‘बुकर’ देणाऱ्या ब्रिटनमध्ये गौरेतर वंशीय लेखकांना ‘झलक’ नामक पुरस्कार दिला जातो. पुरस्काराची रक्कम बुकरच्या तुलनेत गौण असली, तरीही तो कोणत्या पुस्तकांना मिळतो त्याची उत्सुकता लघुयादी जाहीर झाल्यापासून कट्टर वाचकांमध्ये शिगेला पोहोचते. म्हणजे श्रीलंकी मुळे असलेले गाय गुणरत्ने, कॅरेबियन बेटांनजीकच्या ग्रेनेडा देशातील जेकब रॉस ही लोकप्रिय नावे या पारितोषिकांची विजेती. तर शोलू ग्वो, रोमेश गुनसेरेका, रोमा अग्रवाल, शीना पटेल आदी लक्षवेधी नावे लघुयादीत झळकलेली. पुरस्काराचे नाव ‘झलक’ का? तर तो ब्रिटिश-भारतीय लेखकांनी २०१६ साली सुरू केला. यंदा यातील गद्या-विभागाचा पुरस्कार ब्रिटिश-पॅलेस्टिन लेखिका एन. एस. नुसैबा या तरुण लेखिकेला मिळाला. त्या जन्मल्या, वाढल्या जेरुसलेममध्ये. त्यांनी विद्यापीठ पातळीवर कुराणाचा अभ्यास केला आहे. सध्या ऑक्सफर्डमध्ये शिक्षणाच्या सामाजिक शास्त्रावर त्यांची डॉक्टरेट सुरू असून ‘द अटलांटिक’ या अमेरिकी मासिकासाठी त्यांनी बरेच लेखन केले आहे.
त्यांच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथाचे नाव आहे ‘नेमसेक’. तर उपशीर्षक ‘रिफ्लेक्शन्स ऑन वॉरियर वुमन’. पहिली इस्लामी योद्धा म्हणून सातव्या शतकातील नुसैबा बिन्त काअब यांचे नाव घेतले जाते. (प्रेषित मुहम्मद यांच्या शिष्या (सहाबा) आणि उहुदच्या लढाईत तलवारीने लढून त्यांचे रक्षण करणाऱ्या) तिच्या नावाशी (आपल्या आडनावाचे) साधर्म्य असलेल्या एन. एस. नुसैबा यांना आपल्या इतिहासाविषयी, धर्माविषयी पडलेल्या प्रश्नांचा शोध घ्यावासा वाटला. ‘पर्सनल एसेज’ या स्वरूपाच्या या पुस्तकात नुसैबा यांनी अरबी इतिहास उकरून काढला. इतिहास-समकाल आणि आपल्या भवतालाला धरून इस्लामचा शोध घेतला. जेरुसलेममधील बालपण, तेथील शिक्षण, गाझापट्टीतून घरी येणाऱ्या नातेवाईकांची जेरुसलेममध्ये होणारा अ-पाहुणचार आदी पाहत त्यांचे धर्मज्ञान वाढीस लागले. पुढे करोना काळात ब्रिटनमध्ये डॉक्टरेट करीत असताना त्यांनी या निबंधांना आरंभ केला. विद्यापीठाच्या वाचनालयातून ऑनलाइन संदर्भग्रंथांचा फडशा पाडला. पुस्तकाच्या आरंभीच नुसैबा यांनी नमूद केलेय, की ‘७ ऑक्टोबर २०२३ (हमासचा हल्ला आणि त्यानंतर आजवर न संपलेले युद्ध) यापूर्वीच या पुस्तकातील सारे निबंध पूर्ण झालेत.
माझा हेतू अरबेतर जगाला इस्लाम, अरब आणि पॅलेस्टाइनी लोकांच्या सांस्कृतिक इतिहासाची ओळख करून देणे हा आहे.’ आपण ऐकलेल्या किंवा वाचलेल्या अरबी कहाण्या या अरबेतरांनी रचून त्यावर वैश्विक झालर चढविली आहे. नुसैबा यांचे पुस्तक मात्र याउलट काम करते. जेरुसलेममधील भूगोल-इतिहास, स्वत:ची पॅलेस्टाइनी मुळे आणि त्याच्यावर पाश्चात्त्य विद्यापीठांतून आलेली आकलनाची-अभ्यासाची नजर, असे त्याचे स्वरूप आहे. नुसैबा यांचे नाव काही वर्षांपूर्वी ‘कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी’ पारितोषिकाच्या लघुयादीत होते, तेव्हा कथाकार म्हणून त्या पुढे वाटचाल करतील की काय, असा प्रश्न पडणाऱ्यांना त्यांनी या पुस्तकाद्वारे उत्तर दिले आहे. ब्रिटिशांइतक्याच गौरवर्णी दिसणाऱ्या, उच्चारण अमेरिकी इंग्रजी असलेल्या, पॅलेस्टाइनमधील मुळे असताना जेरुसलेममध्ये वाढलेल्या अशा विविध अंगातून नुसैबा यांच्याकडे पाहता येईल. ‘रिफ्लेक्शन्स ऑन वॉरियर वुमन’मध्ये इस्लाम, अरबी स्त्रीवाद आणि आधुनिक जगणे यांच्या खुणा सापडतात. ‘झलक’ पुरस्कार ही या व्यक्तिमत्त्वाची झळाळी कळून देणारी पहिली झलक मानावी. इतक्या अपेक्षा या लेखिकेकडून वाढल्या आहेत.