सर्वत्र फिरता येणे ही मूलभूत गरज आहे आणि तो आपला मूलभूत हक्कही आहे, पण या हक्कावरही निर्बंध आहेत…

दक्षिण आफ्रिकेत लढा देऊन १९१५ साली महात्मा गांधी भारतात परत आले. अनेक वर्षे परदेशी राहिल्यामुळे भारताकडे एका नव्या नजरेने गांधी पाहात होते. भारत समजून घ्यायचा तर देशभर फिरले पाहिजे, देश समजून घेतला पाहिजे म्हणून गांधी देशभर काही ठिकाणी रेल्वेने फिरले तर काही ठिकाणी पायी. वर्षभर काहीही न बोलता सर्वत्र फिरत, लोकांना वाचत गांधींनी देश अनुभवला. काही वर्षांपूर्वी नितीन सोनवणे हा तरुण गांधींकडून प्रेरणा घेत जगभर ४६ देशांमध्ये सायकलवर फिरला. राहुल गांधीही याच विचाराने प्रेरित आहेत, असे दिसते. जग अनुभवणे असो की साध्या सामान्य गरजा पूर्ण करणे असो, सर्वत्र फिरता येणे ही मूलभूत गरज आहे आणि तो आपला मूलभूत हक्कही आहे. संविधानाच्या एकोणिसाव्या अनुच्छेदामध्ये एक महत्त्वाचे स्वातंत्र्य आहे ते संचार करण्याचे. भारताच्या कोणत्याही भागात फिरण्याचे स्वातंत्र्य या अनुच्छेदामध्ये मान्य केले आहे. त्यासोबतच आपणा सर्वांना देशाच्या कोणत्याही भागात स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य आहे. या दोन्हींचा एकत्रच विचार केला जातो, कारण त्या दोहोंचा परस्परांशी थेट संबंध आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sanvidhan bhan south africa mahatma gandhi fundamental rights constitution amy
First published on: 09-05-2024 at 04:57 IST