रात्री उशीर झाल्याने राहिलेल्या फायली हातावेगळ्या करण्याच्या उद्देशाने सकाळी जरा लवकर उठलेले दादा अभ्यागतांच्या कक्षात आले तेव्हा जेमतेम साडेसहाच झाले होते. समोर कुणीच नाही हे बघून त्यांनी पुढ्यात ठेवलेला सोशल मीडियासंबंधीचा अहवाल चाळला. आपल्या कंत्राटदारांसंबंधीच्या वक्तव्याने पक्षाच्या टीआरपीत तब्बल दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे बघून ते सुखावले. तेवढ्यात शिपायाने वर्दी दिली. राज्य कंत्राटदार संघटनेचे एक भले मोठे शिष्टमंडळ भेटायला आल्याची. हे नक्कीच थकबाकी मागायला आले असणार असे म्हणत त्यांचा चेहरा त्रासिक झाला. तेवढ्यात शिष्टमंडळ आत शिरलेच.
हे बघा, लाडक्या बहिणींमुळे सारीच गडबड झाली आहे. त्यामुळे थकीत रकमेचा मुद्दा सोडून दुसरे काहीही बोला.’ दादांनी करड्या आवाजात सुनावले. मग त्यातला एक घाबरतच म्हणाला, ‘साहेब आम्ही थकबाकीसाठी आलो नाही. तुम्ही परवा जे वक्तव्य केले त्यावर बोलायचे आहे’. दादा म्हणाले ‘बोला’. मग एकेक सुरू झाला. ‘दादा, कंत्राटदारीत आता काही ‘राम’ राहिला नाही. ट्रोलिंग, टक्केवारी व टॅक्स या तीन ‘टी’ने आम्ही पार त्रस्त झालोय. अलीकडे शिफारशीशिवाय कामे मिळतच नाहीत. नशिबाने एखादे मिळाले तर नाराज राजकारणी समाजमाध्यमावर ट्रोलिंग म्हणजे बदनामी करतात. शिफारशीने मिळवले तर टक्केवारीत खूप पैसा जातो. वरून टॅक्स वेगळाच. तुम्ही म्हणता ज्याला कंत्राटदार व्हायचे त्याने राजकारणी होऊ नये. अहो, सारेच राजकारणी आता कंत्राटदार व्हायला लागलेत. नाव आमचे व काम त्यांचे असते. एकदा कोणते काम घ्यायचे हे ठरले की राजकाराणी आमच्याबरोबर भागीदारीची कागदपत्रे तयार करून घेतात. शिवाय भविष्यात काही वाद झालाच तर त्यातून बाहेर पडता यावे यासाठी भागीदारी मागच्या तारखेत सोडली याचाही कागद तयार करून स्वत:जवळ ठेवतात. वादंग माजले की आम्ही बदनाम होतो, ते नामानिराळे राहतात. अनेकजण मूळ अंदाजपत्रकातील रक्कम आधीच मागून घेतात व अर्ध्या रकमेत तू काम कर असे सांगून दूर होतात.
महत्प्रयासाने एखादे काम स्पर्धेतून मिळवले तर टक्केवारीची मागणी इतकी असते की ती पुरी करता करता दमछाक होते. दिली नाही की काम कसे बोगस याच्या चित्रफिती माध्यमांना देतात. तुम्हीच सांगा दादा आता, आम्ही जगायचे तरी कसे? यामुळे कंटाळून अनेकांनी हा धंदाच सोडला. काहींनी सून कधीतरी सासू होतेच या न्यायाने थेट राजकारणाचा रस्ता निवडला. दोन्ही भूमिका एकच नट करू लागल्याने आता अनेक ठिकाणी ‘निविदेची सुविधा’ हे नाटक ठरू लागलेय. कामे खराब झाली म्हणून तुम्ही आम्हाला बोल लावता, पण ती कुणाच्या हव्यासामुळे, हे एकदा तरी तपासा ना! आज राज्यात एकही लोकप्रतिनिधी असा नाही जो या व्यवसायात नाही. नका देऊ आमची थकबाकी, पण किमान आम्हाला बदनाम तर करू नका. सध्या आम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार खातोय. सगळीकडून.’ हे ऐकून दादा हबकलेच. ‘ठीक आहे, बघतो मी’ असे म्हणत ते उठले. मग त्यांना कामे व निविदेसाठी आग्रह धरणारे एकेक आमदार आठवू लागले. त्यांनी लगेच पक्षातील किती आमदार कंत्राटदारीत आहेत याची माहिती मागवली. वाचून ते उडालेच. सारेच्या सारे भागीदारीत कंत्राटे घेत असल्याचे त्यात नमूद होते. काही दिवसांनी आपला पक्ष मराठ्यांऐवजी कंत्राटदारांचा म्हणून ओळखला जाईल की काय अशी भीती त्यांच्या मनाला स्पर्शून गेली. माहितीचा कागद बाजूला ठेवत त्यांनी दाराकडे बघितले तर व्यवसायात स्थिरावत असलेली दोन्ही मुले त्यांच्याकडे बघून हसत असल्याचा भास त्यांना झाला.