राजकारणातील विकृतीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये दिलेला संकेत आजही कसा प्रासंगिक आहे हेच वरील विवेचनावरून दिसून येते. महाराज म्हणतात, ‘‘निवडणूक लढणे काही वावगे नाही. तो या देशाचा बाणाच आहे. पण त्यात बेइमानी शिरू नये. आपल्या कर्तबगारीच्या व समाजसेवेच्या जोरावर माणसे निवडून जावीत. देशाच्या प्रगतीचा विचार सर्वानी करावा. यातच मी गणराज्याचे कल्याण समजतो. माझा पक्ष की तुमचा पक्ष? पार्टीच्या विजयासाठीच देशाचा घात! हे विलक्षणच, पण हे असे का असावे? हे मला कळत नाही. प्रत्येक बाबतीत प्रत्येकाने लक्ष घालावे. त्यात सत्य असेल त्यावर जोर द्यावा. वाईट असेल त्याचा तिरस्कार करावा, हे उचितच आहे. पण पक्षाच्या आणि जातीच्या मतलबासाठी सत्याचा बळी देण्याची वृत्ती बरोबर नाही. म्हणूनच जगाने ओरडून सांगितले, तरीही प्रत्येकाने आपापल्या परीने त्याला माणुसकी का शिकवू नये?’’
‘‘आत्मोन्नतीचे, राष्ट्रोन्नतीचे स्वरूप अवश्य द्यावे. आपले जे जे चांगले असेल ते सर्व जगाला आवडेलच असे समजू नये. कोण कसे राज्य चालवेल हे ग्रामपंचायतीतून, न्यायपंचायतीतून दिसू द्या. पंचायत समितीचा,तालुक्याचा कारभार उत्तम करून दाखवा. जिल्हा परिषद तर सुंदर करून दाखवा की, एकदम राष्ट्रपती होण्याचीच हाव धरता व मग एक ना धड भाराभर चिंध्याच करून टाकता. हे तुम्हाला आता कुणी म्हणावे, म्हणून आम्ही स्वस्थ बसून प्रेमाने सांगण्याचे कार्य हाती घेतले. माणसाने सर्व काही करावे पण त्याचे अधिष्ठान सत्य, शुद्ध, निष्पाप असावे. लोभ देशाचा असावा. धर्माचा असावा. आपले घर भरणाऱ्याला व्यक्तीसाठी शक्ती पाहिजे म्हणणाऱ्याला सर्वानी मिळून जाहीर धडा शिकवावा. अथवा त्याचा तिरस्कार तरी करावा. तरच देश सुधारू शकतो. नाहीतर सज्जनपणालाही पक्ष व चोऱ्या करणाऱ्यालाही पक्ष! ही पक्षांधता रावणापासून आजवर या देशाला भोवली आहे. महाराज ग्रामगीतेमध्ये लिहितात..
निवडणुकीची चालु प्रथा।
हीच मुळी सदोष पहाता।
म्हणोनि योग्य दृष्टि द्यावी समस्ता।
गाववासिया।
मत हे दुधारी तलवार।
उपयोग न केला बरोबर।
तरि आपलाचि उलटतो वार।
आपणावर शेवटी।
मतदान नव्हे करमणूक।
निवडणूक नव्हे बाजार-चुणूक।
निवडणूक ही संधी अचूक।
भवितव्याची।।
राजेश बोबडे