‘समाजमाध्यमांवरच्या बोरुबहाद्दरांनो, करा, वाटेल तेवढी टीका करा. अजिबात घाबरणारा नेता नाही मी. हाडाचा शिवसैनिक आहे. अरे, एखाद्या संकटकालीन परिस्थितीत मंत्री म्हणून काय करावे लागते हेही तुम्ही आता शिकवाल का मला? माध्यम हाती आहे म्हणून उचलली जीभ व लावली टाळ्याला, असले धंदे बंद करा आता.

गाठ शिरसाटांच्या संजयशी आहे हे लक्षात ठेवा. म्हणे, संपूर्ण दौऱ्यात पूरपाहणीसाठी फक्त एक तास. अरे, माझ्यासारख्या कार्यक्षम व व्यग्र मंत्र्यासाठी एक तासही पुरेसा आहे. करमाळ्यातील एका शेतात गेलो काय व दहा गावच्या शेतात गेलो काय, तरी दृश्य तर तेच असणार ना! पुरामुळे बुडालेली पिके, झालेला चिखल, शेतकऱ्यांचे तेच दीनवाणे चेहरे यात प्रत्येक ठिकाणी फरक तरी काय असणार आहे? मग एकाच ठिकाणी जाऊन सर्वदूरच्या परिस्थितीचा अंदाज एकत्रितपणे घेतला तर त्यात वाईट काय?

चिखल तुडवत सर्वदूर जाण्यासाठी आहेत की आमचे कार्यकर्ते. प्रत्येक ठिकाणी मंत्रीच हवा असा बालिश हट्ट का? काय तर म्हणे, देवीच्या देवळात कशाला जाता? अरे, आम्ही सच्चे शिवभक्त आहोत. देवीची अवकृपा झाली म्हणूनच तर पूर आला ना! मग हे संकट टळू दे, नवे संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थना देवळात जाऊन केली तर बिघडले कुठे? देवीदेवता प्रसन्न राहिले की राज्यही सुजलाम सुफलाम होते. अशा आपत्तीच्या काळात देवाचा धावा प्रत्येकजण करतो.

अगदी पूरग्रस्तसुद्धा! मग मी केला तर तुमच्या नाकाला मिरच्या झोंबण्याचे कारण काय? बावळट पुरोगामी कुठले? प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पुण्यसंचय व्हावा म्हणून गेलो मी दोन देवळांत. म्हणे, पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी कशाला? अरे, या पुराने सारेच हवालदिल झाले. शेतकऱ्यांसोबत पदाधिकारीसुद्धा! त्यांना धीर दिला तरच ते जोमाने कामाला लागतील ना! वरून म्हणता, पुराचा आणि ब्लड बँकेचा काय संबंध? कीव करावी वाटते रे तुमच्या बुद्धीची. आता पूर ओसरल्यावर अनेकजण आजारी पडतील. मग कुणाला तरी रक्ताची गरज भासेल. अशा वेळी या लहानशा गावात रक्तसाठा आहे की नाही याची तपासणी नको का करायला? मंत्री म्हणून दूरदृष्टी ठेवावी लागते हेही जर तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या वायफळ बडबडीला काही अर्थ नाही.

या दौऱ्यात पक्षशाखा उद्घाटन व मेळावा कशाला हाही प्रश्न फालतू. अरे, माझी उपस्थिती कायमच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना प्रेरणा देणारी असते. त्यातले अनेकजण ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी माझ्याशी हात मिळवायला धडपडत असतात. या प्रेरणा व ऊर्जेतून कार्याला गती मिळते. अशा संकटाच्या काळात साऱ्यांच्यात कार्य-उत्साह वाढावा यासाठी असे कार्यक्रम करावे लागतात. शेतकऱ्यांचे दु:ख कार्यकर्त्यांच्या पातळीवर मिटले तरच माझ्यासारखा मंत्री मुंबईत बसून अधिक सक्षमपणे काम करू शकेल. नाही कळणार रे तुम्हाला यामागची उदात्त भावना!

म्हणे, धान्य मळणी यंत्र उद्योगाला भेट देण्याची गरज काय? अरे, माझ्यासारखा मंत्री भविष्यात विचार करून अशा भेटी ठरवत असतो. पुरामुळे पीक गेले. जे शेतात उरले आहे त्यातला प्रत्येक दाणा शेतकऱ्यांच्या पदरात पडावा म्हणून मी तिथे गेलो. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तशी खास यंत्रे तयार करा अशा सूचना दिल्या. कळले का आता. बस झाले. तुम्ही तुमचे काम चालू द्या, मी निघालो दुसऱ्या जिल्ह्यात.’ माध्यमांवरील हे निवेदन वाचून एकनाथरावांनी लगेच शिरसाटांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले तर दुसरीकडे देवाभाऊंनी कपाळावर हात मारून घेतला.