‘मारहाण केली तर लगेच मराठी बोलता येईल का?’ असे वक्तव्य केलेला कार्यक्रम संपल्यावर महामहीम शयनकक्षात परतले तरी त्यांच्या मनातले विचारचक्र सुरूच होते. या वादात पडायचे की नाही यावरून त्यांच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून घोळ सुरू होताच. शेवटी दिल्लीशी निष्ठा राखायची असेल तर एक तरी संधी साधायलाच हवी असे ठरवत त्यांनी धाडस केले. यावरून तमिळनाडूत काय प्रतिक्रिया उमटेल याचा अंदाज त्यांना येत नव्हता. एवढ्यात त्यांचा फोन वाजला. पलीकडे निशिकांत दुबे होते.
नाव बघताच ते चपापले. त्यांनी शयनगृहाचे दार घट्ट लावून घेतल्यावरच फोन उचलला. दुबेंनी खो खो हसत त्यांचे अभिनंदन केले. तुम्ही बोललात हे बरेच झाले. ही मराठीची मारहाणरूपी चळवळ ठेचून काढायलाच हवी. आता चाणक्यांच्या यादीत तुमची क्रमवारी नक्की सुधारलीच म्हणून समजा असा दिलासा देत दुबेंनी फोन ठेवला. यानंतरही महामहिमांचे विचारचक्र थांबेना! गेले वर्षभर आपण महाराष्ट्रात आहोत पण आधीच्यांप्रमाणे कोणत्याही वादात अडकण्याचा मोह टाळला. या वेळी मात्र राहवले नाही. या राज्यातले लोक आता मराठीचा आग्रह धरू लागले आहेत.
आपल्या तमिळनाडूत तर आधीपासून तमिळशिवाय कुणाचे पान हलत नाही. मग महाराष्ट्रीय लोकांची चूक काय असा प्रश्न मनात येताच त्यांच्यात अपराधीभाव दाटून आला. तिथे राहायचे असेल तर जशी तमिळ शिकावी लागते, तशी इथे मराठी शिकली तर काय वाईट या प्रश्नासरशी आपल्या प्रतिपादनात चूक तर झाली नाही ना अशी शंका त्यांच्या मनाला चाटून गेली. मारहाण केल्याबरोबर कुणाला मराठी बोलता येणार नाही हे खरेच, पण मार खाण्याची पाळी येईपर्यंत मराठी का आत्मसात केली नाही हाही प्रश्न योग्यच, हे लक्षात येताच त्यांचा चेहरा कसानुसा झाला. लगेच त्यांनी टेबलवर ठेवलेला तांब्याच्या गडव्यातील पाणी प्यायले.
थोडे हायसे वाटल्यावर पुन्हा ते विचार करू लागले. मातृभाषेचा आग्रह धरूनही तमिळनाडू औद्योगिक गुंतवणुकीत अव्वल आहेच. तिथेही भाषेवरून मारहाणीच्या घटना घडतात असे आपण आजच्याच भाषणात सोदाहरण सांगितलेच. मग महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही असे आपण कसे काय म्हणून गेलो या प्रश्नासरशी त्यांच्या मनातली सल अधिक ठसठसू लागली. मराठीचा आग्रह ठीक पण मारहाण नको एवढेच आपण म्हणायला हवे होते. निष्ठा सिद्ध करण्याच्या नादात जरा जास्तच बोलून गेलो अशी भावना त्यांच्या मनात घर करू लागली तसे ते अस्वस्थ होऊन फेऱ्या मारू लागले.
आपल्या आधीचे महामहीम भगतसिंह कोश्यारी येथे असताना मराठी शिकले. त्यांनी शिकवणीच लावली होती. आपण तर वर्षभरापासून तेही केले नाही. कारण काय तर तमिळ अस्मिता. मग अशीच अस्मिता मराठी भाषकांनी बाळगली तर त्यात गैर काय या प्रश्नासरशी ते भानावर आले. ते काही नाही, आता पुढच्या कार्यक्रमात चार वाक्ये तरी मराठी बोलायचीच व या वादावर पडदा टाकल्यासारखे करायचे असे ठरवल्यावर त्यांच्या मनातले विचारचक्र थांबले. तेवढ्यात एक सेवक आत आला. राजभवनच्या प्रवेशद्वारावर वर्षा गायकवाड, डॉ. शोभा बच्छाव व प्रतिभा धानोरकर या तीन खासदार उभ्या आहेत. त्यांना तुमची भेट हवी आहे. हा निरोप मिळताच महामहिमांची पार भंबेरी उडाली. आता काय करायचे तेच त्यांना समजेना! अखेर प्रकृती ठीक नाही असा निरोप त्यांनी पाठवून दिला.