लोकशाहीच्या नावाखाली देश, विदेशांत फुशारकी मिरवण्यात मग्न असणाऱ्या या आंधळय़ा-बहिऱ्या सरकारला मणिपूरमधील नग्न स्त्रीवरील अत्याचाराविषयी कळण्यास दोन महिने लागले, यावरून सरकार किती गांभीर्याने नागरिकांचा विचार करते, याचा अंदाज येतो. अमेरिका, फ्रान्समध्ये लोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपले जळणारे घर कसे वाचवता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. मणिपूर अडीच महिने धुमसत असताना सरकार त्याबद्दल बोलण्यासाठी या महिलांवर अत्याचार होण्याची वाट पाहत होते का, असाही प्रश्न पडतो. शेतकऱ्याचे आंदोलन असो, फरफटत नेलेल्या भारताच्या महिला खेळाडू असोत किंवा मणिपूरची किळसवाणी घटना, सरकारला जनतेचा आवाज ऐकण्याची सवय नाही. फक्त जनतेने आपली ‘मन की बात’ ऐकावी असा आग्रह मात्र आहे, असेच दिसते. असा बोगसपणा किती दिवस सहन करायचा?

‘बनाना रिपब्लिक’ सारखी स्थिती

मणिपूरमधील मैतेई जमातीला राजाश्रय लाभला आहे का, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. प्रामुख्याने ख्रिस्ती असलेल्या कुकी जमातीवर अन्याय होत असताना, इंटरनेटबंदी लादून ‘आम्ही नागडे आहोत पण तुम्हाला दाखवणार नाहीत,’ अशी सोय करण्यात आली आहे. हे फक्त मणिपूरपुरतेच सीमित नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या अध्यक्षांसह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भारतातील गोरक्षकांकडून होणाऱ्या हत्या आणि मानवाधिकाराच्या उल्लंघनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी भारतातली लोकशाही किती सुदृढ आहे, असे सांगत सारवासारव केली. मणिपूरमध्ये दोन महिने धुमसत असलेल्या हिंसाचाराबाबत युरोपीय संघटनेने केलेले मतप्रदर्शन ही आमच्या अंतर्गत प्रश्नांत ढवळाढवळ आहे, ही नेहमीची तकलादू भूमिका आपल्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे मांडली गेली. दिवसाढवळय़ा आणि कायद्याच्या रक्षकांच्या उपस्थितीत मणिपूरमधील स्त्रियांवर झालेल्या अत्याचारामुळे भारत अराजकतेची आगरे समजल्या जाणाऱ्या ‘बनाना रिपब्लिक’ देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

  • दीपक मच्याडो, वसई

अशा वेळी यंत्रणा काय करत असतात?

‘नागडे कोण?’ हे संपादकीय (२१ जुलै) वाचले. देशात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगितले जाते, पण महिलांविरोधातील हिंसाचाराच्या, त्यांच्या शोषणाच्या अनेक घटना देशात वारंवार घडतात. अशा वेळी या यंत्रणा नेमक्या कोणते कार्य करत असतात? घटना घडून जवळजवळ तीन महिने होत आल्यानंतर तिची दखल घेतली जाते, हे अत्यंत भयावह आहे. समाज या गोष्टी पाहत राहतो आणि शासन निषेध व्यक्त करत राहते. समाजाने मानसिकता बदलली पाहिजे आणि शासनाने खरोखरच काम  करेल अशी महिला सुरक्षा यंत्रणा उभारली पाहिजे.

  • आशुतोष वसंत राजमाने, पंढरपूर (सोलापूर)

नव्या संसद भवनात तरी याचे उत्तर द्या

मणिपूर येथे भयानक अत्याचार होत आहेत, महिलांची नग्न धिंड निघत आहे, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होत आहेत आणि इतरत्र सर्व जण आपापल्या कामात मश्गूल आहेत. केवळ ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’सारख्या घोषणा देऊन राजकीय स्वार्थ साध्य करणे योग्य नाही. देशाचे पंतप्रधान ७८ दिवसांनी यावर भाष्य करतात, हे दुर्दैवच आहे. समान नागरी कायदा नंतर आणा पण त्याआधी मणिपूरमधली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळा. किमान नूतन संसद भवनात तरी नागडे कोण, या प्रश्नाचे उत्तर द्या.

  • विशाल नडगेरी, सोलापूर

गप्प बसणे हेही पाठबळच!

मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात घडलेली निर्घृण घटना समाजमाध्यमांवरून प्रसारित झालेल्या व्हिडीओमुळे जनतेला कळते आणि तब्बल अडीच महिने उलटल्यानंतर गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होते. मणिपूर अडीच महिने जळत असताना त्याविषयी अवाक्षरही न काढणारे आपले पंतप्रधान हा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर पहिल्यांदा मणिपूरचा उल्लेख करून काही वक्तव्य करतात, याला काय म्हणावे. जे त्या राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आहेत, ते हिंसाचार थोपवताना दिसत नाहीत. गप्प बसणे हेही पाठबळच असू शकते. या घटनेचा आणि त्याभोवती घडणाऱ्या राजकारणाचा जेवढा निषेध करू तेवढे कमी ठरेल. 

  • दीपक सांगळे, शिवडी (मुंबई)

आत्मपरीक्षण आवश्यक!

एकीकडे स्त्रीला देवत्व बहाल करायचे आणि दुसरीकडे तिला फक्त उपभोग्य वस्तू म्हणून पाहायचे. मणिपूरमधील घटनेचे वृत्त देशाला समजायला अडीच महिने लागतात, यावरून हा किती गौण मुद्दा आहे हे लक्षात येते. समाज म्हणून आपणच कमी पडत आहोत का, आपली अधोगती होऊ लागली आहे का, याचे आत्मपरीक्षण सर्वानीच करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याबाबत काही होत नाही, तोपर्यंत शांत बसण्याची मनोवृत्ती घातक आहे. अशा घटना घडूच नयेत म्हणून आपण काय करणार, यावर विचार व्हायला हवा. सर्वच गोष्टी वेळेवर सोडून चालणार नाही. ‘आपल्याला काय त्याचे?’ असा प्रश्न पडत असेल, तर आपल्यात ‘माणूस’ म्हणून काहीतरी कमतरता आहे, हे निश्चित!

  • पूजा सांगळे, सिन्नर (नाशिक)

पुरुषांनी अंतर्मुख होऊन विचार करावा

महाभारतातील पणाला लावलेल्या अपमानित द्रौपदीपासून आजच्या काळातील फूलनदेवी, बिल्किस बानो, कथुआतील आसिफा, महिला मल्ल, आताच्या मणिपुरी भगिनी व पुढीलही कित्येक दुर्दैवी! घटना घडवणारे, घडू देणारे, मौन बाळगणारे आणि समाजमाध्यमांतील क्लिप पुन्हा पुन्हा पाहणारे, सारेच दोषी आहेत! प्रत्येक पुरुषाने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. बदल घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा याचीच पुनरावृत्ती होत राहील.

  • अरुण जोगदेव, दापोली

डबल इंजिन विकास असा असतो?

‘नागडे कोण?’ हे संपादकीय (२१ जुलै) वाचले. डबल इंजिन म्हणजे विकास, असे दावे केले जातात; पण मणिपूरमध्ये डबल इंजिन असूनही ते राज्य भकासच होताना दिसत आहे. हिंसाचार रोखण्यात केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे अपयशी ठरली आहेत. याला जबाबदार असणाऱ्यांना योग्य शासन व्हावे. केंद्र सरकारने मणिपूरचे राज्य सरकार आता तरी बरखास्त करावे. 

विकासाचे वास्तव उघड

देशाचा विकास, आत्मनिर्भरता, विश्वगुरू यावर छातीठोक दावे केले जात आहेत. मात्र याच देशाच्या आर्थिक राजधानीपासून अवघ्या ५६ किलोमीटरवर, ४० घरांची, २२८ लोकसंख्येची वस्ती असते आणि तिथे वीज नाही, तिथवर पोहोचण्यासाठी रस्ता नाही, हे त्या वस्तीवर दरड कोसळल्यानंतर, तिथे मुख्यमंत्री आणि एनडीआरएफची तुकडी पोहोचल्यानंतर कळते, याला काय म्हणावे? एनडीआरएफचे जवान कुदळ-खोऱ्याने दरड उपसत होते. पावसामुळे अनेक वेळा मदतकार्य थांबवावे लागले आणि बघता बघता १६ बळी गेले. ही वस्ती एखाद्या दुर्गम भागात असती तर समजण्यासारखे होते; परंतु ही वस्ती मुख्य रस्त्याला जोडून आहे. या वास्तवाने आपल्या विकासाचे वास्तव उघड केले आहे.

  • अरुण नामदेव कांबळे, नेरुळ (नवी मुंबई)

आधीच काळजी घेणे गरजेचे

याआधीही माळीण, तळीये येथे दरड कोसळून गाव गाडले जाण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. एकदा अशी घटना घडल्यानंतर तिची अन्यत्र पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काळजी घेतली जाणे, आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे होते, मात्र इरशाळवाडीत आधीच्याच घटनांची पुनरावृत्ती झाली. यापुढे तरी लहान गावांतही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात करणे, घरे डोंगरउतारावर आहेत का, त्यांचे बांधकाम मजबूत आहे का, याची खबरदारी घेणे, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.

  • मिताली मोरे (मुंबई)

निसर्गावर आघात करून केलेल्या प्रगतीचे परिणाम

दळणवळण सुलभ व्हावे म्हणून प्रगत तंत्रज्ञान वापरून भलेमोठे आणि लांबलचक बोगदे खणले जातात, अनेक ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी दगड खाणींचे कारखाने उभे राहातात, प्रचंड वृक्षतोड होते, समुद्रावर पूल बांधले जातात, सिमेंटचे भराव टाकून समुद्रकिनारे बुजवले जातात.. मानव निसर्गावर अक्षम्य आघात करत आहे. याचा परिणाम म्हणजे या दुर्दैवी घटना.

  • सुधीर कनगुटकर, वांगणी