झुम्पा लाहिरींनंतर अमेरिकेतील ‘नॅशनल बुक अॅवॉर्ड’च्या लघुयादीपर्यंत पोहोचलेली भारतीय लेखिका, तिच्या कादंबरीची निवड ‘ओप्रा विन्फ्री बुक क्लबा’त झाल्यामुळे चर्चेत आहे. काय आहे त्या कादंबरीत?

अमेरिकेतले ‘नॅशनल बुक अॅवॉर्ड’ हे पुरस्कार फक्त अमेरिकनांनाच मिळतील, ही अट २०२४ पासून शिथिल केली खरी; पण यंदाही या पुरस्कारांच्या लघु-यादीत सर्व २५ लेखक अमेरिकनच आहेत. लघुयादी अर्थातच निवडक पाच पुस्तकांची असते, पण ललित, ललितेतर, काव्य, बालवाङ्मय आणि अनुवादित साहित्य अशा पाच विभागांसाठी प्रत्येकी पाचपैकी एका विजेत्याला १० हजार डॉलर (सुमारे आठ लाख ७७ हजार ९५० रुपये) तर उरलेल्या चार-चार जणांना प्रत्येकी एक हजार डॉलर (सुमारे ८७, ७९५ रु.) असं या ‘नॅशनल बुक अॅवॉर्ड’चं स्वरूप असतं. मेघा मजुमदार यांच्या ‘अ गार्डियन अॅण्ड अ थीफ’ या कादंबरीचा समावेश यंदाच्या ललितगद्या लघुयादीत झाल्याचं कौतुक भारतात होतं आहेच, पण ही कादंबरी भारतातच- कोलकात्यात घडणारी असल्यामुळे अमिताव घोष, झुम्पा लाहिरी या बंगाली लेखकांच्या पंक्तीत आता मेघा मजुमदार यांना बसवलं जातं आहे. लाहिरी यांच्या ‘लोलॅण्ड’ या कादंबरीला २०१३ मध्ये (बुकर लघुयादीप्रमाणेच) ‘नॅशनल बुक अॅवॉर्ड’च्याही लघुयादीत स्थान मिळालं होतं. त्यानंतर या लघुयादीपर्यंत पोहोचलेल्या मजुमदार या पहिल्याच अमेरिकी-भारतीय. वयाच्या १९ व्या वर्षी- २००५ मध्ये त्यांनी भारत सोडला, तेव्हापासून त्या अमेरिकावासी आहेत. त्यांची ही दुसरी कादंबरी. पहिल्या ‘अ बर्निंग’ (२०२०) या कादंबरीचंही बऱ्यापैकी स्वागत झालं होतं. मात्र दुसऱ्या कादंबरीला मिळणारा प्रतिसाद अधिक आहे. ही कादंबरी भारताबद्दल ‘माहिती देणारी’ म्हणून पाहिली जाण्याचा धोका असला तरी, ती कोलकात्यातल्या कल्पित दुष्काळाबद्दल, त्यापासून आपल्या कुटुंबाला वाचवू पाहाणाऱ्या एका स्त्रीबद्दल आणि तिचा तो प्रयत्न अपयशी करणाऱ्या परिस्थितीबद्दलही आहे.

ही ‘परिस्थिती’ एका चोराच्या रूपानं कादंबरीत येते. ती कशी, हे नंतर पाहू. पश्चिम बंगालमधल्या दुष्काळाचं कल्पित चित्र साकार करताना लेखिकेनं त्याचा संबंध वातावरणीय बदलांशी जोडला आहे. दुष्काळामुळे महागाई टिपेला पोहोचली आहे. इतकी की, एका स्वयंसेवी संस्थेच्या आश्रयगृहामध्ये नोकरी करणारी मध्यमवर्गीय स्त्री- कादंबरीतली ‘मा’- त्या आश्रयगृहाच्या मुदपाकखान्यात पोषण आहारासाठी ठेवलेला बराच सुका मेवा लहानग्या मुलीसाठी आणि वृद्ध सासऱ्यांसाठी उचलून आणते- कुणालाही न सांगतासवरता. एरवी ही ‘मा’ असं काही करणाऱ्यांतली नव्हती आणि नाही. तिचा नवरा अमेरिकेत आहे. खास ‘क्लायमेट रेफ्यूजी’ म्हणून त्यानं आपली पत्नी, मुलगी आणि वडिलांसाठी व्हिसा मिळवलाय (कुणालाही आजच्या काळात, असा व्हिसा मिळणं हाच या कादंबरीतला सर्वांत कल्पनारंजित भाग वाटेल! असो.)- त्यामुळे हे तिघेही जण लवकरच कोलकाता सोडून अमेरिकेला जाणार आहेत. तिथं जाण्याची सगळी तयारी ‘मा’ एकटीच करते आहे, हे करताना थकून गेली तरी पुढली स्वप्नं तिला खुणावताहेत. ती दिवसच मोजते आहे… आणखी सात दिवसांनी- आजच्या आठा दिवसात ती विमानात असेल… मग अमेरिका!

या शेवटून सातव्या दिवशी कादंबरी सुरू होते आणि सात दिवसांतच संपते. एकेका दिवसाचं एकेक प्रकरण. त्यातल्या दुसऱ्या प्रकरणात, म्हणजे सहाव्या दिवशी नायिकेच्या घरी चोरी होते.

कसली चोरी? प्रामुख्यानं खाद्यापदार्थांचीच. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वयंपाकघराची खिडकी उघडी पाहून चोर आत शिरतो. बरोब्बर सुकामेवाच उचलतो. तो ठेवायला म्हणून, नायिकेनं स्वयंपाकघरातच ठेवलेली पर्स सुकामेव्यानं ओतप्रोत भरतो आणि पर्स घेऊनच निघून जातो.

हा चोर म्हणजे बूम्बा. तो मुळात चोर नाही. कारागीर आहे. पण आता नोकरी नाही, काहीच रोजगार नाही. कोलकात्याजवळच गरीबवस्तीत राहातो. त्यालाही वयस्कर वडील आहेत, पण लहान भावाला- रबि याला आता आपल्याशिवाय कुणीच सांभाळणारं नाही याची जाणीव बूम्बाला आहे. या बूम्बानं नायिकेला, आश्रयगृहाच्या मुदपाकखान्यातून सुकामेवा पळवताना पाहिलेलं आहे. त्यामुळेच तो नेमका तिच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलाय.

पण त्यानं पर्स नेल्याचं कळताच नायिकेचं त्राण गेलंय. वेडीपिशी झालीय ती. काय करू आता- त्या पर्समध्येच तर तिघांचेही पासपोर्ट होते… अमेरिकी व्हिसासह! पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा अनुभव नायिका घेतेच. पण गेलेला पासपोर्ट आणि व्हिसा इतक्या कमी दिवसांत पुन्हा मिळवता येईल का, यासाठीही प्रयत्न करू लागते. त्यातून नोकरशाहीच्या दशावतारांचं दर्शन तिला घडतं. कुणीतरी सांगतं – बनावट कागदपत्रं करून मिळतात जशीच्या तशी! त्याही मार्गाला ती जाते. पण हे काही खरं नाही, असं वेळीच तिच्या लक्षात येतं.

मेघा मजुमदार या समाजविज्ञानाच्या अभ्यासक आहेत. त्यांची पदवी मानव-अभ्यासशास्त्रात (अँथ्रॉपॉलॉजी) आहे. स्वत:च दोन दशकं अमेरिकेत राहून भारतात ये-जा केल्यामुळे ‘अमेरिकेला जाण्याची भारतीयांची आस’ या विषयाचा त्यांचा अभ्यासही पक्का आहे. हा अभ्यास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना कथानकाचाच आधार उपयुक्त ठरला. या कथानकात अर्थातच वेगवान घडामोडी घडतात.

अवघ्या तीन-चार दिवसांत नायिकेनं आकाशपाताळ एक केल्यामुळे पोलीस बूम्बापर्यंत पोहोचतात. पण बूम्बाला या पासपोर्ट व्हिसाची किंमतच कळलेली नसल्यानं या कागदांची विल्हेवाट त्यानं लावलेली असते. कादंबरीचा शेवट कुणाला ‘शोकान्त’ वाटेल, कारण बूम्बा तर जिवानिशी जातो आणि नायिकेची स्वप्नं विरून जातात. पण ही निव्वळ कथानकाची अखेर. वास्तव यापेक्षा दाहक आहे- स्वत:ची सोय पाहाणारा मध्यमवर्ग आणि कुणाच्याही खिजगणतीत नसलेला सर्वहारा यांच्या या कथानकात कुणाचा शोकान्त शेवट वाचकांना आपला वाटणार आहे? कादंबरीतली चोरी ही पोट भरण्याच्या गरजेपोटी झालेली असली तरी नायिकेची संधी त्यामुळे हुकली, हे जरी खरं असेल तर प्रत्यक्षात कुणाची संधी कोण हिरावून घेतं आहे, अशा प्रश्नापर्यंत ही कादंबरी आणून सोडते.

अलीकडेच ‘ओप्रा विन्फ्री बुक क्लब’ मधलं ११९ वं पुस्तक म्हणून या कादंबरीची निवड झाली, ओप्रासह मेघा मजुमदार यांच्या मुलाखतीचे व्हिडीओही यूट्यूबवर झळकू लागले. त्यामुळे या कादंबरीचा बोलबाला वाढला. ‘नॅशनल बुक अॅवॉर्ड’ची घोषणा १९ नोव्हेंबरला होईल, तेव्हाच ही प्रसिद्धी कितपत कामी आली हेही कळेल.

अ गार्डियन अॅण्ड अ थीफ’

लेखिका : मेघा मजुमदार

प्रकाशक : पेंग्विन बुक्स,

पृष्ठे : २२४ ; किंमत : ६९९ रु.