूरुच्या दुर्घटनेची जबाबदारी राज्य सरकारचीच’ हा ज्युलिओ रिबेरो यांचा लेख (१५ जून) वास्तवदर्शी आहे, आरसीबीच्या विजयाचे श्रेय सत्ताधाऱ्यांना पाहिजे होते, म्हणून त्यांनी घाईघाईने कोणत्याही नियोजनाशिवाय, संघ सत्काराचा कार्यक्रम ठरवून, त्याची जबाबदारी मात्र पोलिसांवर बिनदिक्कतपणे ढकलली, हे चुकीचेच होते. खरे म्हणजे ३५ हजार प्रेक्षक बसू शकतील, अशा चिन्नास्वामी स्टेडियममध्ये, तीन लाख क्रिकेटप्रेमींची गर्दी लोटली, ती हाताळता आली नाही आणि अनर्थ घडला. गर्दी नियंत्रणात मुंबई पोलीस अव्वल आहेत, हे अनेकदा सिद्ध झाले आहे, तेव्हा यापुढे तरी असे अपघात टाळण्यासाठी मुंबई पोलिसांचा सल्ला सर्वच राज्यांनी घेणे उचित ठरावे.- प्रदीप करमरकरनौपाडा, ठाणे</p>

तरीही आपल्याला शहाणपण येत नाही

बेंगळूरुच्या दुर्घटनेची जबाबदारी राज्य सरकारचीच !’ हा यांचा लेख वाचला. नुकतेच बंगलोरमध्ये ‘आरसीबी’ विजयसोहळ्यात चेंगराचेंगरी होऊन ११ ठार तर ४७ जण जखमी झाले. ‘आरसीबी’ संघाने आयपीएल टी-२० स्पर्धेत प्रथमच विजेतेपद पटकावले असले तरी सरकारने अशा सुमार दर्जाच्या स्पर्धेतील विजयी संघ आणि खेळाडूंच्या सत्कारासारख्या अव्यापारेषु कामांत का पडावे? खेळाडूंची लोकप्रियता आपल्या राजकीय फायद्यासाठी ‘कॅश’ करणे हे या प्रश्नाचे उत्तर आहे.

गतवर्षी मुंबईत टी – २० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी तब्बल आठ लाख क्रिकेटप्रेमींनी अलोट गर्दी केली आणि चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. विजयी मिरवणूक आटोपल्यानंतर मरिन ड्राइव्ह परिसरात पादत्राणांचा पडलेला खच आणि इतस्तत: पडलेला इतर कचरा साफ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांना रात्रभर खपावे लागले. विविध कारणांमुळे असंख्य नागरिक एकाच जागी जमा होतात; गर्दी कोणतेही नियम पाळत नाही आणि मग अशा चेंगराचेंगरीच्या घटना वारंवार घडतात; अनेक जण मृत्युमुखी पडतात. पण यातून आपणास यायला हवे ते शहाणपण काही येत नाही!- बाळकृष्ण शिंदेबिबवेवाडी, पुणे

काँग्रेसच्या अपयशालाही नेतृत्वच जबाबदार

यश तुमचेतर मग अपयशही तुमचेच!’ हा समोरच्या बाकावरून सदरातील पी.चिदम्बरम यांचा लेख (१५ जून) वाचला. भारतीय राजकारण हे बहुतेक सर्व पक्षात संपूर्णपणे व्यक्तिकेंद्रित आहे. काही वेळा तर ते कुटु़ंबाचीही खासगी मालमत्ता असल्याचे जाणवते! काँग्रेस पक्षाला केंद्रीय राजकारणात लोकसभेच्या तीन टर्म सत्तेच्या जवळही जाणे कठीण झाले. याच पक्षाच्या दीर्घ अनुभवी व पक्षीय जाणकार इतर नेत्यांनी ‘घराणेशाही’ याच निकषाने अधिकार मिळवलेल्या शिखर नेत्यावर कधी या सततच्या अपयशाचे खापर फोडल्याचे ऐकिवात नाही.-प्रवीण आंबेसकरठाणे

नव्या प्रवृत्तींचे निदर्शक नेतृत्व

अमेरिकेचे दुबळे बलवान अध्यक्ष!’ हा लेख (१५ जून) ट्रम्प यांच्या नेतृत्वशैलीचे विश्लेषण करतो. ट्रम्प यांनी पारंपरिक अमेरिकन मुत्सद्देगिरीच्या चौकटी मोडत जागतिक राजकारणात खळबळ निर्माण केली. त्यांच्या आक्रमक आणि अनपेक्षित निर्णयशक्तीमुळे अमेरिका काहीशी अलग पडली असली, तरी समर्थकांसाठी ते ठाम, राष्ट्रहितसाधक आणि स्पष्टवक्ते नेते ठरले. त्यांच्यावर समाजात द्वेषभावना भडकवणे, माध्यमांवर हल्ले आणि लोकशाही संस्थांना कमजोर करण्याचा आरोपही झाला. त्यांचे नेतृत्व हे केवळ वादग्रस्तच नाही, तर आधुनिक जागतिक राजकारणातील नव्या प्रवृत्तींचे निदर्शकही आहे – पारंपरिक चौकटींना धक्का देणारे, परंतु जनमानसाला पुन्हा राजकारणात गुंतवणारे.- फ्रँक मिरांडावसई