असरानी गेलेयानिमित्ताने हिंदी चित्रपटांतील सहायक भूमिकांचा इतिहास जरा आठवून पाहा… राज कपूरच्या चित्रपटांत प्रेमनाथ असणारच, गुरुदत्तला रेहमानची साथ हवीच आणि जॉनी वॉकर तर अनेक दिग्दर्शकांना हवा; जॉनी वॉकर यांच्या तोंडी गाणेसुद्धा हवे, असाही एक जमाना होता. त्यानंतरच्या काळात टुनटुन, जगदीप, केस्टो मुखर्जी, शक्ती कपूर, कादर खान यांच्यासारख्यांना विनोदी भूमिका मिळत राहिल्याच, पण त्या एका छापाच्या होत्या. काही जणांबाबत तर निरुपा राय आईच, इफ्तिकार किंवा जगदीश राज इन्पेक्टरच, सप्रू धनाढ्य भूमिकेतच, एकेकाळचा देखणा नायक अजित हा अहंमन्यपणामुळे हास्यास्पद ठरणारा खलनायकच… असे एकसाचीकरण होत गेले आणि प्रेक्षकांनीही ते स्वीकारले. या अशा काळातही डेव्हिड, देवेन वर्मा आणि असे काही जण कितीही लहान भूमिकांत असले तरी भूमिकेला न्याय देऊन आपापली छाप कायम ठेवायचे. या अशा थोड्यांपैकी असरानी होते. त्यांना मिळणाऱ्या भूमिका कितीही लहान असल्या, चित्रपटाच्या पोस्टरांवर त्यांचे चेहरे असले किंवा नसले, या कथानकामधला कारक घटक ठरणारे खलनायकाचे स्थानही या भूमिकांना नसले, तरी एखादा चित्रपट आठवताना नायक- नायिकांसह या सहायक भूमिका करणाऱ्यांचीही आठवण व्हायचीच.

‘तो काळ आता सरला’ असे म्हणण्याची सोयच असरानींनी अगदी आता-आतापर्यंत ठेवली नव्हती. प्रियदर्शनच्या अत्रंग विनोदपटांत असरानी यांनी वयाच्या पंच्याहत्तरीनंतरही सहायक भूमिका केल्या. त्या भूमिकांतही ते स्वत:च्या सर्व वैशिष्ट्यांसह वावरले. त्यापैकी पहिले वैशिष्ट्य म्हणजे कर्कश वाटणारा, टिपेचा पण काहीसा एकसुरी आवाज! त्या आवाजाला नुसत्या स्वरयंत्राचीच नव्हे तर इतिहास-भूगोलाचीही जणू पार्श्वभूमी होती… गुजरातच्या उत्तर भागापासून पुढे सिंध प्रांतापर्यंत आवाजाची ही पातळी सहजपणे गाठू शकणारे लोक अनेक. ती बहुधा त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या जीवनसंघर्षाची खूण. त्याच टापूतल्या जयपूरहून गोवर्धन असरानी हा तिथला ‘रेडिओ आर्टिस्ट’ असलेला, आकाशवाणीवरल्या नभोनाट्यांत सहभागी होणारा तरुण आधी मुंबईत आला आणि टक्केटोणपे खाण्यापेक्षा पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि चित्रवाणी संस्थेत जा, हा सल्ला ऐकून पुण्याच्या भारतीय चित्रपट व चित्रवाणी संस्थेत (एफटीटीआय) मध्ये पोहोचला. तिथे डेव्हिड धवन, जया भादुरी, डॅनी डँझोपा आदींसह शिकला आणि अर्थातच, कामाच्या शोधात मुंबईच्या जुहू आदी भागात खेटे घालू लागला. त्याच वर्षी ‘हम कहाँ जा रहे है’सारख्या- फक्त गाण्यांपुरत्याच लक्षात राहणाऱ्या चित्रपटात कुणा विद्यार्थ्याची भूमिकाही मिळवली, पण पुढल्या तीन वर्षांत मात्र दरवर्षी एखाद्या चित्रपटाच्या पुढे गाडे गेले नाही. सन १९७१ मध्ये हृषीकेश मुखर्जींच्या ‘गुड्डी’तल्या शीर्षक-भूमिकेतून जया भादुरी यांना जशी करिअरची वाट मिळाली, तशीच असरानी यांना ‘हीरो होण्यासाठी आलो पण ‘एक्स्ट्रा’ म्हणूनच राहिलो’ अशा भूमिकेतूनही मिळाली.

‘गुड्डी’त बारीक चणीच्या असरानींनी रंगवलेल्या या भूमिकेतून, स्वीकाराव्याच लागलेल्या बिचारेपणातही त्या तरुणाची खदखद दिसली, तर १९७३ सालच्या ‘अभिमान’मध्ये प्रथितयश गायकाचा बनचुका व्यवस्थापक या भूमिकेतही त्या गायकाशी असलेले मैत्रीचे नाते दिसले. असे वैविध्य दाखवण्याची संधी हळूहळू कमी होत गेली, हे खरे. त्यासाठी १९७५ सालचा ‘शोले’ही कारणीभूत ठरला! या चित्रपटातला ‘अँग्रेजों के जमाने का जेलर’ भित्रा आहे… तुरुंगातून कैदी पळाले असतानाही, ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, और बाकी हमारे साथ चलो’ म्हणत हशा कमावणारा आहे. ‘द ग्रेट डिक्टेटर’मधल्या चार्ली चॅप्लिनसारख्या वेशभूषेमुळे आणि कुर्रेबाज आवाजामुळे लोकांच्या लक्षात राहणाराही आहे… पण अभिनयावर भडकपणाचा शिक्काही ‘शोले’ने कायम केला. पुढे ‘चला मुरारी हिरो बनने’ (१९७७) या स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे ते नायक होते. तो यथातथाच चालल्यावर ते गुजराती चित्रपट निर्मितीकडे वळले आणि तिथे नायक ठरले. अभिनयातला काहीसा भडकपणा तिथे खपून गेला. या भडकपणाचा पुरेपूर वापर प्रवासी बॅगांचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीने केला होता… तिच्या जाहिरातीत बॅग दूर फेकून देऊन, ‘ट्रेन से गिरा पर खरोंच तक नही आई’ म्हणणारे असरानी काहींना आजही आठवत असतील.

हा काहीसा अंगभूत भडकपणा आणि तरीही अभिनयाची जाण यांचे रसायन असरानी यांनी सांभाळले कसे, या प्रश्नापेक्षा त्यांचा उत्साह वाढत्या वयातही टिकला कसा, याचे उत्तर अधिक सोपे. पण दोन्हींच्या उत्तरांमध्ये, लोकांच्या लक्षात राहील असा अभिनय करण्याची ऊर्मी हा धागा समान आहे. खळाळत्या झऱ्याचा आवाज सतत ऐकताना त्रासही होईल, पण तो दूर गेल्यावर त्याचा खळाळच आठवत राहील, असे असरानींच्या जाण्याने झाले आहे.