बाईपण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे, पण पौरुष्याविषयीच्या साचेबद्ध संकल्पनांची, त्याच्या ओझ्याची चर्चा मात्र अपवादात्मकच असते. बदलत्या काळात त्याचे स्वरूप बदलले, मात्र ओझे कायम राहिले. नेटफ्लिक्सवरील ज्या ‘अ‍ॅडोलेसन्स’ या मालिकेने पौगंडावस्थेतील मुलांच्या मनातील पौरुष्याच्या कल्पनांचे विदारक चित्रण केले, त्यातील अभिनेता स्टीफन ग्राहम आता याच विषयावर पुस्तक लिहिणार आहेत. ‘लेटर्स टू अवर सन्स’ असे या पुस्तकाचे शीर्षक असून मालिकेचाच धागा पकडून पुढे जाण्याचा प्रयत्न पुस्तकात करण्यात येणार आहे.

पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की लेखकाने जगभरातील वडिलांचा आपल्या मुलग्यांना वाढवितानाचा दृष्टिकोन, त्यात आलेले अनुभव पाठवण्याचे आवाहन केले आहे. आजच्या काळातील पौरुष्याच्या कल्पनांविषयी त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न लेखक करतील. पुस्तक ब्लूम्सबरी प्रकाशन प्रकाशित करणार आहे. पुस्तकासाठी अनुभव पाठवण्याची मुदत १५ ऑक्टोबर २०२५ ते १२ जानेवारी २०१६ पर्यंत असणार आहे. ऑक्टोबर २०२६मध्ये पुस्तक प्रकाशित होईल. ‘अ‍ॅडोलेसन्सने उपस्थित केलेला मुद्दा पुढे नेण्याचा प्रयत्न हे पुस्तक करेल आणि आपल्या पाल्यांशी संवाद वाढविण्याची निकड अधोरेखित करेल,’ अशी अपेक्षा स्टीफन ग्राहम यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केली आहे.

स्टीफन मानसशास्त्राचे अध्यापक ऑर्ली क्लेन यांच्या सहाय्याने या पुस्तकाचे लेखन करतील. या पुस्तकातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग दोन्ही लेखक आणि प्रकशाक ‘मॅनअप’ आणि ‘डॅड ला सोल’ या पुरुषांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना देणगी रूपात देणार आहेत. ‘अ‍ॅडोलेसन्स’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातून ही कल्पना उदयास आल्याचे ग्राहम यांनी एका निवेदनात म्हटले आहे. सर्व वयोगटांतील वडिलांचे – पहिल्यांदाच वडील झालेले, संगोपनात योगदान देणे शक्य नसलेले, आपल्या मुलाविषयीचे प्रेम इच्छा असूनही व्यक्त करू न शकलेले अशा विविध वडिलांची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात येणार आहे.

समवयीन मुलींना आपण आकर्षक वाटत नाही, या न्यूनगंडात वावरणाऱ्या आणि त्यातून टोकाचे, हादरवणारे पाऊल उचणाऱ्या एका हुशार किशोरवयीन मुलाची शोकांतिका ‘अ‍ॅडोलेसन्स’ या मालिकेने मांडली. ‘एमी पुरस्कारां’नी या मालिकेच्या महत्त्वावर मान्यतेची मोहोर उमटवली. कुठेही कट न करता सलग चित्रित करण्यात आलेले एपिसोड्स, त्यासाठी संपूर्ण चमूने केलेला सराव हे चर्चेचे विषय ठरले होतेच, मात्र वेबसिरीजचे त्याहूनही महत्त्वाचे योगदान म्हणजे आजच्या पिढीची मानसिक घुसमट तिने पालकांसमोर आणली. यानिमित्ताने या गंभीर विषयावर सुरू झालेली चर्चा पुढे नेणे, त्यातून काही मार्ग निघतात का पाहणे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे.