भारत लेचापेचा नाही…

‘तू नही और सही… और नहीं!’ या संपादकीयात (२९ ऑगस्ट) अमेरिका, चीन, रशिया, भारत यांच्यामधील परस्पर संबंधांवरील ऊहापोह योग्य. परंतु भारत आणि अमेरिकच्या संबंधात व्यक्त होत असलेली धास्ती ही सकृद्दर्शनी ठीक आहे. याचा खोलवर विचार होणे गरजेचे आहे. चीन, रशिया ही राष्ट्रे अमेरिकला शह देणारी असल्यामुळे अमेरिका त्यांच्याशी अधिक नरमाईने आणि सौहार्दपणाचे धोरण राबवत आहे. पण भारताशी कुठलेही शत्रुत्व नसताना टॅरिफचा बडगा भारतावर उपसला गेला आहे. अमेरिका आपले मित्रराष्ट्र आहे हे जाहीर करतानाच आपण देशहितासंबंधात कुठल्याही राष्ट्राच्या दबावाखाली येणार नाही हेही भारताने स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात महागड्या डॉलरचा धसका घेण्याच्या तसेच चीनसारख्या हितशत्रूशी जवळीक साधल्यामुळे उद्भवू शकणाऱ्या धोक्यांना बळी पडण्याएवढा भारत नक्कीच लेचापेचा नाही.

● बिपिन राजे, ठाणे

दुहेरी धोरण आवश्यक!

‘तू नही और सही… और नहीं!’ हा अग्रलेख वाचला. अमेरिकेच्या दबावतंत्रामुळे आपण थेट केवळ चीन – रशिया यांच्याबरोबर जाणे ही घोडचूक ठरेल हे नक्की. कारण अजूनही जागतिक महासत्ता म्हणून अमेरिका आणि तिचे मोठेपण काही अंशी का होईना शिल्लक आहे. तसेच तिच्याविषयी चीन – रशिया यांच्या तुलनेने विश्वासही जास्त आहे. परंतु ट्रम्प यांचे वागणे लक्षात घेता त्यावर उपाययोजनेचा भाग म्हणून या द्वयीशी स्वत:चे संबंध सुधारण्यास आपण सुरुवात करायला हवी. कारण ट्रम्प अजून केवळ चारच वर्षे सत्तेत आहेत हे कागदावर म्हणणे सोपे असले तरी यापुढील काळात ते काय करतील याची खात्री देता येईल का? त्यात भारतीयांविषयीचे त्यांचे धोरण पूर्वग्रदूषित नाही असे कसे म्हणता येईल. बेकायदा भारतीय निर्वासितांना साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत परतवले गेले, यावरून ट्रम्प आणि त्यांचे शासन आपल्याविषयी काय विचार करते हे दिसतेच. त्यामुळे अगदी त्यांच्या कलाकलाने घेऊनही सदर मनुष्य आणि पर्यायाने त्यांचे शासन आपल्या पारड्यात वजन टाकत राहतील याची शाश्वती कोण देऊ शकेल? केवळ आपण ट्रम्प यांच्या कलेकलेने गोष्टी करत गेलो तर आपणही चुकीचे होतो ही प्रतिमा अजून दृढ होऊ शकते. त्याऐवजी अमेरिकेशी बोलणी चालू ठेवून चीन आणि रशिया सोबत आपले व्यापारी आणि राजनैतिक संबंध सुधारण्याकडे आपला कल असावा.

● विघ्नेश खळे, बदलापूर

चरित्र संशोधन समिती नेमावी

‘राजसंन्यास’ वगळण्यातून काय साधणार? हा डॉ. राजेंद्र डोळके यांचा लेख (२९ ऑगस्ट) वाचला. कथा-कादंबरी व नाटककार ऐतिहासिक साहित्यकृतीचे लेखन करताना तत्कालीन संशोधनाचा उपयोग करून घटनांचा कल्पनाविस्तार करतात. हे सर्वच भाषांतील ऐतिहासिक साहित्यकृतीतून दिसून येते. डॉक्टर कमल गोखले यांचे संशोधनपर शिवपुत्र संभाजी व एकदोन ग्रंथ वगळता, इतर साहित्यकृतींनी छत्रपती संभाजींच्या अस्सल चरित्रावर अन्यायच केलेला आहे. कारण त्यांच्या वेळी छत्रपती संभाजींवर मराठ्यांच्या इतिहासात जे लेखन आले होते, तेच मुळात अन्यायकारक होते. पण कालांतराने अनेक तत्कालीन अस्सल संदर्भ दस्तऐवजांच्या अभ्यासानंतर संभाजीचे खरे जीवनचरित्र आज समोर येते आहे. अशा वेळेस नामवंत स्वर्गीय साहित्यिकांचे साहित्य, शासन पुरस्कृत संस्थांनी खंड प्रकाशित करताना हे तारतम्य बाळगण्यास काय हरकत आहे? किंबहुना शासनाने छत्रपती संभाजी चरित्र संशोधन समिती नेमावी आणि सत्य चरित्र मराठी जनतेसमोर ठेवण्याचा संकल्प करावा. संशोधनानंतर, जे सत्य येईल त्यानुसार संबंधित साहित्यिकांचे खंड संक्षेपित करावे, बदल करावा किंवा काय हे ठरवावे. हे छत्रपती संभाजींचा चरित्र संशोधक अभ्यासक म्हणून मला विनयपूर्वक नमूद करावेसे वाटते.

● हेमंत चोपडे, नाशिक

हे वक्तव्य इतरांचे असते तर?

‘भारतात इस्लाम असणारच. त्याच्याशिवाय देश असू शकत नाही. असा विचार करणारा हिंदू विचारांचा असू शकत नाही.’ असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्ली येथे केल्याचे वाचले. (लोकसत्ता:२९ ऑगस्ट) त्यांच्या या विचारांचे स्वागत करतानाच मनात विचार येतो की, भाजपसकट अन्य हिंदुत्ववाद्यांना त्यांचे हे विचार पटणे, पचनी पडणे शक्य आहे का? हेच वक्तव्य बिगरभाजप नेत्याने केले असते तर त्याला किती आणि कशा टीकेला सामोरे जावे लागले असते? भागवत पुढे असेही म्हणाले की, ‘भारतीय मुस्लीम अरब वा तुर्क नाहीत, ते भारतीय आहेत हे त्यांना कळले तर हिंदूंबद्दल विश्वास निर्माण होईल. त्याची हिंदू समाज वाट पाहात आहे.’ मात्र त्यांचे हे अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य मुस्लिमांनी जसे समजून घ्यायला हवे, तसे ते आधी बहुसंख्य म्हणून हिंदूंनी, विशेषत: हिंदुत्ववाद्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.

● अनिल मुसळे, ठाणे