राजेश बोबडे

‘‘केवळ निरोप्यासारखे तत्त्वज्ञान जनतेस कळविणे एवढेच प्रचारकाचे काम नाही. तर ते तत्त्वज्ञान आत्मसात करून आचरणात उतरविले पाहिजे. त्याच्या केवळ बोलण्यातूनच नव्हे, तर संपूर्ण दिनचर्येतून ते सहज व्यक्त झाले पाहिजे. संपर्कात येणाऱ्या जनतेवर गंभीर सात्त्विकतेचा परिणाम होऊन त्यांच्याकडे ती आकर्षित झाली पाहिजे,’’ अशी प्रचारकांची व्याख्या करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘भिन्नभिन्न प्रवृत्तीच्या लोकांमध्ये मिसळून, त्यांच्या रुचीप्रमाणे हसून-खेळूनही प्रचारकाने आपल्या वृत्तीची स्थिरता राखली पाहिजे. तो वृत्तीचा गुलाम न राहता स्वामी झाला पाहिजे. तरच तो खरा प्रचारक म्हणविण्यास योग्य समजावा.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : लांगूलचालन करणारा शिक्षक घातक

‘‘समाजात केवळ मनाच्या व बुद्धीच्या एकाच पातळीचे लोक नसून भिन्नभिन्न थरांतील लोक असतात. त्यांच्या भिन्न अभिरुची असतात. इतकेच नाही तर त्यातच ते तल्लीन होऊन, हेच आमचे सर्वस्व या दृष्टीने त्याकडे पाहात असतात. जर प्रचारक अशा जनतेसमोर केवळ तत्त्वज्ञान आणि तेही आपल्या मस्तीत धुंद होऊन सांगतील तर त्याचा परिणाम कसा व्हावा? आज किती तरी भाविक एखाद्या ठिकाणी आश्रम बांधून बसतात. त्या आश्रमात त्यांच्याच दोन-चार मंडळीखेरीज कोणी राहात नाही वा येतही नाही. कारण जनतेला त्यांची किंमत अथवा गोडी वाटत नाही. त्यांना जनतेच्या आवडीनिवडी व वर्तन याबद्दल आत्मीयता वाटत नाही. ते आपल्याच गांभीर्यात मग्न असतात. लोकांच्या वृत्ती ओळखून, त्यांच्याशी आत्मीयतेने समरस होऊन, त्यांच्याच भाषेत नि बोलीत प्रचारकास आपल्या कार्याचे महत्त्व पटवून देता आले पाहिजे. आपल्याच पांडित्याचे किंवा कर्तृत्वाचे गुणगान करून प्रचारक कधीच खरा प्रचार करू शकत नाही. लोकांच्या वृत्तीचा त्याच्या वृत्तीवर अथवा त्यांच्या विचारांचा त्याच्या विचारावर मुळीही परिणाम होऊ नये इतका तो ध्येयाशी व कार्यपद्धतीशी एकरूप असावा. अशाच मनुष्याला  प्रचारक म्हणता येईल.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा: सेवा मंडळाचा आदर्श जगात दिसावा

‘‘असे प्रचारक फक्त स्थितप्रज्ञ पुरुषच होऊ शकतील. प्रचारकांची खाण नाही की जीमधून जितके हवे तितके प्रचारक काढता येतील! शंकराचार्यानी संन्यासाश्रमाची लाट निर्माण करण्यासाठी धडाडीचे प्रयत्न केले! हजारो मुलांना दीक्षा देऊन प्रचारासाठी धाडले. पण त्यातून शंकराचार्यासारखे किती प्रचारक तयार झाले? तुलसीदासांनी वैराग्यांचे दल निर्माण करून त्या वेळेस राष्ट्राची परिस्थिती सावरून धरली. पण त्या दलातून सच्चे प्रचारक किती निर्माण झाले? गौतम बुद्धांनी बौद्ध हजारो भिक्षु- भिक्षुणी तयार केल्या पण त्यातून बुद्धांच्या तोडीचा एक तरी प्रचारक निघाला का? असे होण्याचे कारण हेच आहे की, मनुष्य कोणाच्या बनवण्याने अथवा तयार करण्यानेच तयार होत नसून प्रत्येकाच्या बुद्धीचा व संस्काराचाही त्यावर परिणाम होत असतो. अर्थात हे जरी खरे असले तरी आपल्यासमोरील आदर्श मात्र उच्च असावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com