‘सं. ‘भाऊ’बंधन!’ हा अग्रलेख वाचला. अस्मितांना डिवचण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला तेव्हा तेव्हा सत्तेतील प्रत्येकाला त्याचे मोल चुकवावे लागले आहे. आज महाराष्ट्र धर्म कुठे तरी मागे पडत चालला आहे. अशा वेळी महाराष्ट्र धर्म, मराठी भाषा, मराठी अस्मिता यांच्याभोवती ज्यांचे राजकारण फिरत असते ते त्याच अस्मितांसाठी एकत्र आल्यास, मराठी मनाला आपलेसे करू शकतात. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर महाराष्ट्राचा विचार करणारा कोणताच पक्ष नसल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांची धरसोड वृत्ती आणि उद्धव ठाकरे यांचे स्वकीयांनीच केलेले खच्चीकरण या पार्श्वभूमीवर दोन भावांनी एकत्र येणे ही महाराष्ट्रासाठी उभारी देणारी घटना आहे. नंतरचा राजकीय सारिपाटाचा खेळ कसा रंगेल ते कोणीही सांगू शकत नाही; परंतु आज महाराष्ट्राचा विचार करणारे, महाराष्ट्रातील अस्मितांसाठी रान उठवणारे कोणी तरी आहे, हीच भावना आहे.
● अविनाश सोनटक्के, छत्रपती संभाजीनगर
गळचेपी टाळण्यासाठी ‘भाऊ’बंधन हवेच!
‘सं. ‘भाऊ’बंधन!’ हा अग्रलेख (७ जुलै) वाचला. उद्धव व राज ठाकरे एकत्र येणे ही त्या दोघांसोबत महाराष्ट्र व मराठी जनांसाठी अपरिहार्यता होती. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील मराठी माणसाची इतकी गळचेपी झाली आहे की त्यासाठी मराठी माणसाच्या हिताच्या मुद्द्यावर या दोन भावांनी एकत्र येण्याची गरज होतीच. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला आहे व दिल्लीश्वरांच्या चरणी आपली निष्ठा अर्पण केली आहे. मुंबईतील महत्त्वाची कार्यालये, उद्याोगधंदे व आस्थापना गुजरातमध्ये जाणीवपूर्वक स्थलांतरित केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील कंपन्यांचा सीएसआर निधी अन्य राज्यांत वळविला जात आहे. महाराष्ट्राच्या वाट्याच्या हक्काच्या ५० टक्के जीएसटीकरिता राज्य सरकारला झगडावे लागत आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला पुरेशा रेल्वे गाड्या येत नाहीत. प्रत्येक अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. प्रशासनात बसलेले काही अमराठी अधिकारी मुजोरी करत आहेत. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईत राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना विस्थापित केले जात आहे. मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या हक्काचे सरकारी भूखंड खासगी विकासकांच्या व भांडवलदारांच्या घशात घातले जात आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी हे ‘भाऊ’बंधन अबाधित राहणे महत्त्वाचे आहे.
● टिळक उमाजी खाडे, नागोठणे (रायगड)
ठाकरे बंधूंवर अपेक्षापूर्तीची जबाबदारी
‘सं. ‘भाऊ’बंधन!’ हे संपादकीय वाचले. दोन्ही ठाकरेंचा संयुक्त मेळावा एका संभाव्य राजकीय भूकंपाचा सूचक इशारा होता. भाजपसाठी ‘एक राष्ट्र, एक नेता’चा जो अजेंडा आहे त्यात प्रादेशिक बळकटी असलेल्या नेत्यांची नड कायम असते, मग ते उद्धव ठाकरे असोत की शरद पवार. ठाकरे बंधू एकत्र येऊन भाजपच्या अजेयतेच्या मिथकाला सुरुंग लावू शकतात.
भाजपचा संधिसाधूपणा, विरोधकांच्या छळासाठी केंद्रीय संस्थांचा वापर आणि नैतिकतेचा मुखवटा या सर्वांना तोंड देण्यासाठी ही राजकीय युती जेवढी गरजेची आहे तेवढीच प्रादेशिक पक्षांसाठी बळकटीकरणाची सुवर्णसंधीसुद्धा आहे. हे ‘संगीत भाऊबंधन’ केवळ ‘भावनिक ड्रामा’ न राहता ते प्रत्यक्ष कृतीत उतरले पाहिजे. हे बंधू एकत्र आल्यास भाजप आणि शिंदे गटापुढे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ शकतो. ठाकरे बंधूंनी या संधीचे सोने करायचे की पुन्हा एकदा राजकीय कटुतेत अडकायचे हे त्यांच्या पुढील वाटचालीवर अवलंबून आहे. मराठी माणूस मात्र या एकजुटीविषयी अपेक्षा बाळगून आहे आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आता ठाकरे बंधूंवर आहे.
● परेश बंग, मूर्तिजापूर (अकोला)
परप्रांतीयविरोधी भूमिकेचा फटका?
‘सं. ‘भाऊ’बंधन!’ हा अग्रलेख (७ जुलै) वाचला. उद्धव आणि राज ठाकरे यांचे हे ऐक्य भविष्यातही मजबूत राहावे अशी अपेक्षा. या ऐक्याचा निवडणुकीत किती लाभ होईल, हा मात्र अभ्यासाचा विषय आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाने परप्रांतीयांविरोधात केलेली आंदोलने महापालिका निवडणुकीतील यशप्राप्तीच्या मार्गातील मोठा अडथळा ठरू शकतात. यातून हे दोघे बंधू कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांची नव्या घडामोडींबाबत काय भूमिका असेल हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
● श्रीकांत जाधव, अतीत (सातारा)
मराठीसाठी की सत्तेसाठी?
‘सं. ‘भाऊ’बंधन!’ हे संपादकीय वाचले. हे दोन भाऊ आपले संपलेले राजकारण सावरण्यासाठी एकत्र आले आहोत हे मान्यच करत नाहीत. मराठीच्या मुद्द्याआडून ते चाचपणी करून बघत आहेत. त्यांनी तशी स्पष्ट भूमिका घेतली तर कदाचित आताच्या पेक्षा जास्त पाठिंबा मिळू शकेल, पण त्याचबरोबर एकत्र राहण्याचे बंधन आणि जबाबदारीही स्वीकारावी लागेल, पण त्यासाठी राज ठाकरे अद्याप तयार नाहीत, असेच त्यांच्या भाषणावरून लक्षात येते. उलटपक्षी उद्धव ठाकरे युतीसाठी घायकुतीला आल्याचे दिसते. हे दोघे मराठीसाठी एकत्र आलेले नाहीत, हे मराठी माणसाला चांगलेच समजले आहे.
● उमेश मुंडले, वसई
महाराष्ट्रहितासाठी असेल तर स्वागतच!
‘सं. ‘भाऊ’बंधन!’ हा अग्रलेख (७ जुलै) वाचला. राज्य सरकारच्या सर्वच शिक्षणविषयक धोरणांचा बोजवारा उडाल्याचे अनेक दाखले अलीकडे वारंवार मिळू लागले आहेत. शिक्षणात केवळ केंद्राचे अनुकरण केल्यामुळे काहीही फायदा होणार नाही. ठाकरे बंधू आणि अन्य पक्ष मराठी हितासाठी एकत्र आले आहेत की राजकीय सोयीसाठी, याचे उत्तर एवढ्यात मिळणार नाही, ते येणारा काळच ठरवेल! मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी जे पक्ष राजकारणी धोरणे राबवतील त्यांचे स्वागतच आहे. संगीत भाऊबंधनाचा आनंद घेऊन, आशावादी पण सावध राहणे गरजेचे आहे.
● संदेश चव्हाण, दहिसर (मुंबई)
अध्यक्ष स्वतंत्र विचारांचे असणे गरजेचे!
‘संघाला भाजपकडून काय हवे?’ हा ‘लाल किल्ला’ सदरातील महेश सरलष्कर यांचा लेख (७ जुलै) वाचला. भाजपमध्ये पक्ष संघटना आणि सत्ता यांचे अवाजवी केंद्रीकरण झाले आहे. संघाला विकेंद्रीकरण अपेक्षित असावे. याचे कारण संघाच्या पाठिंब्याशिवाय सत्ता राखणे भाजपला शक्य नाही हे दिसून येते. तसेच संघाची तत्त्वनिष्ठता, साधनशुचिता यापासून भाजपने फारकत घेतली आहे, याचे कारण भाजपतील ४० टक्के लोकप्रतिनिधी काँग्रेससह अन्य पक्षांतून आयात केलेले आहेत. ही बाब निष्ठावंतांना खटकणारी आहे. अन्य पक्षांची राज्यांतील सरकारे फोडण्याचे भाजपचे राजकारणदेखील लोकशाही परंपरेला छेद देणारे आहे. भाजप संघापेक्षा वरचढ होणे टाळण्यासाठी नड्डा यांच्या पश्चात भाजपचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष संघ परंपरेतील स्वतंत्रपणे काम करणारी कर्तव्यकठोर व्यक्ती असणे गरजेचे आहे. ते निव्वळ सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले ठरता कामा नये.
● डॉ. वि. हे. इनामदार, पुणे
तरीही आपण शांत का?
‘चीनला आता तरी जाब विचारणार?’ हा ‘अन्वयार्थ’ (७ जुलै) वाचला. पंतप्रधान साऱ्या जगात दौरे करत आहेत, प्रतिष्ठेचे सन्मानही प्राप्त करत आहेत, मात्र लगतच्या देशाशी योग्य संबंध स्थापन करण्यात त्यांना अपयश येत आहे. मग तो बांगलादेश असो, मालदीव वा नेपाळ. हे देश सतत भारताला डिवचत आहेत. नेपाळने भारतीय प्रदेश आपल्या क्षेत्रात दाखवून, बांगलादेशने हिंदूंवर अत्याचार करून, मालदीवने भारतीय सैन्याला परत पाठवून भारताच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे, चीन तर नेहमी आपल्यावर वरचढ ठरत आहे, मग ते संरक्षण क्षेत्र असो की व्यापार. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला तीन देशाविरुद्ध लढावे लागले, तरीही आपण त्यावर शांतच राहिलो. भारताला ना कोणी उघडपणे मदत केली ना पाठिंबा दर्शवला. सरकाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत जाब विचारणे गरजेचे आहे. नाही तर ५६ इंचांची छाती काय कामाची?
● संतोष खाडे, गेवराई (बीड)