‘आळस आणि भ्याडपणा ही मनुष्याच्या परायत्ततेची प्रमुख कारणं… म्हणून बहुतेक माणसं स्वबुद्धी न वापरता ‘बाल्यावस्थेत’ असतात’ हे ‘प्रबोधना’तून केलं गेलेलं निदान १७८४ मधलं!
All things must be examined, debated, investigated without exception and without regard for anyone’ s feelings. – Denis Diderot
पाश्चात्त्य आधुनिकतेची सुरुवात रनेसॉन्सरूपी १५व्या शतकात इटलीमध्ये झाली आणि १६व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत रनेसॉन्सची लाट संपूर्ण पाश्चात्त्य जगात पसरली, हे याआधी आपण पाहिलं. जवळपास दोन शतकं चाललेल्या रनेसॉन्सच्या चळवळीला ‘आधुनिकतेची पहाट’सुद्धा म्हटलं जातं. पण या पुनरुत्थानात सापडलेला प्राचीन ज्ञानाचा प्रकाश मध्ययुगाचा गडद अंधकार दूर करण्यास पुरेसा नव्हता. उलट, कॅथोलिक धर्मसत्तेनं ताठर भूमिका घेत ‘काउंटर रेफर्मेशन’मार्फत विद्रोहींवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. त्यामुळे आधुनिकतेच्या पहाटच्या मानवतावादी सूर्याला धर्मयुद्धाचं, यादवीचं, अराजकतेचं ग्रहण लागलं.
दुसऱ्या बाजूला, १७व्या शतकातले आधुनिकतावादी विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत, साहित्यिकांना सुद्धा रनेसॉन्सच्या मर्यादा लक्षात आल्या. रनेसॉन्सच्या समर्थकांनी मध्ययुगीन धार्मिक चौकटीच्या जागी आणि विरोधात प्राचीन ज्ञान परंपरेला एका प्रकारे पावित्र्य बहाल करून दिलं होतं. पण वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरणारी आधुनिकवादी छावणी प्राचिनांनासुद्धा प्रश्नांकित करते. विज्ञानयुगाची मुहूर्तमेढ करणाऱ्या गॅलिलिओ, देकार्त, गॅसन्डी, हॉब्ज, पास्कल, न्यूटन, जॉन लॉक सारख्या ‘रिपब्लिक ऑफ लेटर्स’च्या सदस्यांना मध्ययुगीन धार्मिक चौकटीसोबतच प्राचिनांचंही ओझं अडथळ्यासारखंच वाटू लागलं. परिणामी, १७व्या शतकाच्या उत्तरार्धात The Quarrel between the Ancients and the Moderns हे प्रकरण गाजलं.
आधुनिकतेच्या निर्णायक टप्प्याची सुरुवात १७व्या शतकाअखेरीस झाली. तत्त्वज्ञानाची भाषा, माध्यम, जागा, प्रयोजन यांत मूलभूत बदल झाला. तत्त्वज्ञान फक्त अमूर्त अनैतिहासिक व्यवहार न राहता ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय बनलं. आधी तत्त्वज्ञान म्हणजे सर्वसामान्यांना अनाकलनीय असा ‘रिपब्लिक ऑफ लेटर्स’च्या निवडक सदस्यांचा अमूर्त ज्ञानव्यवहार होता. हळूहळू तत्त्वज्ञान म्हणजे सार्वजनिक, लोकाभिमुख, आक्रमक, कृतिशील ज्ञानव्यवहार म्हणून उदयास आला. तत्त्वज्ञान म्हणजे वर्तमान परिस्थितीत ठोस हस्तक्षेप, अशी तत्त्वज्ञानाची आक्रमक प्रतिमा उदयास येते. मोन्टेस्किअ, व्होल्टेर, दिदरो, रूसो, बोमार्शे, सारखे तत्त्वज्ञ-प्रबोधनकार समाजात पावलोपावली हस्तक्षेप करताना दिसतात. यामुळे तत्त्वज्ञान प्रबोधनपर बनतं. प्रबोधनपर्वाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानव्यवहार आणि समग्र मानवी व्यवहार यात स्पष्ट आणि आकलनीय ज्ञानशास्त्रीय दुवा स्थापित करून ज्ञानाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाली.
जॉन लॉक – प्रबोधनपर्वाचा अग्रदूत
खरंतर, हा क्रांतिकारक बदल जॉन लॉकच्या ज्ञानशास्त्रीय आणि राजकीय विचारांमध्ये प्रकर्षानं जाणवतो. त्यामुळे जॉन लॉक १७व्या शतकातला असला तरी त्याचा उल्लेख प्रबोधनपर्वाचा अग्रदूत म्हणून केला जातो.
प्रस्तुत लेखमालेचे आगामी लेख १८व्या शतकातल्या प्रबोधनपर्वासारख्या महत्त्वपूर्ण टप्प्याविषयी असल्यानं सर्वप्रथम प्रबोधन या शब्दाचा विविध अंगांनी विचार करणं आवश्यक आहे. प्रबोधन हा मराठी शब्द पाश्चात्त्य विचारविश्वातल्या Enlightenment, Lumières, Aufklarürng, Illuminismo सारख्या संकल्पनांचा अनुवाद आहे. पाश्चात्त्य विचारविश्वातल्या या समानार्थी वाटणाऱ्या संकल्पनांमध्येसुद्धा सूक्ष्म भेद आहे ज्याचा उलगडा येणाऱ्या लेखांमध्ये होईल. प्रस्तुत लेखांकात एक तत्त्वज्ञानात्मक संकल्पना म्हणून प्रबोधन म्हणजे काय याविषयीची प्राथमिक चर्चा करताना आधी १८व्या शतकातला प्रबोधनपर्वाविषयीचा गुंता अधोरेखित करणं सयुक्तिक ठरेल. खरंतर, १८व्या शतकातल्या विविध विचारवंतांचा एकाच सत्ताशास्त्रीय, ज्ञानशास्त्रीय, सौंदर्यशास्त्रीय आणि नीतिशास्त्रीय चौकटीत संकोच करता येत नाही. प्रबोधनपर्वाचा एकजिनसी दर्शनशास्त्रासारखा उल्लेख हा वस्तुस्थितीचा विपर्यास ठरेल.
प्रबोधन तत्त्वज्ञानाचे प्रसिद्ध अभ्यासक तोदोरोव्ह लिहितात की प्रबोधनाच्या विचारविश्वामध्ये विवेकवादी, अनुभववादी, भावनावादी, वैश्विकवादी, देशीवादी, अतीतवादी, इतिहासवादी अशा सगळ्यांचा द्वंद्वात्मकरीत्या अंतर्भाव होतो. प्रबोधनपर्व असा काळ आहे जेव्हा हे सगळे विचार पुस्तकांमधून ‘बाहेर पडून’ वास्तव जगात प्रवेश करून मानवी व्यवहाराला प्रकाशमान करतात. त्यादृष्टीनं प्रबोधनयुग हा विचारांच्या परिपक्वतेचा, पुनरावृत्तीचा आणि सूत्रबद्धतेचा काळ आहे. तोदोरोव्ह नमूद करतात की, मुळात प्रबोधनयुगाच्या मध्यवर्ती विचारांचा जन्म १८व्या शतकातला नाही. काहींचा प्राचीन काळातला तर काहींचा उगम मध्ययुगात/ रनेसॉन्समधला आणि १७व्या शतकातल्या अभिजात परंपरेतला. प्रस्थापित मांडणीत प्रबोधनाचं तत्त्वज्ञान आणि १८व्या शतकातलं पाश्चात्त्य जग यात बळेबळे गाठ मारली जाते. त्यामुळे १८व्या शतकातल्या पाश्चात्त्य जगाला जणू काही इतर स्थळ- काळांवर आधिपत्य लादण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. खरंतर कालौघात या मांडणीला खोडून काढण्यात आलं आहे. थोडक्यात, प्रबोधनपर्वाविषयी कालौघात सतत आकलन बदलत गेलं. प्रबोधनाच्या प्रकल्पाविरोधात अनेक वैचारिक छावण्या अस्तित्वात आल्या आहेत.
प्रबोधनाचं समर्थन वा विरोध करताना प्रबोधन या संकल्पनेच्या नेमक्या कोणत्या पैलूंचं समर्थन किंवा विरोध करतोय याविषयी स्पष्टता असणं गरजेचं आहे. कारण प्रबोधनाची संकल्पना एकाच वेळी १८व्या शतकातील पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातली द्वंद्वात्मक वैचारिक घुसळण आणि सोबतच स्थलकालनिरपेक्ष असा वैश्विक तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन यांचा निर्देश करते. आगामी लेखांमध्ये प्रबोधनपर्वाचा गुंता उलगडण्याचा प्रयत्न करूच, पण त्याआधी तत्त्वज्ञानातला वैश्विक प्रश्न : ‘प्रबोधन म्हणजे काय?’ याविषयी चर्चा करून प्रबोधन संकल्पनेची प्राथमिक व्याख्या करू; जेणेकरून प्रबोधनपर्वांतर्गत आढळणाऱ्या बहुजिनसी ज्ञानव्यवहाराचा एकत्रितपणे निर्देश करणारं पद्धतीशास्त्रीय सूत्र हाती लागेल.
प्रबोधन म्हणजे काय? कांटची ‘व्याख्या’
प्रबोधन (Aufklärung) म्हणजे बाल्यावस्थेतून बाहेर पडणं, वयात येणं, परायत्ततेतून सुटका करून स्वायत्त होणं, असं उत्तर इमॅन्युएल कांटने १७८४ मध्ये Was ist Aufklärung? या ऐतिहासिक लेखात दिलं आहे. अठराव्या शतकात सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर वर्तमानपत्रांतून प्रगल्भ चर्चा घडवून समाजाला प्रबुद्ध करण्याची प्रथा होती. १७८४ मध्ये ‘ Berlinische Monatsschrift’ या नियतकालिकानं ‘प्रबोधन म्हणजे काय?’ या विषयावर अशीच सार्वजनिक स्पर्धा आयोजित केली ज्यासाठी इमॅन्युएल कांटने सोप्या भाषेत निबंध लिहिला, जो नंतर प्रबोधनाची स्वयंस्पष्ट व्याख्या (auto- definition) म्हणून मान्यता पावला.
त्या लेखाच्या सुरुवातीलाच कांट नमूद करतो की प्रबोधन म्हणजे मनुष्याचं त्याच्या त्या बाल्यावस्थेतून बाहेर पडणं जी मनुष्यानं स्वत:हून ओढवून घेतली आहे. निसर्गाच्या कचाट्यातून सुटका होऊन किती तरी काळ लोटला पण माणसं मोठ्या प्रमाणात स्वेच्छेनं बाल्यावस्थेत आढळतात. कांटनुसार आळस आणि भ्याडपणा ही मनुष्याच्या परायत्ततेची प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे माणसं स्वतंत्रपणे स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्यास धजावत नाहीत. त्यामुळेच इतरांना त्यांचं नियमन करणं अधिक सोपं जातं. खरंतर मनुष्याच्या या असमर्थतेसाठी मनुष्यच स्वत: दोषी ठरतो. त्यासाठी मनुष्यानं जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण त्याची असमर्थता बुद्धीच्या कमतरतेमुळे नसून संकल्पशक्ती आणि धाडसाच्या अभावामुळे आहे. एरवी त्याच्या गंभीर लिखाणात व्रतस्थ, तटस्थ आणि नेमस्त वाटणारा इमॅन्युएल कांटसुद्धा आक्रमक प्रबोधनकाराच्या भूमिकेत येऊन वाचकाला प्रबोधनपर्वाचं ब्रीदवाक्य प्रदान करतो : ‘ Sapere aude!’ अर्थात स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्याचं धाडस दाखव!
वरवर पाहता कांटचा लेख सोपा वाटत असला तरी हा लेख मानवी स्वातंत्र्याविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. ‘मानवी स्वातंत्र्य शक्य आहे का?’ या प्रश्नाला कांटची ‘थर्ड अॅन्टिनमी’ म्हणून ओळखलं जातं. कांटनं मानवी स्वातंत्र्याच्या बाजूनं कौल दिला; कारण त्याशिवाय प्रबोधनाला अर्थ प्राप्त झाला नसता. प्रबोधन हे हस्तक्षेपी, परिवर्तनवादी तत्त्वज्ञान असल्यानं मानवी स्वातंत्र्याचा स्वीकार ही प्रबोधन विचाराची पूर्वअट ठरते.
कांटच्या ऐतिहासिक लेखानंतर तब्बल दोनशे वर्षांनी- १९८४ मध्ये ‘प्रबोधन म्हणजे काय?’ याच प्रश्नाला उत्तर देताना मिशेल फुको म्हणतो की, प्रबोधनाच्या प्रश्नाचा प्रभाव पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या केंद्रभागी आहे- कारण समर्थक असो वा विरोधक, सगळ्यांना प्रबोधनाच्या ( Enlightenment) प्रश्नाशी दोन हात केल्याशिवाय पुढे सरकता येत नाही. सोबतच फुको नमूद करतो की, प्रबोधनाच्या प्रश्नाची प्रस्तुतता वादातीत असली तरी या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मात्र कुणाला देता आलं नाही. पण या प्रश्नानं कुणाचा पिच्छासुद्धा सोडला नाही. कांटच्या ऐतिहासिक लेखाचा अन्वयार्थ लावताना फुको लिहितो की कांटनं उपस्थित केलेला प्रबोधनाचा प्रश्न फक्त ठरावीक स्थलकालाचा निर्देश किंवा विशिष्ट घटनेचा संकेत किंवा परिपूर्णतेच्या उदयाची चाहूल यांपुरता मर्यादित नाही. कारण कांटची प्रबोधनविषयक व्याख्या प्रामुख्याने अभावात्मक आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर कांटचा लेख ऐतिहासिक माणसाच्या बाल्यावस्थेचं निदान आहे. त्यातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेचा आणि शक्यतेचा निर्देश आहे. बाहेर पडण्यासाठीचं आवाहन आहे. त्यासंदर्भातील जबाबदारीची आठवण करून दिली आहे. त्यामुळे, कांटसाठी प्रबोधन म्हणजे Ausgange, Sortie अर्थात बाहेर पडणं ठरतं. फुको प्रबोधनाच्या संकल्पनेतल्या संदिग्धतेवर बोट ठेवताना म्हणतो की, कांटनं अधोरेखित केलेलं ‘बाहेर पडणं’ ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे की निरंतर प्रक्रिया, अनिवार्य काम आहे की जबाबदारी आहे, याचा विचार करणं प्रबोधनाच्या प्रश्नात अभिप्रेत आहे.
फुको कांटच्या लेखातली आणखी एक संदिग्धता अधोरेखित करतो. कांट ज्या पद्धतीनं मानव आणि मानवता ( Menschheit) या शब्दांचा वापर करतो त्यानुसार निरनिराळे निष्कर्ष काढता येतात. प्रबोधन प्रक्रियेत ‘समग्र मानवते’चा अंतर्भाव होत असेल, तर ते पृथ्वीतलावरच्या सगळ्या माणसांच्या समग्र सामाजिक आणि राजकीय अस्तित्वाला प्रभावित करणारं ऐतिहासिक स्थित्यंतर किंवा प्रक्रिया ठरतं. किंवा प्रबोधन फक्त ‘मनुष्याला वैयक्तिक पातळीवर होणारी जाणीव’ असेल, तर प्रबोधन म्हणजे असं स्थित्यंतर जे मनुष्यातल्या मानवतेला जागं करतं. पुढल्या लेखांकात प्रबोधनपर्वातल्या विचारवंतांची मांडणी करताना, प्रबोधनाच्या विविध पैलूंविषयी सविस्तर चर्चा केली जाईल. त्यासह, प्रबोधनाची आत्मटीका आणि बाहेरून झालेल्या टीकांचा परामर्श घेतला जाईल.