‘स्वातंत्र्य, समता, बंधुभाव किंवा मृत्यू’ – फ्रेंच राज्यक्रांतीचं मूळ ब्रीदवाक्य
इंग्लिश राज्यक्रांती (१६८८) रक्ताचा एक थेंब न सांडता झाली म्हणून तिचा उल्लेख उदारमतवादी उदात्त राज्यक्रांती (Glorious Revolution) असा केला जातो. मात्र, १७८९ मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीत भीषण रक्तपात झाला म्हणून ती रक्तरंजित क्रांती ठरली. व्यक्तिस्वातंत्र्यानं प्रेरित इंग्लिश राज्यक्रांतीच्या मुळाशी व्यक्तिवाद आहे. तर फ्रेंच राज्यक्रांती व्यक्तिवादाच्या पुढे (किंवा विरोधात) जाऊन समतेचा अर्थात स्वातंत्र्याच्या लोकशाहीकरणाचा आणि वैश्विकीकरणाचा आग्रह धरते. या दोन क्रांतींच्या मधल्या कालखंडाचा निर्देश ‘प्रबोधनपर्व’- एन्लायन्मेंट- म्हणून केला जातो. प्रबोधनपर्वाच्या एका टोकाला जॉन लॉकनं प्रतिपादन केलेलं व्यक्ति-स्वातंत्र्य १६८८च्या उदारमतवादी क्रांतीत प्रतिबिंबित होतं; तर दुसऱ्या टोकाला १७८९च्या फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान रोबेस्पिएरसारख्या जहाल क्रांतिकारकांच्या भाषणांमध्ये रूसोनं समतेच्या मूल्याला दिलेली प्राथमिकता व्यक्त होते. थोडक्यात, या काळात प्रबोधन चळवळीने पाश्चात्त्य समाजमनात वैचारिक क्रांती घडवून समतेसाठी अर्थात स्वातंत्र्याच्या लोकशाहीकरणासाठी पूरक वातावरण निर्माण केलं असं म्हटलं जातं.
वास्तवात मात्र, स्वातंत्र्य आणि समता या दोन मूल्यांमध्ये अंतर्विरोध दिसतो. त्या अंतर्विरोधाची चर्चा करण्याआधी स्वातंत्र्य या आधुनिकतेच्या मध्यवर्ती मूल्याचा परामर्श घेऊ. प्रस्थापित मांडणीत व्यक्तीच्या स्वातंत्र्याला किमान अवकाश आणि परवानगी देणाऱ्या १६८८ क्रांतीचा उल्लेख हिंसारहित उदात्त क्रांती असा केला जातो. जणू, स्वातंत्र्य हे मूल्य सहज अहिंसेच्या मार्गाने प्राप्त झालं असावं. वास्तवात मात्र, १६६८च्या हिंसारहित उदात्त क्रांतीला प्रोटेस्टंट विद्रोह, धर्मयुद्धं, यादवी आणि ऑलिव्हर क्रॉमवेलची राजवट अशी दीर्घ हिंसक आणि रक्तरंजित ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे, सोळाव्या शतकात व्यक्तीच्या उपासनास्वातंत्र्यापासून सुरू झालेला स्वातंत्र्य या आधुनिक मूल्याचा प्रवास सतराव्या शतकात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील स्वातंत्र्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे, अठराव्या शतकातील प्रबोधनपर्वाचे बहुतेक विचारवंत इमॅन्युएल कांटनं उपस्थित केलेल्या तिसऱ्या अॅन्टिनमीच्या संदर्भात ठामपणे मानवी स्वातंत्र्याच्या बाजूनं भूमिका घेतात.
अठराव्या शतकातल्या प्रबोधन पर्वाच्या मध्यभागी असलेली कांटची ‘तिसरी अॅन्टिनमी’ अर्थात मानवी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. तत्त्वज्ञानात ‘अॅन्टिनमी’ म्हणजे असा मूलभूत अंतर्विरोध ज्यात दोन परस्परविरोधी दाव्यांच्या समर्थनार्थ तोडीचा युक्तिवाद करता येतो. ‘मानवी स्वातंत्र्य शक्य आहे का?’ या कांटच्या स्वातंत्र्यविषयक अॅन्टिनमीचं उत्तर दोन्ही बाजूंनी देता येतं. रॉबर्ट फिलमरसारख्या परंपरावादी आणि परलोकवादी तत्त्ववेत्त्यांच्या मते तर स्वातंत्र्य फक्त अशक्यच नसून पापाचं द्याोतक आहे. आधुनिकवाद्यांचं खूळ आहे. मानवी पतनाकडे नेणारा मार्ग आहे. लक्षणीय बाब म्हणजे मानवी स्वातंत्र्याला विरोध करण्याच्या बाबतीत पाश्चात्त्य आणि पाश्चात्त्येतर पुराणमतवादी परंपरावाद्यांमध्ये एकवाक्यता आढळते. फरक इतकाच की फिलमरसारखे पाश्चात्त्य परंपरावादी मानवी स्वातंत्र्याला ‘आधुनिकवाद्यांचं पाप’ समजतात; तर पाश्चात्त्येतर परंपरावादी, स्वातंत्र्याच्या संकल्पनेला सरळच ‘पाश्चात्त्य परंपरेतलं खूळ’ म्हणतात.
कांट मात्र त्याच्या मांडणीत फक्त परलोकवादी परंपरावाद्यांना उत्तर देत नसून डेव्हिड ह्यूमसारख्या महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञांनाही उत्तर देतो. खरंतर, ह्यूमच्या संशयवादी तत्त्वज्ञानाने कांटची झोप (dogmatic slumber) उडवली होती. कांटनं मानवी स्वातंत्र्याविषयक प्रश्नाचं दोन पातळींवर उत्तर दिलं आहे. कारण कांट एकाच वेळी विज्ञान आणि मानवी स्वातंत्र्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की समग्र मानवतेच्या मुळाशी समान नैसर्गिक तत्त्वं असल्यानं सगळ्या माणसांना निश्चितपणे समान नैसर्गिक नियम लागू होतात. त्याअर्थी सगळी माणसं निश्चितच कार्यकारणभावानं स्पष्ट होणारी नैसर्गिक वस्तू आहेत (समतेचा एक महत्त्वाचा आधार!). पण कांट नमूद करतो की मनुष्य फक्त नैसर्गिक वस्तू नसून ऐतिहासिक वस्तूसुद्धा आहे. मनुष्याला इतिहास आहे. निसर्गाला इतिहास नसतो! निसर्गाला चक्राकार गती असते. मनुष्याला चक्राकार गतीसोबतच एकरेषीय गती असते. निसर्गात फक्त आंधळी उत्क्रांती दिसते तर मनुष्यात नैसर्गिक उत्क्रांतीसह प्रगतिशील इतिहास दिसतो. त्यामुळे, मनुष्य फक्त निसर्गात सापडणारा प्राणी नसून निसर्गाच्या कचाट्यातून निर्णायकपणे स्वत:ची सुटका करून इतिहास घडवणारा विवेकी नैतिक ज्ञाता आणि कर्ता आहे.
खरंतर, माणूस म्हणजे निसर्गातील प्राणी आणि इतिहासातील मानव, हा भेद विशद करताना कांट रूसोच्या विचारांचा आधार घेतो. इतिहासातल्या मनुष्यावर नजर टाकल्यास मनुष्य नैसर्गिक वस्तूंसारखा परिपूर्ण नसून अपूर्ण त्यामुळेच पूर्णत्वाची क्षमता (परफेक्टिबिलिटी) आणि ओढ असणारा प्राणी आहे. थोडक्यात, त्याच्याठायी पूर्वस्थितीपासून सतत फारकत घेण्याची प्रवृत्ती आढळते जी इतर प्राण्यांमध्ये नसते. कांट युक्तिवाद करतो की, मनुष्याच्या ठायी असलेली अपूर्णपणाची जाणीव आणि परिपूर्णतेची क्षमता आणि ओढ त्याच्या स्वातंत्र्याचं द्याोतक आहे. थोडक्यात, कांटप्रमाणे प्रबोधनपर्वाच्या इतर कृतिशील विचारवंतांनीसुद्धा मानवी स्वातंत्र्याविषयी फक्त ठामपणे होकारार्थी उत्तर दिलं नसून मानवी स्वांतत्र्याला तत्त्वज्ञानात्मक पातळीवर ‘स्वयंसिद्ध तत्त्वा’चं (axiomatic) स्थान प्राप्त करून दिलं आहे. त्यामुळे, स्वातंत्र्याला मारक (liberticide) ठरणाऱ्या तत्त्वज्ञानात्मक भूमिकांशी प्रबोधनपर्वाचं द्वंद्व अनिवार्य ठरतं.
याआधी आपण पाहिलं की आधुनिकतेच्या बहुविध आणि परस्परविरोधी विचारप्रवाहांना जोडणारा मध्यवर्ती धागा म्हणजे प्रबोधनपर्वानं मानवी स्वातंत्र्याच्या बाजूनं दिलेला कौल. पण अठराव्या शतकात रूसो आणि कांटसारखे प्रबोधनपर्वाच्या परिपक्व टप्प्याचे विचारवंत व्यक्तिवादी स्वातंत्र्याला खऱ्या स्वातंत्र्याचा दर्जा देत नाहीत. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे फक्त संपत्तीधारक व्यक्तींचं किंवा सत्ताधीशांचं स्वातंत्र्य नसून प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य असा अर्थ होतो! प्रबोधनपर्वाच्या सुरुवातीच्या टप्प्यात उदारमतवादी विचारवंतांनी १६८८ मध्ये राज्यसंस्थेकडे अभावात्मक स्वातंत्र्याच्या मर्यादित अवकाशाचा आग्रह धरला होता. राज्यसंस्थेनं किमान अवकाश निर्माण करावा जिथं व्यक्तीच्या (खरंतर काही संपत्तीधारक व्यक्तींच्या!) अभिव्यक्तीसाठी आणि उपक्रमशीलतेसाठी अडथळे नसतील.
पण १७८९ पर्यंत अर्थात शतकभरात पाश्चात्त्य समाजात प्रामुख्यानं फ्रान्समध्ये अशी स्थित्यंतरं घडतात की स्वातंत्र्य हा शब्द फक्त काही व्यक्तींपुरता मर्यादित करणं अन्यायाचं द्याोतक समजलं जातं. स्वातंत्र्याच्या वैश्विकीकरणासाठी ‘समता’ हे ठोस तात्त्विक अधिष्ठान देण्यात येतं. इमॅन्युएल कांटच्या मांडणीत तर व्यक्तिवादी स्वातंत्र्याला नैतिक अर्थ नसतो. इतर पारतंत्र्यात असतील तर कुठलीही प्रबुद्ध आणि नैतिक व्यक्ती स्वत:ला खऱ्या अर्थाने स्वतंत्र म्हणू शकत नाही. त्यामुळे, फ्रेंच राज्यक्रांतीच्या मार्गदर्शक ब्रीदवाक्यात स्वातंत्र्याइतकंच समता या मूल्याला प्राधान्य देण्यात आलं.
पण माणसं जन्मत:च समान असतात असं तत्त्वत: मानलं आणि माणसं समान नैसर्गिक तत्त्वांनी बनलेली असली तरी वास्तवात त्यांचा जन्म फक्त निसर्गावस्थेत होत नसून मानवी अवस्थेत -म्हणजे ऐतिहासिक कारणांमुळे निर्माण झालेल्या विषमतावादी जगात- होतो. ज्यासाठी जन्माला आलेलं बाळ स्वत: जबाबदार नसतं. त्याअर्थी, इतिहास एकाच वेळी मनुष्याच्या स्वातंत्र्याचं द्याोतक आणि त्याच्या बाल्यावस्थेचा, परायत्ततेचा आणि गुलामगिरीचा पुरावा ठरतो. त्यामुळे, तत्त्वज्ञानाचं काम अनैतिहासिक न राहता इतिहास अर्थात मानवी अवस्थेत प्रबुद्धपणे हस्तक्षेप करून मानवतेच्या बाल्यावस्थेचा, परायत्ततेचा आणि गुलामगिरीचा शेवट घडवून इतिहासाला योग्य दिशा देणं आहे. जेणेकरून इतिहास मानवी स्वातंत्र्याचं निकोप प्रकटीकरण ठरेल.
कांटचा नैतिक मानव तर ऐतिहासिक विषमतेसोबतच नैसर्गिक कारणांमुळे निर्माण होणाऱ्या विषमतेचीही दखल घेतो. रूसोसाठी इतिहासानं केलेला अन्याय सहन करणं आत्मवंचना ठरते. नैसर्गिक विषमतेबाबतीत रूसो म्हणतो की, निसर्गानं केलेला अन्याय सहन करण्याची माणसाकडे नैसर्गिक क्षमता असते.
एकूणच स्वातंत्र्य आणि समता या दोन मूल्यांमध्ये अंतर्विरोध असल्यानं फ्रेंच राज्यक्रांतीचे शिल्पकार नवयुगाच्या मार्गदर्शक ब्रीदवाक्यात बंधुता या तिसऱ्या मूल्याचा अंतर्भाव करतात. कारण इतरांविषयी बंधुभावाची, ममत्वाची आणि मैत्रीची भावना नसेल तर स्वातंत्र्यासारख्या मूलभूत गोष्टीला मनुष्य स्वत:पुरतं मर्यादित करतो. इथं नमूद करणं सयुक्तिक ठरेल की, फ्रेंच राज्यक्रांतीच्या मूळ ब्रीदवाक्यात स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तीन मूल्यांसोबतच इतर शब्दसुद्धा होते जे फ्रेंच राज्यक्रांतीच्या जहाल रक्तरंजित टप्प्याची आठवण करून देतात. ‘स्वातंत्र्य, समता, बंधुभाव किंवा मृत्यू’ हे फ्रेंच राज्यक्रांतीचं मूळ ब्रीदवाक्य आहे. स्वातंत्र्य, हे मूल्य मनुष्याचं सारभूत तत्त्व असल्याने इतरांना स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणं म्हणजे त्यांची मानवता नाकारणं. इतरांचं स्वातंत्र्य मानून त्यासाठी परिस्थिती निर्माण करणं मानवतावादी आणि न्याय्य समाजाचं कर्तव्य ठरतं. मानवतावादी आणि न्याय्य समाज निर्मितीसाठी मृत्यू पत्करण्याची किंवा मृत्युदंड देण्याची तयारी असली पाहिजे, असा अर्थ मूळ ब्रीदवाक्याचा होतो. कारण विषमता आणि अन्याय फक्त अज्ञानामुळे नसून हितसंबंधांना अबाधित ठेवण्याच्या रणनीतीचा भाग असतो, जिथं ‘किंवा मृत्यू’ म्हणजे लिबर्टिसाइड छावणीनं लादलेली हिंसा ठरते. थोडक्यात, ‘किंवा मृत्यू’ हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या मूळ ब्रीदवाक्यातला भाग आठवण करून देतो की स्वातंत्र्य आणि समता ही मूल्यं आपोआप मिळत नसतात. त्यासाठी बलिदान अपरिहार्य आहे. पण हिंसा आणि बलिदानाचं द्याोतक ठरलेला तो भाग कालौघात गाळण्यात आला आहे. उदा.- १८४८ मध्ये तिसरी फ्रेंच राज्यक्रांती घडून भांडवलवादी बुर्ज्वा वर्ग श्रमिक वर्गाच्या मदतीने सत्तारूढ झाला. त्यावेळी ‘किंवा मृत्यू’ हा भाग वगळून ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ या शब्दांचा फ्रेंच रिपब्लिकच्या ब्रीदवाक्यात निरुपद्रवीपणे अंतर्भाव करण्यात आला.