दिवाळीचे चार दिवस आता, मग महिन्याभराचं अंतर आणि उरलेली दिवाळी त्यानंतर, असा प्रकार होऊ शकतो का? अधिक मासासंबंधी नियम वरवर पाहिले तर तसं वाटू शकतं. पण काळजी नसावी. दिवाळी अनंत कालपर्यंत अ-खंडितच राहणार आहे. शालिवाहन शक किती नियमबद्ध आहे ते पाहतो आहोत आपण. पंचांगकर्त्यांनी ‘तिथी’, ‘दिवस’, ‘मास’, ‘वर्ष’ या सगळ्यांच्या व्याख्या केल्या, नियम बनवले. ते त्या नियमांना घट्ट धरून राहिले. कोणताही अपवाद नाही, नियम वाकवणं नाही, नियमांना मुरड घालणं नाही की बगल देणं नाही. हा पंचांगकर्त्यांचा आपल्या गणितावरचा दृढ विश्वासच. त्यांना त्यांच्या गणिताविषयी खात्री होती म्हणून तर ते एवढ्या आत्मविश्वासाने, भरवशाने नियमांचं पालन करताना दिसतात. आणि जेव्हा नियम हे असे गणिताच्या शास्त्रशुद्ध कसोटीवर बिनचूक उतरलेले असतात तेव्हा त्यांना धरून राहणंच हिताचं. असो.

या अनेक नियमांमधला एक नियम असं सांगतो की जेव्हा एखादा महिना अधिक असतो तेव्हा त्या महिन्यात साजरे करायचे सगळे सणवार ‘निज’ महिन्यात साजरे करावेत. म्हणजे काय ते समजून घेऊ. समजा, एखाद्या संवत्सरात श्रावण अधिक महिना असेल तर आषाढ महिन्यानंतर अधिक श्रावण महिना येईल आणि नंतर निज श्रावण महिना येईल. म्हणजे एका अर्थाने दोन श्रावणमास झाले. आणि श्रावणात सणवारांची रेलचेल असते — शुक्लपक्षात नागपंचमी, नारळीपौर्णिमा वगैरे आणि कृष्णपक्षात श्रीकृष्णजयंती, पिठोरी अमावास्या वगैरे. त्याशिवाय मंगलागौरीव्रतपूजन याच महिन्यात असतं. आणि कित्येक व्रतवैकल्यही याच महिन्यात करावी असं आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की ही सगळी कोणत्या महिन्यात करावी? अधिक श्रावण की निज श्रावण?

पंचांगकर्त्यांनी याचं सुस्पष्ट उत्तर दिलं, निज श्रावण महिन्यात. आणि शालिवाहन शकाच्या बाकीच्या नियमांप्रमाणे या नियमालाही अपवाद नाही. कोणताही महिना अधिक येवो, नियम तोच. म्हणून जेव्हा भाद्रपद अधिक महिना येतो तेव्हा श्रावण महिन्यानंतर अधिक भाद्रपद येतो आणि त्यानंतर निज भाद्रपद. पण श्रीगणेश चतुर्थी मात्र निज भाद्रपद महिन्यात साजरी करतात.

पण या नियमाचं पालन करायचं तर एक मोठीच पंचाईत होऊ शकते. समजा एखाद्या वर्षी कार्तिक महिना अधिक आला तर? आधी आश्विन महिना येईल. मग अधिक कार्तिक महिना येईल. आणि त्यानंतर निज कार्तिक महिना येईल.

आश्विन महिन्यातले सगळे सण आश्विन महिन्यात साजरे होतील. आणि कार्तिक महिन्यातले सगळे सण निज कार्तिक महिन्यात. त्यामुळे आश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना होईल. मग आपण आश्विन शुक्ल दशमीला विजयादशमी आणि आश्विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा साजरी करू. त्यानंतर आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी, आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी, आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी आणि आश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन हे दिवाळीचे पहिले चार दिवस येतील.

आणि मग? पुढचा दिवस बलिप्रतिपदेचा असायला हवा. आणि इथेच घोडं पेंड खातं. कारण या आश्विन महिन्यानंतर अधिक कार्तिक महिना येईल. अधिक कार्तिक महिन्यात कोणतेही सणवार, उत्सव साजरे करायचे नाहीत असा नियम आहे. त्यामुळे पुढचा अख्खा महिना तसाच जाईल. त्यानंतर निज कार्तिक महिना येईल. या महिन्यातला प्रतिपदेला बलिप्रतिपदा साजरी करता येईल. सोबतच्या आकृतीतून मुद्दा लक्षात येईल.

थोडक्यात काय, तर लक्ष्मीपूजनानंतर एक महिन्याची विश्रांती आणि मग उरलेली दिवाळी असा काहीसा प्रकार होईल. आता यातून काही व्यावहारिक अडचणी उभ्या राहतील. फराळाचे पदार्थ एवढे महिनाभर टिकतील का? नाही तर उरलेल्या दिवाळीसाठी पुन्हा नव्याने फराळ तयार (किंवा ऑर्डर!) करावा लागणार. रोषणाईचे दिवे महिनाभर तसेच ठेवावे लागणार. आणि फटाके? ते थोडे आता, थोडे महिन्याभरानंतर असे वाजवावे लागणार! असो.

वर्षातला सर्वात महत्त्वाचा सण. आणि त्यात हे विघ्न? खंडित दिवाळी? पंचांगकर्त्यांना या शक्यतेची कल्पना नव्हती असं म्हणायचं का? की ते आपले नियमाला धरून बसले, सणवारांसाठी ज्या काही तडजोडी कराव्या लागतील त्या तुमच्या तुम्ही पाहा असा प्रकार आहे?

नाही. पंचांगकर्त्यांना याची स्पष्ट कल्पना होती. आपण करत आहोत ते नियम पाळताना अशा व्यावहारिक अडचणी येणार नाहीत याची तजवीज त्या नियमांतच त्यांनी केली. म्हणजे, त्यांनी केलेला नियम पाळला तर वर वर्णन केलेली परिस्थिती निर्माण होणं शक्यच नाही. अगदी कालत्रयी शक्य नाही. तेव्हा, दिवाळी अ-खंडित राहील याची खात्री बाळगा.

पंचांगकर्त्यांचा हा आत्मविश्वास कशाच्या बळावर होता? ‘काळाचे गणित’ नीट अवगत असेल तरच असा आत्मविश्वास असू शकतो. आता हे सगळं नेमकं कसं होतं, का होतं वगैरे आपण पाहणार आहोतच. पण ते पुढच्या भागात.