‘२०२४च्या निवडणुकीत तुम्हा सर्वांच्या सहकार्याने विश्वगुरूंच्या नेतृत्वात पक्षाला अपार यश मिळाले. विकासाच्या घोडदौडीत गेली पाच वर्षे कशी निघून गेली ते कळलेच नाही. पाच वर्षांपूर्वी आपल्या नागपूरच्या लाडक्या भाऊंनी १४ ते २४चा काळ फक्त ट्रेलर होता व आता पिक्चर सुरू झाला असे भाष्य केले होते. त्यामुळे आता या पाच वर्षातला पिक्चर कसा होता हे आता भाऊंच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत.’ हे निवेदन संपल्यावर भाऊंनी ‘या ठिकाणी’ म्हणत सुरुवात करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्याने उत्साहित होऊन ते बोलू लागले…
‘गेल्या पाच वर्षात देश चकचकीत व्हायला सुरुवात झाली. जुने डांबरी रस्ते उखडून सिमेंटचे रस्ते देशभर बांधले गेले. तरीही देशाच्या काही आदिवासी पाड्यांना रस्ता वापराची सवय नसल्याने ते कधी पायी चालतात तर कधी रुग्णांना खाटेवर बांधून आणतात. त्यांना हे रस्ते वापरण्याची सवय लावणे हे आपले पुढचे ध्येय असेल. २०१४ पूर्वी या देशात ना पुरेशी रेल्वेस्थानके होती, ना विमानतळ. जी होती ती मोडकळीस आलेली. तेव्हा लोक शिदोरी घेऊन पायी प्रवास करायचे. आता शेकडो स्थानके व तळांची उभारणी झाल्याने लोक विमान नाही तर वंदेभारतमधून वातानुकूलित प्रवास करतात. ही सवय साऱ्या देशाला लागल्याने रेल्वेचे सर्वसाधारण डबे मोडीत काढावे लागले. या काळात रोजगार निर्मितीत इतकी वाढ झाली की लोक दिवसा एक व रात्री दुसरी नोकरी करू लागले. गेल्या पाच वर्षात प्रत्येकाला घरकुल व त्यात शौचालय मिळाले. तरीही काही लोक सवयीचा भाग म्हणून उघड्यावर झोपतात. झोपडी सोडत नाहीत.
या साऱ्यांच्या सवयी बदलण्यासाठी आता प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. गावागावात आरोग्य केंद्रे व डॉक्टर उपलब्ध करून मोफत उपचार केल्याने लोकांचे सरासरी वय वाढले. या काळात पाच लाख मृत्यू देशात झाले ते सारे नैसर्गिक होते, असे आरोग्य खात्याचा अहवालच सांगतो. देशभरातील सर्वांना मोफत सिलेंडर देण्यात आले. त्यांना गॅस भरण्यास अडचणी येताहेत असे लक्षात येताच मोफत गोबरगॅस उपलब्ध करून दिला. त्याचा वास सहन होत नाही म्हणून आजही काही जण लाकूड व कोळशाचा वापर करतात. त्यावर उपाय म्हणून हा गॅस सुगंधित करण्याची योजना आपण आखली आहे.
कृषीक्षेत्रातील क्रांतीमुळे देशातला शेतकरी प्रचंड आनंदात आहे. या क्षेत्रात ज्या काही आत्महत्या झाल्या त्या वैयक्तिक कारणातून. त्याही थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गरिबी निर्मूलनासाठी मोफत धान्य योजनेची व्याप्ती नव्वद कोटी जनतेपर्यंत वाढवण्यात आली. यामुळे लोकांचा कमाईचा पैसा वाचून तो इतर सोयींवर खर्च होऊ लागला. त्यामुळे ही सारी कुटुंबे आता निम्न मध्यमवर्गीय गटात आली. या सर्व घडामोडी पिक्चर आता कुठे सुरू झाला हेच दर्शवणाऱ्या. तो दीर्घ लांबीचा असल्याने त्याचा पाव भागच या काळात आपण बघितला. मध्यंतरापर्यंत पिक्चर पाहण्यासाठी पुन्हा एकदा विश्वगुरूंना पाच वर्षांसाठी संधी देण्याची गरज आहे. तेव्हा पूर्ण पिक्चर बघण्याचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन करून मी थांबतो’.