भाजपेतर ‘इंडिया’ आघाडीतील बिनसलेल्या जागावाटपाच्या राज्यांमध्ये  जम्मू-काश्मीरची भर पडली आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी जम्मू-काश्मीरमधून ‘इंडिया’मध्ये दोन पक्ष सामील झाले आहेत. फारूख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी. दिल्लीतील सभेमध्ये अब्दुल्ला आणि मुप्ती दोन्ही सहभागी झाले होते. ‘इंडिया’तील इतर नेत्यांप्रमाणे भाजपविरोधातील ऐक्याच्या या दोघांनीही आणाभाका घेतल्या होत्या. पण, श्रीनगरला परतल्यावर दोन्ही पक्षांचे सूर अचानक बिनसले. खरेतर लोकसभेच्या जम्मू- काश्मीरमधील पाच जागांवर नॅशनल कॉन्फरन्स, ‘पीडीपी’ आणि काँग्रेस या ‘गुपकर करारा’तील तीनही पक्षांनी एकत्र लढणे अपेक्षित होते. पण आता अब्दुल्ला आणि मुफ्ती यांच्या पक्षांनी एकमेकांपासून काडीमोड घेतला आहे. काश्मीर खोऱ्यातील तीनही जागांवर ‘पीडीपी’ स्वतंत्रपणे लढेल.  ‘२०१९ मध्ये खोऱ्यातील तीनही जागा आम्ही जिंकल्या तर त्यातील वाटा तुम्हाला का देऊ’, असे म्हणत ‘पीडीपी’ला नॅशनल कॉन्फरन्सने दूर ढकलले; त्यामुळे ‘गुपकरा’चा संसार मोडला आहे. ‘अब्दुल्लांचा पक्ष तडजोडीस तयार नसेल तर आम्हाला स्वतंत्रपणे लढण्यासाठी पर्याय उरलेला नाही’, असे मुफ्तींचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरमधील भाजपेतर आघाडीतील नव्या रचनेनुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस ही आघाडी पाचही जागा लढवेल. जम्मू विभागातील दोन्ही जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्स खोऱ्यातील तीन जागा लढवेल. पश्चिम बंगाल, केरळ, पंजाबमध्ये ‘इंडिया’तील घटक पक्ष एकमेकांविरोधात लढत असून तसेच आता जम्मू-काश्मीरमध्येही झालेले आहे. विसंगती अशी की एकमेकांविरोधात लढणारे हे सगळे पक्ष दिल्लीतील रामलीला मैदानावरील भाजपविरोधी सभेत एकत्र आले होते!

दिल्लीत ‘इंडिया’तील विद्यार्थ्यांचा जणू शिक्षक नसलेला वर्ग भरला होता, तिथे विद्यार्थ्यांनी म्हणजे ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या नेत्यांनी आवेशात भाषणे केली. वर्ग संपल्यावर विद्यार्थी जशा टवाळक्या करतात, तशा ‘इंडिया’तील घटक पक्षांनीही कुरघोडीचे राजकारणाच्या ‘टवाळक्या’ सुरू केल्या असे म्हणावे लागते. भाजप लोकशाहीवर घाला घालतो, भाजपचे नेते संविधान बदलण्याची भाषा करतात, काँग्रेसची बँक खाती गोठवून टाकली होती, अरिवद केजरीवालांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अटक केली गेली. विरोधकांची इतकी प्रचंड गळचेपी होत असताना आणि भाजप हाच प्रमुख शत्रू असताना ‘इंडिया’तील घटक पक्ष आपापल्या राज्यांत जाऊन एकमेकांवरोधात शड्डू ठोकून का उभे आहेत, हा प्रश्न भाजपविरोधी सुज्ञ व्यक्तीला पडू शकतो. ‘आम्ही सगळे एकत्र’, असे दिल्लीत छातीठोकपणे सांगायचे पण, प. बंगालमध्ये लोकसभेतील काँग्रेसच्या गटनेत्याविरोधात उमेदवार उभा करायचा, ही टवाळखोरी तृणमूल काँग्रेसने केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्याआधीच काँग्रेसच्या पोटात कोपर मारून ठाकरे गटाने सांगली, मुंबई उत्तर-पश्चिम अशा जागांवर उमेदवार जाहीर करून टाकले. दिल्लीत आम आदमी पक्ष व काँग्रेस एकत्र येतात पण, पंजाबमध्ये ते एकमेकांना नकोसे झाले आहेत. ‘इंडिया’तील नेत्यांना भाजप खरोखरच नको, त्याविरोधात लढले पाहिजे हेही कळते. पण, या पक्षांत असुरक्षितता इतकी की, त्यांना महाआघाडीतील अन्य पक्षासाठी थोडा देखील राजकीय अवकाश (स्पेस) द्यायचा नाही. दुसऱ्याने आपल्याला कोपर मारून ढकलले तर आपले काय होणार, ही भीती ‘इंडिया’तील प्रत्येकाला वाटते. 

Arvind Kejariwal PA Beats Swati Maliwal Fights In Viral Video
केजरीवालांच्या पीएची स्वाती मालीवाल यांना मारहाण? भयंकर हाणामारीचा Video चर्चेत पाहा लोकांची नेमकी चूक काय झाली?
Arvind Kejriwal, Modi, BJP,
केजरीवालांच्या ‘पंचाहत्तरी’च्या यॉर्करमुळे भाजपची दाणादाण
Devendra Fadnavis
“सदाभाऊ यावेळी संधी पक्की, पण पुढच्या वेळी…”; देवेंद्र फडणवीसांचं शिंदे गटाच्या नेत्याबाबत मोठं विधान
vijay wadettiwar, Shivsena, protests,
वडेट्टीवार यांच्या पोस्टरला चपलांचा हार; यवतमाळात शिवसेनेचे निषेध आंदोलन
Sanjay Raut on Ajit pawar (1)
“मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजाने…”, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, “एका गृहिणीला…”
Blinken calls for handling differences responsibly in talks with Xi jinping
मतभेद जबाबदारीने हाताळावेत! जिनपिंग यांच्याबरोबरच्या चर्चेत ब्लिंकन यांचे आवाहन; चीनचा सहमतीवर भर
Giriraj Singh interview issue of Kashi Mathura and Ayodhya Lok Sabha Election 2024
काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप
Dharamrao Baba Atram vijay wadettiwar
“विजय वडेट्टीवारांनी भाजपा प्रवेशासाठी…”, धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ भेटीचा खुलासा करत म्हणाले…

‘इंडिया’ नावाच्या वर्गात विद्यार्थ्यांना कोणाचीही कशीही खोडी काढता येते, कोणीच रागावणारे नाही, कोणाचा वचक नाही. काँग्रेस हा सगळय़ांमध्ये मोठा असला तरी सातत्याने नापास होत असल्याने त्याला वर्गात नाईलाजाने बसावे लागले आहे. त्याचे कोणी ऐकत नाही. मग, मास्तर नसलेल्या वर्गात गोंधळाशिवाय काहीही होत नाही. याउलट भाजपच्या वर्गात सगळे मोदी-शहा छडी घेऊन उभे असल्याने शिंदे असोत नाही तर अजित पवार सगळय़ांना मान खाली घालून वावरावे लागते. हिंगाली, वाशिम-यवतमाळ दोन जागा शिंदे गटाला दिल्या असल्या तरी मास्तरांनी ‘तुमचा उमेदवार बदला’, असा आदेश दिल्यावर त्या आज्ञेचे पालन करावे लागते. या वर्गातील अतिशिस्त बंडाला उद्युक्त करू शकेल हा भाग वेगळा. पण, ‘इंडिया’च्या वर्गात किमान शिस्त तरी असली पाहिजे अशी अपेक्षा बाळगली तर चुकले कुठे?