‘सोयीस्करतेची सवय!’ हे संपादकीय (२९ मार्च) वाचले. यात  राजकीय पक्ष आणि सरकारचाच नव्हे तर एकंदर समाजाचा चेहरासुद्धा आरशात मोठा दिसेल, याची खबरदारी घेण्यात आली आहे. विचार महात्मा गांधींचे असोत वा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे, आपल्या वागण्यात- बोलण्याशी त्यांचा काडीमात्र संबंध नसला तरी, राजकारणासाठी कोणी त्यांचा उपयोग करून घेत असेल तर त्याला सामान्यांचाही भरभरून प्रतिसाद मिळेल, असे पाहिले जाते. राहुल गांधींच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, नाहक वाद उकरून काढण्यात आला आहे. यातून भाजपला पर्याय उभा करण्याच्या विरोधी पक्षांच्या प्रयत्नांत अडथळा येत आहे. शरद पवार यांनी दिलेला सल्ला योग्य वाटतो. परंतु राहुल गांधींची राजकीय वाटचाल पाहाता त्यांना तो कितपत पटेल, हा प्रश्नच आहे.

  • मोहन गद्रे, कांदिवली

राहुल गांधींचे चुकलेच! 

राहुल गांधी यांची भारतभूमी पुन्हा जोडण्यासाठी निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा विविध राज्यांतून गेली. परंतु ती महाराष्ट्रात आल्यावरच राहुल यांनी यात्रेशी काहीच संबंध नसलेला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विषय उकरून काढला. त्यांनी महाराष्ट्रातील सावरकरप्रेमींना डिवचण्याचा प्रयत्न केला. सावरकरांना त्यांच्या मातीतच येऊन ‘माफीवीर’ म्हणणे, ‘माफी मागायला मी काय सावरकर आहे का?’ अशी विधाने करणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. त्यांनी भर पत्रकार परिषदेत देशाच्या राष्ट्रपतींनी काढलेला अध्यादेश फाडला ही संविधानासह लोकशाहीची घोर विटंबना आहे. त्यांनी लंडनमध्ये जाऊन भारतीय, संसदेसह सर्व संवैधानिक संस्थांवर टीका केली, ते योग्य होते का? राहुल गांधी ताळतंत्र सोडून विधाने करू लागले आहेत, असे दिसते.

pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Gaurav Gogoi alleges that BJP wants a Russian-style oligarchy
“रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा

भाजपला शह देण्याची संधी साधावी!

‘राहुल राजसंन्यास!’ हा अग्रलेख (२७ मार्च) वाचला. सत्य किती कासावीस करते याचा प्रत्यय सत्ताधाऱ्यांना क्षणोक्षणी येत आहे. मोदी सरकार आपण फारच स्वच्छ असल्याचे भासविण्याची धडपड करत आहे, मात्र या प्रयत्नात त्यांनी स्वत:च्याच पायावर नामुष्कीचा धोंडा पाडून घेतला आहे. २०२४ मधील लोकसभा निवडणुकांआधी राहुल गांधींना येनकेनप्रकारेण तुरुंगात डांबण्याची घाई होणार, हे उघडच होते.

केंब्रिजमधील राहुल गांधी यांच्या भाषणापेक्षाही विखारी भाषणे पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी केली आहेत, मात्र त्यांचा दबदबा मोठा असल्यामुळे त्यांवर फारशी टीका झाली नाही. पण सरकारने राहुल गांधींविरोधात पाऊल उचलून स्वत:चेच नुकसान करून घेतले आहे. यातून विरोधक एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत. आज भलेही वैचारिक मतभेद असू शकतील, परंतु हुकूमशाहीकडे निर्धोकपणे वाटचाल करणाऱ्या सत्ताधीशांना धडा शिकविण्याची हीच एकमेव सुवर्णसंधी आहे. ही संधी गाठण्यासाठी राहुल यांना सावध भूमिका घ्यावी लागेल. सावरकरांवर टीकाटिप्पणी करून वाद ओढवून घेण्याऐवजी विकासोन्मुख कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. राजकीय संकेतांचे पालन केले पाहिजे. अनावश्यक विषयांभोवती, ऊठसूट पिंगा घालीत वेळ दवडल्यास, हाती आलेली संधी जाऊ शकते, याचे भान ठेवावे लागेल. शरद पवार यांनी पुढाकार घेऊन ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, के. चंद्रशेखर राव, तेजस्वी यादव यांना एका व्यासपीठावर आणण्याची गरज आहे. हा बदलता राजकीय प्रवाह, खरोखर स्वागतार्ह आहे. राहुल गांधींना तुरुंगवास भोगावा लागलाच, तर भाजपला शह देण्यासाठी ती एक सुवर्णसंधी ठरेल.

  • डॉ. नूतनकुमार सी. पाटणी, चिकलठाणा (औरंगाबाद)

दोन्ही पक्षांकडून सामान्यांची दिशाभूल

‘राहुल राजसंन्यास!’ हा अग्रलेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या यावर भाजपकडे चोख, प्रभावी आणि परिणामकारक उत्तर नाही, हे सत्य आहे. राहुल गांधी काँग्रेसचे नेतृत्व करण्यात अपयशी ठरले आहेत, हे सत्य आहे. त्या त्या राजकीय विचारधारेच्या पाठीराख्यांना सत्य स्वीकारणे कठीण जात आहे. परंतु आपआपली प्रचारमोहीम मात्र ते जोमाने राबवीत आहेत आणि त्यांचे फसवे दावे जनसामान्यांची दिशाभूल करणारे आहेत.

  • भूषण सरमळकर, दहिसर, मुंबई

मुख्यमंत्र्यांना राज्यपालांच्या वक्तव्याचा विसर?

राहुल गांधी यांनी केलेला सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत ठणकावले. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, ठाकरे राहुल गांधींच्या श्रीमुखात लगावणार का? पण माजी राज्यपालांनी जेव्हा  आमच्या छत्रपतींचा अपमान केला होता, तेव्हा भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी साधा निषेधसुद्धा केला नव्हता. मुख्यमंत्र्यांना याचा विसर पडला का?

  • राजेंद्र ठाकूर, मुंबई

आपली व्यवस्था अर्जुनधार्जिणीच!

दर्शन सोळंकी या आयआयटी मुंबईच्या दलित विद्यार्थ्यांने महिन्याभरापूर्वी आत्महत्या केली. पोलिसांना तेव्हा पंचनामा करताना त्याची चिठ्ठी सापडली नाही जी विशेष तपास पथकाला काही आठवडय़ांनी, जवळजवळ महिन्याभराने, सापडली. तोवर आयआयटीच्या अंतर्गत समितीने यात कुणाचाही काही दोष नसून अभ्यास न झेपल्याने ही घटना घडली असावी असा सोयीस्कर निष्कर्ष काढून सर्व दोष पीडितावरच ढकलला. यातून संपूर्ण व्यवस्था प्रस्थापितांच्या पाठीशी कशी आणि कुठवर उभी राहते, हे स्पष्ट होते. आणखी एका एकलव्याचा बळी गेला पण आपण तथाकथित मेरिटचे गोडवे गायचे काही थांबवणार नाही. व्यवस्थेने अर्जुनाच्या बाजूने उभे राहणे हा आपला इतिहास आहे.

  • प्रवीण नेरुरकर, माहीम, मुंबई

श्वानदंशापासून संरक्षणासाठीही प्रयत्न व्हावेत

प्राण्यांनाही मूलभूत अधिकार हे वृत्त (लोकसत्ता- २९ मार्च) वाचले. भारतीय राज्य घटनेने दिलेले मूलभूत अधिकार प्राण्यांनाही लागू असल्याचे मत उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. मुंबईतील गृहनिर्माण संस्थेच्या आवारात भटक्या श्वानांना खाद्य देण्याबाबत सुरू झालेल्या वाद प्रकरणात न्यायालयाने हे मत नोंदविले ते स्तुत्यच. सार्वजनिक ठिकाणी खाद्य केंद्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश मुंबई महापालिकेला देण्यात आले होते पण त्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. काही श्वानांना खाद्य न मिळाल्याने ते आक्रमक होतात. काही वेळा लहान मुले अनवधानाने त्यांच्याशी खेळायला जातात आणि श्वानदंशामुळे वेदना सहन कराव्या लागतात. सामान्य माणसाला श्वानदंशापासून कोण वाचविणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. अशा आक्रमक श्वानांपासून बालकांना संरक्षण देण्याचे कर्तव्य प्राणीमित्रांनी पार पाडावे, असे वाटते.

  • अरविंद बेलवलकर, अंधेरी (मुंबई)

द्वेष पसरवून निवडणुका जिंकणे सोपे

‘पदवी त्यांची आणि यांची’ हे ‘उलटा चष्मा’ सदरातील स्फुट (२८ मार्च) वाचले. अलीकडे भाजप आणि संघ परिवारातील ज्येष्ठ नेत्यांनी गांधी आणि नेहरूंविरोधात देशात ज्या वेगाने मोहीम सुरू केली आहे, ती भयावह आहे. देशाच्या इतिहासात, स्वातंत्र्यलढय़ात, आधुनिक भारताच्या निर्मितीत ज्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यांना दूषणे दिली जात आहेत. ही प्रक्रिया देशाला खऱ्या इतिहासापासून दूर नेत आहे, खोटय़ा इतिहासाच्या वैभवात जगण्याची सवय लावली जात आहे. लोकशाहीत जेव्हा असे मूर्तिभंजन केले जाते, तेव्हा ते जाणीवपूर्वक केलेले कृत्य असते. नेहरूंच्या विरोधात सुरू असलेली मोहीम एका मर्यादेपर्यंत चालविली जाऊ शकते, त्यानंतर त्याला गांधीविरोधी मोहिमेची आवश्यकता असेल.

या देशात गोडसेंच्या विचारसरणीचे लोक गोडसेंना भारत-पाक फाळणीने विचलित झालेला देशभक्त म्हणून सिद्ध करण्याच्या या मोहिमेत सतत गुंतलेले असतात आणि हे लोक गांधींच्या चित्रावर गोळय़ा झाडतानाचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा पोस्ट करीत असतात. भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी जाहीरपणे गांधींना फटकारले, गोडसेंची प्रशंसा केली आणि भाजपच्या खासदार म्हणून त्या संसदेत विराजमान आहेत. चुकीच्या वेळी बेताल वक्तव्य करून अत्यंत उच्चपदावर बसलेल्या मनोज सिन्हा यांनी गांधींवर केलेला हल्ला हा या संपूर्ण प्रचाराचाच एक भाग म्हणून पाहायला हवा. आजच्या भारतातील ज्या पिढीने गांधींना पाहिले नाही किंवा स्वातंत्र्यलढय़ाचा त्रास सहन केला नाही, त्या पिढीला नेहरू आणि गांधींविरुद्ध फसवणे अवघड नाही. जिथे संपूर्ण पिढी समाजमाध्यमांवर भाडोत्री खोटे बोलणाऱ्यांचे शब्द अक्षरश: डोक्यावर घेते तिथे इतिहासातील सर्वात महान व्यक्तींचे मूर्तिभंजन आणि त्यातल्या त्यात वाईटाचा गौरव करणे सोपी गोष्ट आहे. नवी पिढी द्वेष करू लागली, तर गांधी-नेहरूंच्या विचारसरणीविरोधात निवडणुका जिंकणे सोपे होईल आणि आज त्याच उद्देशाने विविध प्रयत्न सुरू आहेत.

  • तुषार अशोक रहाटगावकर, डोंबिवली