पहलगाम हल्ल्यानंतर जनतेला प्रतीक्षा होती ती हल्ल्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींना लवकरात लवकर शिक्षा देण्याची आणि केवळ १५ दिवसांतच देशाचे सैन्य दल आणि राजकीय नेतृत्वाने पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. याच संदर्भातील ‘दहशतवादाचा दमनदिन’ हे संपादकीय (८ मे) वाचले.

हल्ल्यानंतर भारताने पाकची कोंडी करण्यासाठी अनेक पावले उचलली. संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय नाणे निधी या संस्थांच्या माध्यमातून पाकवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चहुबाजूंनी पाकची कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्नदेखील केले जात आहेत. युद्धामुळे केवळ नुकसानच झाल्याचे इतिहास सांगतो. पाकिस्तान हा बेजबाबदार, विध्वंसक, दहशतवाद्यांना पोसणारा देश आहे. तो आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असूनही त्याची खुमखुमी काही जात नाही. भारत हा जबाबदार देश आहे. आपण समर्थ असलो, तरी युद्ध हा शेवटचा पर्याय ठरावा. किमान यापुढील काळात तरी पाक पुरस्कृत दहशतवादी आणि त्यांना बळ देणारे घटक योग्य धडा घेतील अशी अपेक्षा.

● अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)

डबघाईस आलेल्या देशाला चोख संदेश

‘दहशतवादाचा दमनदिन’ हा संपादकीय लेख (८ मे) वाचला. व्यक्त केल्या जात असलेल्या अंदाजांपेक्षा वेगळी, व्यापक आणि परिणामकारक कारवाई केली हे भारतीय सेनादले आणि मुत्सद्देगिरीचे यश. या कारवाईमुळे पाकिस्तान आणि जगाला एक निश्चित संदेश देण्यात यश मिळाले. या मोहिमेचे ‘सिंदूर’ हे नामकरण विशेष! याविषयी सरकारतर्फे परराष्ट्र सचिवांसह कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमा सिंग यांनी वार्ताहरांसमोर केलेल्या निवेदनातून धर्मकेंद्री आंधळ्या राष्ट्रवादी पाकिस्तानी सैन्याधिकाऱ्यांना जसा चोख संदेश दिला, तसाच तो आपल्या देशातील अशाच नवधर्मांध राष्ट्रभक्तांनाही मिळाला. दहशतवाद आणि धर्मांधता यांना कवटाळणाऱ्या पाकिस्तानचे प्रचंड नुकसान तेथील वरिष्ठ सैन्याधिकारी आणि धर्मगुरूंनी केले आहे. युद्ध किंवा युद्धसदृश मोहीम असो शत्रूला गाफील ठेवत अनपेक्षित आणि अचानक हल्ला ही नीती यशस्वी ठरते. १९७१मधील कराची बंदरावर भारतीय नौदलाने केलेल्या अशाच अनपेक्षित हल्ल्याने जगातील संरक्षणतज्ज्ञांनी तोंडात बोटे घातली होती. सिंदूर मोहीम ही सुरुवात आहे शेवट नव्हे, प्रत्यक्ष युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. देशातील जनता आणि विरोधी पक्ष यांनी सरकारला दिलेला एकमुखी पाठिंबा हेसुद्धा उल्लेखनीय ठरते. याउलट पाकिस्तानी राज्यकर्ते आणि सैन्य यांच्यात वर्चस्वासाठीचा सततचा संघर्ष, डबघाईस आलेली अर्थव्यवस्था आणि देशांतर्गत एकात्मतेचा अभाव यामुळे त्यांनी जर युद्ध पुकारण्याचे दु:साहस केले तर बुडत्याचा पाय अधिक खोलात जाईल हे नक्की.

● अॅड. वसंत नलावडे, सातारा

लष्करशहांच्या कुटिलतेचा परिणाम

‘दहशतवादाचा दमनदिन!’ हा अग्रलेख वाचला. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची- काश्मीर प्रश्न आणि पर्यायाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे मूळ हे अनेक दशके किंबहुना शतकांहूनही जुने आहे, ब्रिटिश राजच्या धोरणांत ते रुजलेले आहे- ही मांडणी समर्पक वाटते. दोन्ही देशांत शांततेसाठी मध्यस्थी करून आग्नेय आशियात काही चांगले व्यापारी करार करावेत, अशी त्यांची कल्याणकारी भांडवलशाही संकल्पना त्यांना जागतिक शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर होण्यासाठी पुरेशी आहे. काश्मीरला धार्मिक प्रश्न म्हणून चिघळत ठेवणे ही दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्करशहा यांची कुटिल खेळी आहे. भारताला चुचकारून आणि पाकिस्तानला समज देऊन मध्यस्थीसाठी रशिया, चीनपासून इराणपर्यंत सर्वच जागतिक शक्ती कामाला लागल्या आहेत.

● एम. एस. नकुल

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असूनही…

‘दहशतवादाचा दमनदिन!’ हे संपादकीय वाचले. आपला सख्खा आणि उपद्व्यापी शेजारी पाक केवळ कर्जबाजारीच झाला नसून, तो दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनास भिडल्या आहेतच, पण त्यांची तीव्र टंचाईही आहे. परिणामी सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. सरकारविषयी प्रचंड असंतोष आहे. तरीही भारताची कुरापत काढण्याची एकही संधी पाक सोडत नाही. दहशतवादास खतपाणी घालण्याचा त्यांचा उद्याोग सतत सुरू असतो. पहलगाममध्ये नुकताच झालेला हल्ला ही क्रौर्याची आणि असंवेदनशीलतेची परिसीमाच होती. या देशास लक्षात राहील असा धडा शिकविणे गरजेचे होते. आणि तो आपण शिकविला, पण त्यामुळे सैरभैर झालेला आपला शेजारी सुडाच्या भावनेने काहीही करू शकतो. यासाठी आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला पाहिजे. सीमा भागांत तर अधिकच सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. भारताच्या या हल्ल्यामुळे पाकमधील मूलतत्त्ववादी अधिकच आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

● अशोक आफळे, कोल्हापूर

आता तरी धार्मिक दुही टाळा

पाकिस्तानातील सर्वच लष्करशहांनी आपले आसन बळकट करण्यासाठी धर्मांधतेस खतपाणी घातले आणि आज पाकिस्तान एकटा पडला आहेच, पण दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरदेखील उभा आहे. भारतातील राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून धर्मांधतेस थारा न देता शेती, शिक्षण, उद्याोग आदींवर लक्ष केंद्रित केले. त्याचेच फायदे आज मिळत आहेत. आजची अचूक कारवाई हे त्याचेच उदाहरण. आज केंद्रात सत्तेवर असलेला भाजप आणि त्यांचे काही मुख्यमंत्री समाजात हिंदू-मुस्लीम दुही निर्माण करत आहेत. निवडणुकीत तर त्यांचा स्वर इतका कर्कश होतो की मुस्लीम, मटण, मंगळसूत्र, म्हैसही असे बरेच उल्लेख केले जातात. अशा स्थितीत सैन्य दलांनी पत्रकार परिषदेत महिलांना व त्यातही एका मुस्लीम व एका शीख महिलेला प्रतिनिधी म्हणून पाठवणे गौरवास्पद! देशातील सर्वच संस्थांचे राजकीयीकरण होत असताना भारतीय लष्कराने आपण राजकारणापलीकडे असल्याचे दाखवून दिले. सध्याच्या दूषित वातावरणात हा संदेश म्हणजे आशेची पहाट आहे. पाकिस्तानची स्थिती पाहून तरी आपले सत्ताधारी बोध घेतील आणि धार्मिक दुहीऐवजी समाजकारणाला महत्त्व देतील, अशी अपेक्षा.

● सुहास शिवलकर, पुणे

प्रशासन चालते, पण लोकशाहीचे काय?

‘आता निर्देश मग आधी स्थगिती का?’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरदेखील, त्या निवडणुका नक्की चार महिन्यांत होऊ शकतील का, या बद्दल संभ्रम आहेच. कारण, सबळ कारण असेल तर, निवडणूक आयोग त्यामध्ये सवलत मागू शकते. महाराष्ट्रात आता पावसाळा सुरू होईल आणि तो साधारण चार महिने राहील. गेल्या काही वर्षांतील त्याच्या असह्य लहरीपणाचा अनुभव लक्षात घेतला तर, निवडणूक आयोग, त्या आधारे निवडणूक वेळापत्रकासंबंधी काय निर्णय घेईल ते पाहावे लागेल. पण आजवरचा अनुभव लक्षात घेता, निवडणूक चिन्हाबद्दलचा वाद असो किंवा उमेदवाराच्या जात प्रमाणपत्राबद्दल किंवा प्रभाग रचनेवरून उद्भवलेला वाद असो, तो एकदा का न्यायालयात गेला, की त्याचा अंतिम निर्णय कधी लागेल, हे सांगणे कर्मकठीण होऊन बसते. परंतु शासन प्रशासन मात्र अशा परिस्थितीतसुद्धा नेहमीप्रमाणे सुरूच असते. त्यामुळे जनतेलाही फार आक्रोश करण्याचे कारण उरत नाही. पण लोकशाही व्यवस्थेतील आत्मा असलेले ‘मतदान’ मात्र लांबणीवर पडते.

● मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)

आपण धडा कधी शिकणार?

‘ऑपरेशन सिंदूर योग्यच, पण पुढे…’ हा जावेद अश्रफ यांचा लेख (८ मे) वाचला. आजवर झालेले अतिरेकी हल्ले पाहता असेच दिसून येते की अतिरेकीच आपल्याला धडा शिकवत असतात. आपल्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी हेरून नेमके तिथेच हल्ले करत असतात. परंतु आपण अतिरेक्यांच्या कृतीतून कोणताही धडा न शिकता सुस्तावलेल्या अवस्थेत शिरतो आणि अशा घटना घडल्यानंतर पुन्हा सावध होतो, त्यावर तात्पुरती कारवाई करतो आणि काही कालावधीनंतर पुन्हा सुस्तावलेल्या अवस्थेत शिरतो. यासाठी लेखकाने सुचवलेले मार्गदर्शक उपाय अमलात आणणे आवश्यक आहे. अतिरेक्यांच्या या कृत्यापासून आपण धडा कधी शिकणार?

● सावळाराम मोरे, नालासोपारा