‘देवेंद्रजी, या ‘पापा’ला क्षमा नाही’ हा लेख (१९ जून) वाचला. असे बरेच प्रसंग याआधीही घडले आहेत, परंतु बडगुजर यांना पक्षात घेऊन भाजपने जो अगोचरपणा केला त्याला तोड नाही. आपल्याच पक्षातील नितेश राणे यांना पुढे करून बडगुजर यांच्यावर शाब्दिक वार करायचे आणि त्यांना तोंडावर पाडून बडगुजर यांना स्वच्छ करून पक्षात स्थान द्यायचे हा शुद्ध दुटप्पीपणा झाला. याआधी किरीट सोमय्या यांच्यावर हा प्रयोग करून झाला होताच. निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने काहीही करण्यास मोकळे रान मिळाले, असा भाजपचा समज झालेला दिसतो. लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’चा नारा एका भाजप नेत्याच्या असंबद्ध भाषणामुळे फोल ठरला होता. आता यातून भाजप काही शिकणार की, मी करीन तीच पूर्वदिशा हे धोरण अवलंबणार?- नंदकुमार पाटकर, मुलुंड (मुंबई)
हे नैतिकतेला धरून नाही
‘अखंड भारत हेच उत्तर’ हे संपादकीय वाचले. भाजपने पूर्वी ज्यांच्यावर टीका केली त्यांनाच तो पक्ष आता सामावून घेत आहे.आपल्या संघटनेत कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही, हे ठरविण्याचा प्रत्येक पक्षाला पूर्ण अधिकार आहे. पण प्रश्न हा आहे की, एकीकडे पक्ष भ्रष्टाचार, गुन्हेगारीविरोधी भूमिका घेतो आणि दुसरीकडे अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तींना बिनदिक्कत सामावून घेतो, हे दुटप्पी धोरण स्पष्टपणे दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच पक्षात स्थान देणे, हे नैतिकतेला धरून नाही.- प्रशांत रॉड्रिग्ज, विरार
तळाच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण
‘अखंड भारत हेच उत्तर!’ हा अग्रलेख आणि ‘देवेंद्रजी, या ‘पापा’ला क्षमा नाही…’ हा रघुनंदन भागवत यांचा लेख वाचला. महाराष्ट्रात भाजपकडे निर्विवाद बहुमत आहे, संघविचारांशी बांधील कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फौज आहे, असे असूनही पक्षवाढीचा सध्याच्या राज्यकर्त्यांचा प्रयत्न अत्यंत अयोग्य आहे. असे पक्षप्रवेश तळाच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करणारे आहेत.- सुभाष थरवळ, रत्नागिरी
निव्वळ सामाजिक पाप!
‘अखंड भारत हेच उत्तर’ हे संपादकीय वाचले. ही जेवढी भाजपला तेवढीच मतदारांनाही लगावलेली चपराक आहे. कारण आम्ही मतदार हे फोडाफोडीचे राजकारण, राजकारण्यांचे पक्षांतर, पुन्हा नवीन पक्षातून निवडून येणे सहन करतो. दिवाणखान्यात चहाबरोबर राजकारणाचे अध:पतन चघळतो, परंतु मतदानावेळी सहलीला निघून जातो. मुख्यमंत्री तर अभ्यासू राजकारण्यापेक्षा मुरब्बी व्यापारी वाटू लागले आहेत. ते राजकारणापेक्षा फोडाफोडी करून निवडणुका जिंकून देण्यात तरबेज झाले आहेत. त्यापलीकडे त्यांची जनमानसात प्रतिमाच राहिलेली नाही. हे पाहताना महात्मा गांधींच्या तत्त्वशून्य राजकारण हे सामाजिक पाप या मताची तीव्रतेने आठवण येते.- नंदकुमार कुलकर्णी, पुणे
केवळ भ्रष्टाचाऱ्यांचीच आयात
‘अखंड भारत हेच उत्तर!’ हा अग्रलेख वाचला. भाजपची काँग्रेसीकरणाकडे भरधाव वेगाने वाटचाल सुरू आहे. जगातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे दावे करणाऱ्या या पक्षाला आणखी किती जणांची आयात करायची आहे? बरे ज्यांची आयात केली जाते, ते विचारवंत अभ्यासू, निष्ठावान राजकारणी असते, तर ठीक होते. परंतु भ्रष्टाचारी, सत्तेसाठी लाचार, अगतिक अशीच माणसे भाजपमध्ये येत राहिली, तर पक्षाची अवस्था काँग्रेससारखी होण्यास वेळ लागणार नाही. वर असणारा कधीतरी खाली येतोच.-0 विवेक चव्हाण, शहापूर (ठाणे)
खरे सूत्रधार कोण?
‘अखंड भारत हेच उत्तर!’ हा अग्रलेख आणि ‘देवेंद्रजी, या ‘पापा’ला क्षमा नाही…’ हा लेख वाचला. भागवत यांच्याप्रमाणेच अनेकांना फडणवीस यांचे प्रशासन आणि कार्यपद्धती आवडते परंतु भाजपमध्ये सुरू असलेल्या ‘असल्या’ पक्ष प्रवेशांचे समर्थन करता येत नाही. विरोधी पक्षांनी भाजपला वॉशिंग मशीन म्हटल्यास त्याच चुकीचे काय? जे पक्षप्रवेश सुरू आहेत त्यातून फडणवीस यांची हतबलता दिसून येतेच आणि यामागचे सूत्रधार कोण आहेत, असा प्रश्नही पडतो.-अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण
सर्व पक्षांतील भ्रष्टाचारी भाजपमध्ये
‘अखंड भारत हेच उत्तर!’ हे संपादकीय वाचले. भय व भ्रष्टाचार हेच भाजप आणि भाजपला समर्थन देणाऱ्या संघटनांचे मुख्य आधार आहेत. सर्व पक्षांतील, सर्व समाजांतील भ्रष्टाचारी, दहशतवादी, कंत्राटदार भाजप सरकारच्या आश्रयाला आले आहेत. त्यातील काही घटनात्मक पदावर बसून ‘सन्माननीय’ ठरले आहेत. भक्त त्यांची मनोभावे पूजा करत आहेत.- नंदन नांगरे
सत्तेसाठी कोणत्याही थराला!
‘अखंड भारत हेच उत्तर!’ हा अग्रलेख वाचला. कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप असलेले, काही तुरुंगातही जाऊन आलेले नेते भाजपमध्ये किंवा भाजपबरोबर जाताक्षणी त्यांच्यावरील खटले जादू झाल्यासारखे नाहीसे होतात. कोणताही भ्रष्ट नेता भाजपमध्ये आला की त्याच्यावरील सर्व खटले बंद होतात, ईडी-सीबीआयमधील फायली तळाशी जातात. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव निर्माण करायचा, आरोप करायचे, ईडीची नोटीस पाठवायची वा नंतर त्याच लोकांना भाजपमध्ये घ्यायचे किंवा त्यांचा पाठिंबा घ्यायचा. सध्या देशभर हाच उद्याोग चाललेला दिसतो. सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.- स्वप्निल थोरवे, पुणे
हिंदीचा इतका पुळका का?
‘हिंदी सक्तीने वादंग!’ ही बातमी (लोकसत्ता- १९ जून) वाचली. दोन-चार राज्ये हिंदी भाषा बोलतात म्हणून ती संपूर्ण देशाची भाषा होत नाही. महायुतीच्या सरकारने विनाकारण हिंदी सक्तीचा मुद्दा कुरवाळत बसू नये. याबाबत दक्षिणेकडील राज्यांचे कौतुक केले पाहिजे! त्यांनी कधीच हिंदी भाषेच्या सक्तीला केराची टोपली दाखवली आहे. महाराष्ट्रानेदेखील याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. हिंदीचे भूत राज्याने आपल्या मानगुटीवरून काढून टाकावे.- श्रीकांत इंगळे, पुणे
महाराष्ट्राला गायपट्ट्यात लोटण्याचा प्रयत्न
‘मागच्या दारातून हिंदीसाठी पायघड्या?’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ अशा पद्धतीने घेतलेला हा मनमानी निर्णय आहे. हा महाराष्ट्राला हिंदी भाषक गायपट्ट्यात लोटण्याचा राजकीय हेतूने घेतलेला अवसानघातकी निर्णय सत्ताधाऱ्यांच्या अंगावर उलटल्याशिवाय राहणार नाही. पहिली ते चौथीपर्यंत केवळ मातृभाषेत शिक्षण देणे हितकारक आहे. त्यामुळे विषयांच्या संकल्पना स्पष्ट होतील. पाया पक्का होईल. अभ्यासाची गोडी लागेल.-डॉ. विकास इनामदार, पुणे
हा राज्यकर्त्यांचा दहशतवादच!
‘गोसेवा आयोगाच्या पत्राचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका’, ही बातमी वाचली (लोकसत्ता- १७ जून). नेहमीच पावसाळ्याच्या सुरुवातीला गुरांच्या बाजारात मोठी उलाढाल होत असते. जनावरे ही शेतकऱ्याची संपत्ती, गरजेला निकड भागवणारी, शिवाय गुंतवणूक करून घरखर्चासाठी पैसे मिळवण्याचे साधन. बेभरवशाचा पाऊस, शेती उत्पादनांचा बाजार या पार्श्वभूमीवर नगद पैसा हातात येण्यासाठी गुरांची विक्री हा एकमेव मार्ग सध्या शेतकऱ्यांकडे आहे. बकरी ईदसारखे सण चांगला दर मिळण्याची हमीच असते. मग मुद्दाम आठवडाभर बाजार बंद ठेवून सरकारने काय मिळवले? मुळात गोसेवा आयोगाच्या कक्षेत शेळ्या-मेंढ्या विक्रीसंदर्भातील निर्णय कसा काय येतो? मुद्दाम बकरी ईदच्या आठवड्यात महाराष्ट्रातील गुरे विक्री बाजार बंद ठेवायला लावणे हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. निव्वळ विशिष्ट समाजाला समज देण्यासाठी हे असले निर्णय शासन घेत आहे. हा राज्यकर्तेनिर्मित दहशतवादच आहे, ज्याचा तीव्र निषेध केला गेला पाहिजे.- प्रदीप पाटील, मुंबई