अमिताभ पावडे म्हणजे समाजहिताचे स्वप्न साकारण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत धडपडणारा माणूस. अभियंता या नात्याने देशभरातील विमानतळांच्या सुरक्षित धावपट्ट्या बांधता-बांधता जीवनाच्या एका वळणावर त्यांना समाजाच्या उत्थानासाठी आवश्यक वैचारिक बांधकामाची गरजही तत्परतेने भासू लागली आणि ते ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’तील अभियंत्याची सुखासीन नोकरी सोडून गावाकडे परतले. पावडे यांनी त्यांच्या बालपणात आपल्या घरातल्या ओसरीत बंडाचे अनेक कथनात्मक आवाज ऐकले होते. परिवर्तनाची भावना, जातीचे उच्चाटन, सामाजिक लोकशाहीची लढाई ते वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अनुभवत होते. यातूनच नकळत त्यांच्यावरही सभोवतालचा अंधार बाजूला सारून स्वत:ला व पर्यायाने समाजाला स्वयंप्रकाशी करण्याचे संस्कार रुजत गेले. या संस्करांची ओढच इतकी तीव्र होती की त्यांनी विलासी आयुष्य नाकारून सामाजिक कार्याचा अस्थिर मार्ग अगदी ठरवून पत्करला.

पावडे यांना हा समाजसेवेचा ध्यास वारसाहक्काने लाभला होता. आजपासून सुमारे ८० एक वर्षांआधी सर्वंकष परिवर्तनाच्या भावनेतून जातींच्या चौकटीवर शक्तिशाली बौद्धिक हल्ला ही काही साधी गोष्ट नव्हती… परंतु, वंचित मुलांसाठी रात्रशाळा चालवणारा एक आदर्शवादी तरुण मोतीराम पावडे व एका गरीब महार कुटुंबात जन्मूनही संस्कृतची पंडित झालेली कुमुद सोनकुवर यांनी अदम्य धैर्याने हा ‘अंत:स्फोट’ घडवून आणला आणि हजारो वर्षे समाजाचे शोषण करणाऱ्या जातिप्रथेचे आपल्यापुरते तरी अगदी ठरवून उच्चाटन केले. अशा या जातीअंतासाठी लढणाऱ्या पालकांच्या पोटी जन्मलेला मुलगा म्हणजे अमिताभ पावडे.

नोकरी सोडून नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील आपल्या मूळ गावाकडे परतल्यावर पावडे यांनी जातीअंताच्या लढाईतील निकड आणि अराजकाच्या दिशेने निघालेल्या समाजाला मानवी मूल्यांकडे परत आणण्यासाठी कार्य सुरू केले. गावातील संत्र्याच्या शेतात त्यांनी जसे पिकांवर नवनवीन प्रयोग यशस्वी केले अगदी त्याच कल्पकतेने विविध सामाजिक चळवळींमध्येही नवी ऊर्जा पेरली. वंचित मुलांसाठी शाळा उभारल्या. त्यात गरिबांना शिकता यावे म्हणून शुल्क नाकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक बळ पुरवले. शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या ‘बीजोत्सवा’ला आधार दिला. ‘दक्षिणायन’च्या चळवळीत ते सहभागी झाले. आई-वडिलांनी सोपवलेला जातीअंताचा वारसा आणखी विस्तारण्यासाठी भावंडांना आंतरधर्मीय लग्नासाठी प्रेरित केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विविध संस्था, संघटनांनी त्यांना गौरविले. पावडेंचा हा प्रवास आणखी नवनवीन विक्रम रचत पुढे जाईल, असे वाटत असतानाच एका किरकोळ अपघाताने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे प्रयोगशील विचार आणि त्यांचे कर्तृत्व कायमच प्रेरणादायी ठरेल.