‘छळाकडून छळवादाकडे!’ हा अग्रलेख (१४ ऑगस्ट) वाचला. प्राचीन काळापासून आजपर्यंत माणूस माणसाला मारतच आला आहे, कारणे तेवढी बदलली, पण वृत्ती तीच राहिली. कधी धर्माच्या नावाखाली, कधी भूभागाच्या लोभामुळे, तर कधी सत्तेच्या नशेत युद्ध पेटले. विसाव्या शतकातही जगाने दोन-दोन महायुद्धांचा अनुभव घेतला. त्यानंतर तरी शांतता सुव्यवस्था नांदेल अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली असून जगात युद्ध होऊ नये म्हणून स्थापन झालेली संयुक्त राष्ट्रे पूर्णपणे अपयशी ठरली आहेत.

संपूर्ण जग पादाक्रांत करण्याचा प्रयत्न अलेक्झांडरने केला, नेपोलियननेही केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हिटलरने दुसरे महायुद्ध घडवले, पण तरीही माणूस सुधारण्यास तयार नाही. साडेतीन वर्षांपासून रशिया- युक्रेन युद्ध सुरू आहे आणि दोन वर्षांपासून इस्रायल- हमास युद्ध पेटले आहे. एकविसाव्या शतकात विज्ञान, तंत्रज्ञान, संवाद, सुखोपभोगाची एवढी साधने विकसित झाली तरी मानवाचा अहंकार, लोभ, द्वेष, भीती आणि वर्चस्वाची लालसा कमी झालेली नाही. खरे परिवर्तन केवळ प्रगतीच्या साधनांमध्ये नव्हे, तर विचारसरणीत आणि मानवी मूल्यांच्या आचरणात झाले पाहिजे. सहअस्तित्व स्वीकारले, तरच मानवता पुढे जाईल.- अनिल साखरेकोपरी (ठाणे)

केवळ बंधमुक्त होणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे

तालिबानच्या अत्याचाराची चार वर्षे’ हा लेख (१४ ऑगस्ट) वाचला. स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय बंधनांतून मुक्त होणे नाही, तर शिक्षण, समानता, सुरक्षितता आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे सामर्थ्य मिळणे होय. ऑगस्ट २०२१ मध्ये अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघारी गेल्यानंतर तालिबानने सत्ता काबीज केली. गेली चार वर्षे तेथील महिलांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. मुलींच्या शाळा बंद, रोजगाराची दारे बंद, आरोग्यसेवांवर निर्बंध, भीती, दहशत आणि असमानता हेच तिथल्या लोकांचे रोजचे वास्तव झाले आहे. दहशतवाद आणि हिंसाचाराने संपूर्ण प्रदेश अस्थिर केला आहे आणि त्याचा परिणाम जागतिक सुरक्षेवरही होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, तिथल्या लाखो लोकांना अन्न, आरोग्य आणि सुरक्षिततेचा मूलभूत हक्कही मिळत नाही. महिला पत्रकार, शिक्षक आणि समाजसेवकांना धमक्या देऊन गप्प केले जात आहे. बेरोजगारी आणि गरिबीमुळे युवक परदेशात पलायन करत आहेत. आंतरराष्ट्रीय मदत असूनही, तालिबानच्या कठोर धोरणांमुळे सामान्य लोकांपर्यंत ही मदत पोहोचणे अवघड झाले आहे. जगातील सर्व राष्ट्रांनी, विशेषत: शक्तिशाली राष्ट्रांनी, स्वार्थ बाजूला ठेवून अफगाण जनतेच्या हक्कांसाठी उभे राहणे गरजेचे आहे.- शुभम सोमकुवरनागपूर

सर्व यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात

निवडणूक आयोग विश्वासार्हता टिकवेल?’ हा सुनील माने यांचा लेख वाचला. २०१४ पासून दिल्लीत एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर देशात शतप्रतिशत भाजपची सत्ता असावी म्हणून भाजप धुरीणांनी लोकशाहीचे धिंडवडे काढण्याची एकही संधी सोडली नाही. निवडणुका जिंकण्यासाठी या पक्षाने निवडणूक आयोग आपल्या ताब्यात घेतला आहे, हे कित्येक घटनांवरून सिद्ध झाले आहे. लोकसभा निवडणुकीत ४००पारचा नारा देणाऱ्या भाजपला स्वबळावर साधे बहुमतही मिळाले नाही. त्यांचा अश्वमेध अडविण्यात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान होते. याचा राग नंतरच्या विधानसभा निवडणुकीत काढण्यात आला. निवडणूक आयोगामार्फत फक्त हरयाणा व हिमाचल प्रदेशात निवडणुका घेऊन शेतकऱ्यांचे आव्हान संपवले गेले. नंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून प्रचार करून आचारसंहिता भंग करण्याचे प्रयत्न वारंवार केले. तरीही निवडणूक आयोगाने कारवाई केल्याचे आढळले नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला तर दिलेच, परंतु शरद पवार गटाला दिलेल्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाशी साधर्म्य साधणारे ट्रम्पेट चिन्ह देण्यात आले. त्याबद्दल तक्रार करूनही निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही. त्यामुळे २०४७ पर्यंत फक्त भाजपच सत्तेत राहील याची खबरदारी घेतली जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भाजपचे योगदान शून्य असल्याने इतिहास बदलण्यासाठी सर्व यंत्रणा ताब्यात घेतल्या जात आहेत. विरोधी पक्षाच्या ३०० खासदारांनी काढलेल्या मोर्चाला अडवून सत्ताधारी पक्षाने नेहमीप्रमाणेच त्यांची अडवणूक करून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केला.- नंदकिशोर भाटकरगिरगाव

मांसाहाराचे राहू द्या, मतचोरीवर बोला

कोणी काय खावे यात आम्हाला रस नाही’ ही बातमी (लोकसत्ता- १४ ऑगस्ट) वाचली. स्वातंत्र्य दिन म्हटल्यावर अनेकजण बलिदान दिलेल्या राष्ट्रपुरुषांप्रति भावना व्यक्त करताना जेवणही शक्यतो सात्त्विकच घेतात हा परंपरागत चालत आलेला सोपस्कार असून आताच्या सर्वच पक्षांच्या नेत्यांना समाजकारणापेक्षा राजकारण करून वातावरण गढूळ करायचे असते. मुख्यमंत्र्यांनी हा काँग्रेसच्या काळातील निर्णय आहे, हे स्पष्ट केले आहे. निर्णय जर चांगला असेल तर मोठ्या मनाने त्याचे स्वागत करून अंमलबजावणी केली पाहिजे. पण यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे, सत्ताधाऱ्यांनी मतचोरी, भ्रष्टाचार, घराणेशाही, फोडाफोडी यावर काय कारवाई केली? काँग्रेसच्याच लोकांना बरोबर घेऊन सत्तेवर आले आणि काँग्रेसच्याच वाटेने जात असतील, तर मग मतदारांनी यांना निवडून का दिले?- अरुण बधानडोंबिवली

उत्सवी कर्मकांडांची गुंगी

उत्सवपूर्व अतिउत्साही नवप्रथांचा उच्छाद’ हे वृत्त (लोकसत्ता- १४ ऑगस्ट) वाचले. राज्यात काही ठिकाणी लादलेल्या मांसाहार विक्रीबंदीच्या बातम्याही वाचल्या. एकेकाळी सामाजिकदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्राचा वैचारिक प्रवास आता कोणत्या दिशेने सुरू आहे, याची झलक यातून दिसते. गेल्या काही वर्षांत मुंबईतील सधन गुजराती, मारवाडी समाजाच्या धार्मिक चालीरीतींचे अधिकाधिक बटबटीतपणे, विकृत अनुकरण करणे म्हणजेच काय ती सनातन संस्कृती आहे, अशी काहीशी मराठी तरुणांची समजूत झालेली दिसते. प्रत्येक उत्सवाचा इव्हेंट करणारे राजकीय पक्ष त्यात आणखी भर घालतात. यातून होणारे प्रदूषण, वाहतूक खोळंबा, वेळेचा अपव्यय याहीपेक्षा जास्त चिंताजनक प्रश्न या महाराष्ट्रातील बहुजन मराठी तरुणांना पद्धतशीरपणे भरकटवले जाणे हा आहे. एकीकडे आपली मराठी मुले अशी सतत ढोल-ताशे, मंडप, सजावट, डीजे आणि लेझरच्या तयारीत गुंग आहेत आणि दुसरीकडे मांसाहार म्हणजे पाप, अपवित्र आहे असा समज दृढ होण्याच्या दिशेने मूठभर समाज सरकारमान्य प्रयत्न करत आहे. बिहारमधील गंगा किनाऱ्यावरील घाटावर स्पर्धा परीक्षांची मन लावून तयारी करणाऱ्या तरुणांचे जथ्थे बघितल्यावर आज केंद्र सरकारी नोकऱ्यांत उत्तर भारतीय उमेदवारच यशस्वी का होतात ते समजते.-चेतन मोरेठाणे

सापा, तुला अगस्तींची शपथ!’

हाकारा ती जहाजं’ हा संदीप देशमुख यांचा लेख (९ ऑगस्ट) वाचला. माझ्या बालपणातला अगस्ती तारा समुद्राशी नव्हे, तर गावाच्या भिंतीवर लिहिलेल्या एका वाक्याशी जोडला गेला आहे.

मराठवाड्यातील आमच्या गावात तेव्हा बहुतेक घरे कुडाची होती. घर कुडाचे असो वा विटांचे बहुतेक घरांच्या भिंतींवर ऑगस्ट महिन्याच्या आसपास एक वाक्य लिहिलेले दिसे. ‘सापा, तुला अगस्ती मुनींची शपथ!’ तेव्हा ते एखाद्या गूढ ताईतासारखे मनात कोरले गेले. काहीजण सांगायचे. ‘अगस्ती मुनी हा सापांचा गुरू. त्याची शपथ दिल्यावर साप येत नाहीत’. ‘हाकारा ती जहाजं’ हा लेख वाचल्यानंतर, वाटले की यामागे डोळस नसली तरी, निसर्गाच्या निरीक्षणातून जन्मलेली एक पारंपरिक प्रथा असावी. पावसाळ्यात, सापांच्या बिळात पाणी शिरते आणि साप बाहेर पडतात. ऑगस्टच्या सुमारास आकाशात अगस्ती तारा चमकू लागतो, तेव्हा पाऊस बराचसा रोडावलेला असतो. साप सर्रास दिसण्याच्या व सर्पदंशाच्या घटनाही कमी होतात. त्यामुळे लोकांच्या मनात अगस्ती तारा दिसणे आणि साप सापदंशाचे प्रमाण कमी होणे, यांचा एक निखळ परस्परसंबंध तयार झाला असावा. आपल्या संस्कृतीत ताऱ्यांना ऋषी-मुनींशी जोडण्याची परंपरा आहेच. त्यामुळेच एक विशिष्ट तारा अगस्ती ऋषी झाला असावा आणि या ‘गुरू’चे आगमन होताच साप नाहीसे होतात, असा कार्यकारणभाव जोडला गेला असावा.- सुयोग सलगरकरमोशी (पुणे)