‘हायड्रोजन बॉम्ब की पेटिया कहाँ है। जल्दी लाओ’ असा निरोप राहुल गांधींकडून मिळताच संशोधन विभागात धावपळ उडाली. घाईघाईने दोन संदुकांत ‘स्फोटक’ सामग्री भरून त्या त्यांच्या निवासस्थानी पोहचवण्यात आल्या. सोबतीला दोन वैज्ञानिक (मतचोरी शोधणारे?) होतेच. देशभरात हाहाकार उडवून देणारा ऐवज हाती आला म्हणून राहुलजी भलतेच खुशीत होते. मग सोबतच्या ‘त्या’ दोघांनी संदूक उघडून बॉम्बसदृश वस्तू बाहेर काढली. त्याच्या शेपटीकडचा भाग उघडल्यावर त्यातून पुंगळ्या केलेले एकेक कागद बाहेर काढण्यास सुरुवात झाली. हा गोरखपूर मतदारसंघातील चोरीचा दस्तऐवज, हा छपरा, हा अहमदाबाद, हा पाटणा. असे एकेक कागद व त्यात नमूद असलेली माहिती वाचून राहुलजींना आनंदाने दंडबैठका माराव्यात अशी तीव्र उबळ आली पण त्यांनी स्वत:ला रोखले. सर्वांत शेवटी वाराणसीचा कागद बाहेर काढला गेला. त्याला ‘हायड्रोजन बॉम्ब’मध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘हिलीयम’चा वास येतोय असा भास राहुलजींना झाला. सर्वांवर शेवटची नजर फिरवून झाल्यावर पुन्हा ते कागद आत टाकण्यात आले. संदूक घेऊनच आपण पत्रपरिषदेला जाऊ असे सांगून ते शयनकक्षात निघाले.

बिहारचा थकवा असल्याने त्यांना क्षणात झोप लागली. मग त्यांच्या डोळ्यांसमोर अपेक्षिलेली दृश्ये तरळू लागली. ‘मतचोरीरूपी हायड्रोजन बॉम्बचा स्फोट झाल्यावर देशभर धुमाकूळ माजला आहे. बॉम्बची क्षमता दहा लाख टन टीएनटी असल्याने देशभरातील भाजपची कार्यालये उद्ध्वस्त झाली आहेत. रेशीमबागेला ‘खंडहर’चे स्वरूप आले आहे. सर्वत्र धूरच धूर असल्याने भाजपचे लोक सैरावैरा पळत आहेत. आपण सभेत म्हटल्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. विश्वगुरूंनी हिमालयाकडे प्रस्थान केल्याचे लोक ओरडून ओरडून सांगत आहेत. चेहरे काळवंडल्याने नेता कोण व कार्यकर्ता कोण हे ओळखणे कठीण झाले आहे. एरवी तुटून पडणाऱ्या भक्तांची बोटे बॉम्बमधील रसायनाने लुळी पडली आहेत. बॉम्बला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने तातडीने पत्रपरिषद बोलावली पण विषारी धुरामुळे कुणाला बोलताच येत नसल्याने ती रद्द करावी लागली आहे. प्रत्येक ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी पळून गेले आहेत. निवडणूक आयोगातील तीनही आयुक्तांनी राजीनामा दिला असून ते राहुलजींची माफी मागायला निघाले आहेत. विविध वाहिन्यांवरचे भक्त अँकर पळून गेले असून त्याचा ताबा पुरोगामींनी घेतला आहे. जगभरात या मतचोरीच्या बॉम्बची चर्चा सुरू झाली असून अनेक देशांतील विरोधकांनी राहुलजींशी संपर्क साधणे सुरू केले आहे. ट्रम्प यांनी फोन करून लोकशाही वाचवल्याबद्दल राहुल यांचे अभिनंदन केले आहे.’ नेमकी याच क्षणी त्यांना जाग आली.

दुपारी पडले असले म्हणून काय झाले, आता हे स्वप्न साकार होण्याची वेळ आली आहेच असे म्हणत ते संदूक घेऊन पत्रपरिषदेसाठी रवाना झाले. प्रचंड गर्दीत ती पार पडल्यावर प्रश्नोत्तरे झाली. राहुलजींच्या सादरीकरणाने सारेच प्रभावित झालेले दिसले. घरी परतल्यावर ते टीव्हीसमोर बसले. मात्र कुठेही बातमीच नाही. काही पोर्टलवर ती दिसली पण क्षणकाळासाठीच. कुठे धुरळा नाही की काही नाही. भाजपच्या गोटातही शांतता. यामुळे ते भलतेच उदास झाले. काय करावे हेच त्यांना समजेना. तेवढ्यात पक्षाचे अध्यक्ष खरगेजी आले. पाठीवर हात ठेवून म्हणाले ‘चलो बेटा, ये बॉम्ब फोडणे का काम अपना नही, अभी पार्टी का संघटन मजबूत करते है!’