श्रावणातली सकाळ. नुकतेच ढग बरसून गेले आहेत. चमकणाऱ्या उन्हात कोलकत्त्यातलं आकाश तेजाळून निघालं आहे. सकाळची वर्दळ. सडकेवरून घोडागाड्या सारख्या धावत आहेत. फेरीवाल्यांचे थांबून थांबून आवाज येत आहेत. ज्यांना आवरून सरकारी कार्यालयात, शाळा- महाविद्यालयात, कोर्टात जायचंय त्यांच्यासाठी घराघरांत मासे, भात रटरटतोय. स्वयंपाकघरातल्या चुलींचा धूर निघतोय. स्वत:च्याच कामात गढलेलं हे एवढं मोठं पाषाणहृदयी शहर पण अशा या शहरातल्या असंख्य सडका आणि गल्ल्यांमध्ये जणू सोनेरी किरणं अपूर्व अशा उत्साहात आवेगानं सळसळत आहेत… रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गोरा’ या कादंबरीची सुरुवात अशी मनोहर होते. कादंबरीतून प्रकट होणारं सत्य मात्र या सोनेरी वातावरणासारखं लोभस आणि मोहक नाही. समजा ज्या गोष्टीचा तुम्हाला विलक्षण अभिमान आहे किंबहुना गर्वच आहे, ती गोष्ट तुमची नाहीच असं कळल्यानंतर जो काही साक्षात्कार होतो तो ‘गोरा’ या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे… पण हे सत्य उलगडतं ते कादंबरीच्या शेवटी.

गौरमोहन या नावाचा नायक ज्याचं नाव ‘गोरा’ असं आहे. त्याला त्याच्या धर्माचा कट्टर अभिमान. केवळ ‘गर्व से कहो…’ एवढ्यापुरता तो मर्यादित नाही. ‘गर्वच नाही तर माज आहे मी अमुकतमुक असल्याचा…’ इतपत कडवेपणा ‘गोरा’मध्ये ठासून भरलेला आहे. कादंबरीचं लेखन १९०७ ते १९१० या काळात झालं पण ती वर्णन करते त्याहीआधीच्या काळाचं-एकोणिसाव्या शतकातल्या सातव्या, आठव्या दशकाचं. ‘गोरा’चा जन्म होतो १८५७ च्या उठावाच्या धामधुमीत. तो युवा अवस्थेत असतानाचा कादंबरीचा भाग व्यापलेला आहे. रवींद्रनाथांच्या भाषेला एक डौल आहे. कादंबरीत ललिता, सुचरितासारख्या नायिका आहेत. त्या भाबड्या नाहीत तर बुद्धिमान, मनस्वी अशा… विसाव्या शतकातली श्रेष्ठ बंगाली कादंबरी म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या जाडजूड अशा ‘गोरा’चा हिंदीत कवी अज्ञेय यांनी केलेला अनुवाद अप्रतिम आहे.

बांगला साहित्यावर रवींद्रनाथांच्या लेखनाचा मोठाच प्रभाव आहे. कादंबरी, कथा, कविता, नाटक इतकंच काय रवींद्रसंगीत अशा सर्व माध्यमांतून हा प्रभाव राहिला. तरीही ‘रवींद्रनाथ विरोध’ हा प्रवाहसुद्धा बंगालीत उदयाला आला. रवींद्रनाथांनी सर्वहारा वर्गाबद्दल फारसं लिहिलं नाही हा या प्रवाहाचा प्रमुख आक्षेप होता. या प्रवाहाशिवायही लेखन करणारे कादंबरीकार बंगालीत होतेच. रवींद्रनाथांच्याच काळात शरदचंद्र हे लोकप्रिय कादंबरीकार होते. पुढच्या टप्प्यावर बिभूतीभूषण, ताराशंकर, माणिक हे तिन्ही लेखक ‘थ्री ग्रेट बॅनर्जी’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यापैकी ताराशंकर यांची ‘कवी’ ही कादंबरी रवींद्रनाथांच्या मृत्यूच्या वर्षी प्रसिद्ध झाली. रवींद्रनाथांच्या कादंबऱ्यांपैकी सर्वात लक्षवेधी कादंबरी आहे ती ‘गोरा’.

‘गोरा’ राष्ट्रवादानं झपाटलेला आहे. त्याच्या मताचं खंडन करण्यासाठी कादंबरीत पात्रांची योजना आहेच. विशेषत: ब्राह्मो समाजाचं तत्त्वज्ञान आणि ‘गोरा’ यांचा बौद्धिक संघर्ष कादंबरीत पाहायला मिळतो. कादंबरीच्या शेवटी गोराच्या धर्माभिमानाच्या फुग्याला टाचणी लागते. असा रहस्यभेद होतो की ‘गोरा’ हा जन्मत: हिंदू नाहीच. तसं अत्यंत आकर्षक असं त्याचं व्यक्तिमत्त्व भुरळ पाडणारं आहे. कादंबरीत गोरा आणि सुचरिता यांची प्रेमकथा आहे. तसेच बिनॉय आणि ललिता यांच्याही प्रेमकथेचा आणखी एक पदर या कादंबरीला आहे. मुख्य म्हणजे कादंबरीत वादविवादाच्या अनेक जागा आहेत. कादंबरीतली पात्रं हे वैचारिक युद्ध सतत चालू ठेवत असतात. घराच्या कोपऱ्यात, दिवाणखान्यात, व्हरांड्यात कुठेही या चर्चा झडत राहतात. बौद्धिक चर्चेसाठी ही पात्रं कधीही तयार असतात. ती सुखवस्तू आहेत. त्यातल्या कोणालाही उदरनिर्वाहासाठी कराव्या लागणाऱ्या यातायातीचा अथवा दैनंदिन जीवनसंघर्षाचा सामना करावा लागत नाही, याचंही आश्चर्यच वाटतं.

ज्या कुटुंबात ‘गोरा’ वाढला आहे, त्या कुटुंबाच्या जातीचा, धर्माचा त्याला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळेच, तुमच्याकडे इसाई महिला स्वयंपाक बनवते म्हणून मी तुमच्या घरचं अन्न खाऊ शकत नाही असं तो त्याच्याच एका मित्रालाही म्हणतो. धर्म ही काय तुम्हाला इतकी सोपी गोष्ट वाटली का असं तो बजावत राहतो. ‘एवढे धर्माभिमानी पाहिले पण तुझ्यासारखा कट्टर धर्माभिमानी पाहिला नाही, तू तर काशीच्या ब्राह्मणांपेक्षाही पुढचा निघालास.’ असं त्याला त्याचे समकालीन मित्र ऐकवत असतात.

जे त्याचे वडील आहेत (असं त्याला वाटतं) ते शेवटच्या घटका मोजत असतात. ‘मी तुला आजवर एक गोष्ट सांगितली नाही. ती सांगण्याची आता वेळ आली आहे…’ असं म्हणत ते गोराला ‘तू माझं श्राद्ध घालू शकत नाहीस,’ असं सांगतात. तो आश्चर्यचकित होतो. ‘तुला हे श्राद्धकर्म करण्याचा अधिकार पोहोचत नाही. जन्माने तू आयरिश आहेस. १८५७ च्या धामधुमीत तुझी आई या घरात आश्रयाला आली होती. तुझे वडील त्याच वेळी युद्धात मारले गेले. तुला जन्म देऊन तुझ्या जन्मदात्या आईनंसुद्धा शेवटचा श्वास घेतला. तेव्हापासून तुझं पालनपोषण आमच्या घरी झालं.’ ज्यांना आयुष्यभर वडील मानलं त्यांच्या तोंडून हे सगळं ऐकताना ‘गोरा’ एक वेगळाच साक्षात्कार अनुभवत असतो. जिला आई मानलं ती बाजूलाच सचिंत चेहऱ्याने उभी असते. हे ऐकल्यानंतर गोरा भोवंडून जात नाही किंवा उन्मळूनही पडत नाही. उलट एका दडपणापासून मुक्त झाल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर असते. तो ताडकन घराबाहेर पडतो.

ब्राह्मो समाजाच्या परेशबाबू यांच्याकडे तो जातो. जिथे त्यानं हिंदू धर्माविषयी अत्यंत अभिनिवेशाने चर्चा केलेल्या असतात; परेशबाबू यांच्या सुचरिता या कन्येला त्याने भारावून टाकलेलं असतं; त्यांच्यासमोर येऊन ‘गोरा’ उभा राहतो. बोलू लागतो, ‘मी हिंदू नाही. आता मी कोणत्याच जाती-धर्माचा नाही. पावला- पावलावर मला आता माझ्या कथित शुचिर्भूततेचं रक्षण करण्याची गरज उरलेली नाही. आज माझ्या मनात कोणत्याच हिंदू, मुस्लीम, ईसाई यांच्याविषयी आकस उरलेला नाही. आता मी सगळ्यांचा झालोय. सगळ्यांची जात, ती माझी जात. सगळ्यांचं अन्न, तेच माझं अन्न. बंगालमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मी फिरलोय. अनेक शूद्रांच्या घरी गेलो तेव्हा एक अदृश्य असा अडथळा घेऊनच वावरलो. पण आजवर जे मी साध्य करू शकलो नाही ते आता साध्य करू पाहतोय. आता सगळ्या भारताचं सुखदु:ख ते माझं सुखदु:ख आहे. कोणतीही अपवित्रतेची भावना आता माझ्या मनाला शिवणार नाही. जणू मला खऱ्या अर्थानं मुक्ती मिळाली आहे.’ या पुढच्या आयुष्याच्या प्रवासात तो सुचरिताकडे सहचारिणी होण्याची अपेक्षा व्यक्त करतो.

या दीर्घ संवादानंतर परेशबाबू गोराला समजून सांगतात, ‘जेव्हा सत्याचा साक्षात्कार होतो तेव्हा ते सत्य अनेक अभाव आणि अपूर्णतेसह पूर्णत्वाचा अनुभव देतं. त्याच्या दर्शनानं आपण कृतज्ञ होतो. अशा वेळी कोणत्याही बनावट गोष्टींनी आयुष्य सजवण्याची इच्छा उरत नाही.’

‘गोरा’च्या लिखाणाला प्रारंभ झाला तेव्हा रवींद्रनाथांच्या पत्नीचं निधन झालं होतं. कादंबरीचं लेखन चालू होतं तेव्हा धाकट्या मुलाचा कॉलऱ्यामुळे मृत्यू झाला होता. हे आघात घडत असतानाही अविचल राहून रवींद्रनाथांनी ही कादंबरी पूर्ण केली. ‘गोरा’ लिहिताना त्यांच्यात एक अदम्य जीवनलालसा होती असाही संदर्भ या कादंबरीबद्दल दिला जातो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की वंशाबद्दलचा रहस्यभेद जेव्हा होतो आणि आपण हिंदू नाही हे गोराला कळतं त्या क्षणापासूनचा त्याचा नव्या वाटेवरचा प्रवास सुरू होतो. इथं ही कादंबरी संपते. रवींद्रनाथांच्याच एका कवितेचा आधार घेऊन गोराची ही उदार, सहिष्णु आणि उन्मुक्त मन:स्थिती चितारता येऊ शकेल.

जिथं मनाला भीती शिवत नाही

आणि मस्तक उन्नत आहे

जिथं ज्ञान आहे मुक्त,

समाज दुभंगलेला नाही

संकुचितपणाच्या भिंतींनी ;

जिथं शब्द बाहेर पडतात,

सत्याच्या खोल दरीतून उत्स्फूर्त आवेगानं,

जिथं पूर्णत्व मिळवण्यासाठी अखंड

निर्मितीशीलता आपले बाहू फैलावत आहे;

जिथं रूढीचं वाळवंट, विचारांचा निर्मळ प्रवाह

गढूळ करून टाकत नाही ;

जिथं होतात समृद्ध विचार

आणि आचार तुझ्या प्रेरणेनं…

अशा या स्वातंत्र्याच्या स्वर्लोकात-

हे तात, माझा देश जागृत होऊ दे!