आता तुम्ही म्हणाल माघार घ्यायचीच होती तर निवृत्तीची घोषणा केलीच कशाला? तसेही राजकारणात ते असून नसल्यासारखेच होते. मग हे नाटक करायची गरज काय होती? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा… तळकोकण व राणे हे दृढ समीकरण आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी विस्कटणारे नाही. त्यामुळे या निवृत्तीनाट्याकडे जरा गांभीर्याने बघायला शिका. ‘प्रचंड’ मेहनत करून डॉक्टरेट मिळवलेल्या नीलेशरावांना लेचापेचा समजण्याची काहीएक गरज नाही. ‘राणेंनी, तेही इतक्या सभ्य शब्दांत निवृत्तीची घोषणा करावी?’ असे कुजकट उद्गार तर अजिबात काढायचे नाहीत. इतक्या सौम्य शब्दांत निर्णय घोषित करण्याची आपली परंपरा नाही म्हणून वडील रागावले व त्यामुळे मुलाला माघार घ्यावी लागली असले तर्कही अजिबात लढवायचे नाहीत. नारायणराव असतील किंवा नीलेश वा त्यांचे धाकटे बंधू, या सर्वांनी सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा पाळूनच आजवर राजकारण केले आहे.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : पुजारी आणि मुहूर्त

सत्ता असून कार्यकर्त्यांची कामे होत नसतील, त्यांना निधी मिळत नसेल तर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नीलेशरावांना आहे. तो त्यांनी वापरला तर चूक काय? त्या गुप्तेंच्या कार्यक्रमात वडिलांनी नितेशचे नाव घेतले म्हणून नीलेशला खुपले, असा युक्तिवाद तर कुणीही करूच नये. वडिलांच्या हृदयात या दोघांनाही समान स्थान आहे. ‘आजी’ आहे त्याचे नाव घेतले, ‘माजी’ त्यांच्या मनात घर करून आहेच. तो जेव्हा मालवणमधून ‘आजी’ होईल तेव्हा त्याचाही उल्लेख ते आधी करतील. मालवणच्या ‘विद्यामान’ना नव्या सेनेत प्रवेश मिळू नये म्हणून हे नाट्य होते हेही चुकीचेच. आणि हो, या नाट्याची तुलना त्या बिहारमधील यादवकुळातील तेजप्रताप व तेजस्वीशी बिलकूल करायची नाही. तिकडे धाकटा डीसीएम झाला व त्यामुळे रागावलेला मोठा कृष्णाचा वेश करून बासरी वाजवत बसला, तसेच यांचे होणार का असले प्रश्न तर उपस्थितच करायचे नाहीत.

हेही वाचा >>> पहिली बाजू : कुशल, रोजगारक्षम राज्यासाठी..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दशावताराच्या संस्कृतीशी नीलेशरावांचे इमान असले तरी राजकारण व लोककला भिन्न गोष्टी आहेत, त्याची सांगड घालण्यात अर्थ नाही याची पुरेपूर कल्पना त्यांना आहे. त्यामुळे समाजमाध्यमी किड्यांनी असे ‘खयाली पुलाव’ न शिजवणेच केव्हाही उत्तम! कोकण भले भाऊबंदकीसाठी बदनाम असेल, पण याचा स्पर्श घराण्याला होणार नाही याची काळजी या पितापुत्रांनी घेतली याची जाणीव मनात असू द्या. नाराजीनाट्यात नेहमी यशस्वी ‘तोडगा’ काढणाऱ्या देवेंद्रभाऊंनी याची तात्काळ दखल घेतली यावरून तरी नाट्यामागील गांभीर्य ओळखा. हवे ते पदरात पाडून घेण्यासाठी ही राणे पितापुत्रांनी चाल होती, असा निष्कर्ष काढण्याची घाई तर नकोच नको! राण्यांना चाली खेळण्यात स्वारस्यही नाही. ते थेट आघात करतात. लहानाच्या तुलनेत मोठ्याचे विरोधकांना नामोहरम करण्याचे उपद्रवमूल्य कमी झाले, त्यावरून सत्तावर्तुळात नाराजी होती. ती दूर करण्यासाठी अतिशय बेमालूमपणे हे नाट्य रचले गेले असल्या भाकडकथांवर अजिबात विश्वास ठेवू नका. औटघटकेचे हे नाट्य संपुष्टात आल्याने नीलेशराव विरोधकांवर तुटून पडण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. त्यामुळे ते आता कसे दोन हात करतात याकडे लक्ष द्या. ते सोडून उगीच त्यांची खिल्ली उडवण्याचा नाद कराल तर गाठ राणेंशी आहे हे पक्के ध्यानात असू द्या!