पहाटे दोनचा सुमार असावा. गाढ झोपेत असलेल्या सदाभाऊंना दारावरच्या टकटकीमुळे जाग आली. आमदार नसल्यामुळे आजकाल रात्रीचे कुणी येत नाही, मग आता कोण असेल असे म्हणत त्यांनी दार उघडले तर त्यांच्याच पक्षाचे दोन विद्यामान आमदार दारात उभे. गेल्या वर्षभरापासून पीएच्या माध्यमातून बोलणारे, व्हीआयपी दर्शनासाठी भरमसाट पत्रे देणारे व अनेकदा थेट फोन करूनही तो न घेणारे ते दोघे बघून भाऊंना मनातून राग आला पण चेहऱ्यावर तो न दाखवता त्यांनी त्यांना आत घेतले.

बोला म्हणताच ते दोघेही एकाच वेळी सुरू झाले. ‘पराभूतांना विसरणे ही राजकारणातील रीतच. त्यानुसार आम्ही वागलो पण आमचे चुकलेच. आम्हाला माफ करा. तुमची ताकद काय ते आम्हाला काल कळले. तेही तुमच्या २० कोटींच्या वक्तव्यातून. भाऊ, विद्यामान असूनही आम्हाला कुणी विचारत नाही हो. शिंदेसाहेब तेवढे चांगले बोलतात पण मंत्री अजिबात ऐकत नाहीत. भाजप व राष्ट्रवादीचे मंत्री तर उभेही करत नाहीत. त्यामुळे सारी कामे रेंगाळलेली. तुम्ही काय जादू केली ते सांगा जरा.’ हे ऐकताच सदाभाऊ आनंदले.

‘हे बघा, राजकारणात जशी विजयाला किंमत असते तशी पराभवालासुद्धा. ती वसूल करता येण्याची कला अंगी असावी लागते. पराभवाची चाहूल लागूनही मी माझा बळी जाऊ दिला व नंतर त्याचे इतके भांडवल केले की नेत्यांना माझी दखल घ्यावी लागली. बाबांनो, राजकारण ही जादूई दुनिया आहे. इथे योग्यवेळी योग्य ते पोतडीतून बाहेर काढावे लागते. पराभव हीच पुन्हा उभारीची संधी असे भासवून मी उद्धवसेनेची भीती नेत्यांना दाखवत राहिलो व निधी पदरात पाडून घेतला.’

यावर त्या दोघातला एक म्हणाला ‘आम्ही तर निवडून आलेलो. मग भीती कुणाची दाखवायची?’ विरोधी सेना वरचढ होतेय म्हटले तर कदाचित पुढच्या वेळी आमचाच पत्ता कट करतील.’ यावर सदाभाऊ हसले. ‘अरे बाबा, नुसता निधी मागून तो मिळत नाही. विरोधकांशी पंगे घ्यावे लागतात. कधी कधी राडा करावा लागतो. मागे नाही का मी बंदूक चालवली. यातून तुमचे उपद्रवमूल्य सिद्ध होते व नेत्यांचे लक्ष जाते. तुम्ही जेवढे उद्धवसेनेला डिवचाल तेवढा तुमचा फायदा. हे करून बघा तुमचे प्रस्ताव तातडीने मंजूर होतील.’

हे ऐकून समाधान झालेले दोघेही मनोभावे हात जोडून निघून गेले. मग ते पुन्हा झोपी गेले. चारच्या सुमारास पुन्हा टकटक झाली. दार उघडून बघतात तर उद्धवसेनेचे दोन आमदार उभे. त्यांना बघून बसलेल्या धक्क्यातून कसेबसे सावरत भाऊ म्हणाले ‘बोला माझ्या माजी शिवबंधूंनो.’ त्यावर त्यातला एक घाबरतच म्हणाला. ‘विरोधक असल्याने कुणी हिंग लावून विचारत नाही भाऊ.

नवीन निधी सोडा पण हक्काच्या आमदार निधीतले पैसेसुद्धा वेळेवर मिळत नाहीत. कामे होत नाहीत म्हणून मतदार जिवावर उठलेत हो. तुम्ही काही तरी मार्ग काढा. आमच्यातले अर्धे तुमच्या सेनेत यायला तयार आहेत. जेव्हा घ्यायचे तेव्हा घ्या पण विकासासाठी आतापासून निधी द्या. पुढच्या निवडणुकीत आमचा बळी पाहिजे असेल तर त्यासाठीही आमची तयारी आहे.’ हे ऐकून भाऊंची छाती फुलली.

एका वक्तव्याने अचानक आपले महत्त्व वाढल्याचे बघून ते खूश झाले. त्या दोघांना आश्वस्त करून ते पुन्हा झोपी गेले. सकाळी ताजेतवाने होऊन जनसंपर्क कार्यालयात गेले तर तिथे प्रचंड गर्दी. ‘२० कोटीची कामे कुठे केली ते आताच्या आता सांगा’ असे नारे देत असलेली. त्यांना सामोरे जाण्याचे टाळून ते मागल्या दाराने थेट प्रभादेवीकडे रवाना झाले.