मुख्तार अब्बास नक्वी ( भाजप नेते (पक्षाचे माजी सरचिटणीस) व माजी केंद्रीय मंत्री)
‘भारत आज दहशतवाद आणि दंगलींपासून मुक्त आहे आणि देश समृद्धीच्या मार्गावर पुढे जात आहे.’ ‘हे यश काँग्रेस आणि मंडळीला खुपते,’ म्हणून त्यांनी ‘देशाच्या बदनामीचा डाव’ रचला असल्याचा दावा करून, तरीही भारत पुढेच जाईल हे सांगणाऱ्या लेखाचा हा अनुवाद*..
लोकशाही पद्धतीने पराभूत झालेल्या घराणेशाहीच्या सदस्यांनी चालवलेल्या अपप्रचार- मोहिमेमध्ये एक कार्यपद्धती असल्याचे दिसते. लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतील आपला अपमानास्पद पराभव पचवता न आल्याने काँग्रेस आणि त्यांच्या मित्रमंडळीने भारताच्या चैतन्यशील लोकशाही मूल्यांवर टीका करण्याचा डाव आखला आहे. २०१५ मध्ये, जेव्हा ५४ आफ्रिकन देशांचे राष्ट्रप्रमुख आणि मंत्री जागतिक आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी भारतात आले होते, तेव्हा या निराशावादी राजकीय भिडूंनी ‘पुरस्कार वापसी’ मोहीम सुरू केली आणि देशात असहिष्णुता फैलावल्याची बोंब ठोकली. सन २०२० मध्ये जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते, तेव्हा त्यांनी शाहीन बाग आंदोलन घडवून आणले आणि आता भारत ‘जी-२०’च्या अध्यक्षस्थानी असताना भारतीय लोकशाही, तिची संसदीय व्यवस्था आणि पारदर्शक सांविधानिक संस्थांवर सुनियोजित हल्ले केले जात आहेत. घराणेशाहीला जनादेशाचा तिटकारा किती आहे, हेच यावरून दिसून येते.
काही हताश लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक स्तरावरचा वाढता दर्जा पाहिल्यावर खवखव होते. वास्तविक मोदीजींचे यश हे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत मिळवलेले यश आहे. जेव्हा मी अशा परिस्थितीतील त्यांच्या यशाचे विश्लेषण करतो तेव्हा अमेरिकन उद्योजक बिझ स्टोनचे शब्द मला आठवतात : ‘‘जोखीम घेण्याची इच्छा हा यशाचा मार्ग आहे!’’ गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, निर्णयक्षमतेतील धडाडी आणि सेवांचे चोख वितरण या चारही अपेक्षा भरभरून पूर्ण केल्या असल्याने भारतीय राजकारणातील ‘घराणेदार’ अभिमान चिरडला गेला आहे. मोदीजींमुळे आता ध्रुवीकरणाचे राजकारण चालत नाही- त्याची जागा आता समृद्धीच्या राजकारणाने घेतली आहे. ग्रामस्थ असोत, शेतकरी असोत, गरीब असोत, महिला असोत की तरुण असोत, पंतप्रधान मोदी यांनी या साऱ्यांच्या विकासावरच भर दिल्याने समाजातील प्रत्येक घटकाला फायदा झाला, हा जनतेचा विश्वास आहे. भाजप हा राज्यकारभाराचा नैसर्गिक पक्ष म्हणून उदयास आला आहे.
सन १९७७ मध्ये, ‘जनता पक्ष’ आणि त्याचे सहयोगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या आघाडीने बहुमत मिळवले. पण ते सरकार दोन वर्षांत कोसळले आणि स्थिर सरकार बनवणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस, हे जनतेला पटवून देण्यात काँग्रेसला यश आले. पुढील सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने ‘सरकार कोण चालवू शकेल त्यांनाच निवडा’ असा नारा दिला. १९८० च्या निवडणुकीत काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष पुन्हा सत्तेत आले. १९८९ पासून लागोपाठच्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकाही बिगरकाँग्रेस पक्षाला किंवा बिगरकाँग्रेस आघाडीला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. एक तर ही सरकारे काँग्रेसच्या आधाराने चालली किंवा परस्परविरोधी विचारसरणी घेऊन चालली.
उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेकडून ईशान्येपर्यंत भाजपची चमकदार कामगिरी हेच सिद्ध करते की, भाजप हा काही आता हिंदीभाषक राज्यांपुरता पक्ष राहिलेला नाही. सुमारे एक दशकभरापूर्वी ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपची उपस्थिती नगण्य होती. आज तो त्या प्रदेशाच्या राजकारणाचा आधारस्तंभ बनला आहे. हा बदल सकारात्मक असला तरी तो घराणेशाहीच्या डोळय़ांना खुपणाराच ठरला हे उघड आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक दर्जा वाढतोच आहे, हे वास्तव पचवता न आल्यामुळे काँग्रेस आणि मित्रपक्ष हताश झाले आहेत.
काँग्रेस आणि त्या पक्षाच्या मित्रमंडळीला जे सत्य आजतागायत पचवताच येत नाही, ते सत्य असे की, पहिल्यांदाच बिगरकाँग्रेस सरकारने देशाला प्रतिष्ठा आणि समृद्धीच नव्हे तर ‘स्थैर्य आणि विश्वासार्हता’सुद्धा मिळवून दिली आहे. निवडणुकीत सततच्या अपयशामुळे निराश होऊन, काँग्रेस अनेकदा ‘भारतविरोधी सिंडिकेट’मध्ये सामील होते – हे ‘सिंडिकेट’वाले लोक पीएम मोदींना बदनाम करण्यासाठी उतावीळ असतात.. सर्जिकल स्ट्राइकवर त्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले, राफेल करारावर त्यांनीच गोंधळ निर्माण केला आणि कोविड महासाथीच्या ऐन काळातही, सरकारच्या प्रयत्नांबद्दल यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही!
जगभरातून कौतुक!
भारत आज दहशतवाद आणि दंगलींपासून मुक्त आहे आणि देश समृद्धीच्या मार्गावर पुढे जात आहे. सामान्य माणसाच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करणारी गेली नऊ वर्षे ही देशासाठी निर्णायक आणि दिशादर्शक वर्षे आहेत.
पंतप्रधान मोदींच्या दृढनिश्चयी आणि मेहनती नेतृत्वाखाली सरकारने पायाभूत सुविधा, व्यवसाय, उत्पादन, आरोग्य आणि प्रत्येक विभागाच्या कल्याणाला अभूतपूर्व चालना दिली आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला कोणताही भेदभाव न करता विकासाचे लाभ मिळावेत यासाठी मोदी सरकारने जात, समुदाय, प्रदेश आणि धर्माचे बंधन मोडून काढले आहे. आज, भाजपचे टीकाकारदेखील कबूल करतात की, २०१४ नंतरच देशाने कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक सेवांच्या वितरणात महत्त्वपूर्ण बदल पाहिले आहेत – मग ते गरिबांसाठी घरे बांधणे असो, शौचालये बांधणे असो, मूलभूत
पायाभूत सुविधांची उभारणी असो किंवा वंचित घटकांना आर्थिक मदत करणे असो.. हे सारे, कुणाची जात आणि धर्म न पाहाता, सर्वाना मिळते आहे.
तिहेरी तलाक या सामाजिक दुष्प्रवृत्तीचे उच्चाटन, कलम ३७० रद्द करणे आणि शतकानुशतके जुन्या राम मंदिर विवादाचे सौहार्दपूर्ण निराकरण यांसारखे अनेक धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत – आता अयोध्येत भव्य मंदिर बांधले जात आहे. कोविड महासाथीदरम्यान भारताने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवली आणि ‘मेड इन इंडिया’ कोविड लस जीव आणि उपजीविका वाचवण्यासाठी प्रमुख ढाल म्हणून उदयास आली.
भारताच्या शेजारी देशांसह जगातील अनेक राष्ट्रे जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडय़ाने आणि अन्नपदार्थाच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींनी त्रस्त असताना, भारत जगातला सर्वात मोठी अन्नसुरक्षा उपक्रम असलेल्या ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत सुमारे ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवत आहे. समाजाप्रति संवेदनशील आणि गरिबांना आधार देणाऱ्या अशा या उपायांविषयी जगभरातून कौतुक आणि स्तुती असाच प्रतिसाद मिळतो आहे, हे कसे विसरता येईल?
* मूळ इंग्रजी लेख ७ एप्रिल २०२३ रोजी, ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रकाशित झाला होता.
