मराठा आंदोलनाच्या यशस्वी सांगतेच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसे सामोरे जायचे यावर विचारविनिमय करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली तेव्हा हजर असलेल्या सर्वांचेच चेहरे गंभीर होते. सत्तेत राहून एकेका मुद्द्यावर यशस्वी तोडगा काढणाऱ्या महायुतीला व मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीसांना रोखायचे कसे हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत होता.

अपेक्षेप्रमाणे विश्वप्रवक्ते संजयरावांनी सुरुवात केली. ‘महायुतीला मिळणाऱ्या कथित यशाने खचून जाण्याचे काही कारण नाही. यांचे यश कसे फसवे हे मी रोज सकाळी राज्याला ओरडून ओरडून सांगेन. तुम्ही फक्त त्यावर आधारित प्रचाराची दिशा ठरवा.’ हे ऐकून काँग्रेसचे दोघे आपसात कुजबुजले. ‘हे आपलीच वात लावतात.’ मग राष्ट्रवादीचा एक म्हणाला. ‘हा तोडगा फसवा आहे हे लवकरच लोकांच्या लक्षात येईल. त्यामुळे आपण साहेबांनी मांडलेली- केंद्राने आरक्षण मर्यादा वाढवून द्यावी- हीच भूमिका प्रचारात मांडायला हवी.’ आता काँग्रेसकडून काय भूमिका मांडली जाते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले. तेवढ्यात पक्षाच्या जंबो कार्यकारिणीत नव्यानेच सामील झालेला व या समन्वय बैठकीसाठी पहिल्यांदाच पक्षातर्फे पाठवण्यात आलेला एक नेता उभा राहिला. ‘सध्या जनमत पूर्णपणे महायुतीच्या बाजूने झुकलेले आहे. तोडगा फसवा की खरा हे लोकांना कळेपर्यंत निवडणुका पारसुद्धा पडतील. तेव्हा आपले हित यातच आहे की त्यांच्या यशाच्या गरम तव्यावर आपली पोळी कशी भाजून घेता येईल. यासाठी माझ्याजवळ एक उपाय आहे. तो मी तुम्हाला सांगतो. (त्यावर साऱ्यांचेच कान टवकारतात) या आंदोलनात यशस्वी मध्यस्थी करणारे सारे मंत्री व नेते पूर्वाश्रमीचे आपलेच. विखे तर आमचे प्रदेशाध्यक्षच होते. कोकाटे सेनेत होते. शिवेंद्रराजे, उदय सामंत, राणा जगजितसिंह हे सारे मूळच्या राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट. म्हणजे मोठ्या साहेबांचे शिष्य. त्यामुळे महायुती व त्यात भाजप जरी यशाचे ढोल बडवत असला तरी ते मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे तो आघाडीच्या मुशीतून तयार झालेल्या या नेत्यांचाच. युतीमध्ये कितीही दिग्गज नेते असोत, सरकार अडचणीत आले की त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना याच नेत्यांची मदत घ्यावी लागते. आंदोलन कोणतेही असो. एक घाव दोन तुकडे करण्याची ताकद आहे ती फक्त आघाडीच्या विचारांतून तयार झालेल्या या नेत्यांमध्येच. आज भलेही विखे या यशाचे श्रेय देवाभाऊंना देत असतील पण ते केवळ पक्षीय बंधनांमुळे. त्यामुळे या यशाचे श्रेय युतीचे नाही तर आमच्याच माजी नेत्यांचे असा प्रचार करायचा.’ हे ऐकून सारे वरिष्ठ एकमेकांकडे बघू लागले.

मग एक जुनेजाणते म्हणाले. ‘हे सर्व ठीकच पण या प्रचारावर कुणी विचारले की हे सर्वजण तुम्हाला सोडून का गेले तर काय उत्तर द्यायचे’ यावर बैठकीत एकच हशा पिकला. हा अजब मुद्दा मांडणाऱ्या नेत्याने नंतर जी खाली मान घातली ती वर केली नाही. बैठक संपली. दुसऱ्या दिवशी माध्यमांत हा गमतीदार प्रसंग प्रकाशित होताच विखेंसकट चर्चेला गेलेले सारेच खळखळून हसले. विखेंनी या साऱ्यांना जेवणासाठी घरी बोलावले. मग रंगलेल्या जेवणोत्तर चर्चेत ते म्हणाले. ‘जेव्हा आपण महायुतीतील वेगवेगळ्या पक्षांत सामील झालो तेव्हा याच आघाडीवाल्यांनी संधिसाधू म्हणून आपल्याला हिणवले. आम्ही संधीसाधू नाही तर संकटमोचकही आहोत हे आता उशिराने त्यांना कळले हे बरे झाले. किमान आता तरी सुधारतील अशी अपेक्षा करूयात.’