राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भगव्या कपडय़ांऐवजी नेहमी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करत, त्याबद्दल एकाने त्यांना प्रश्न केला की ‘आपण इतर साधूंप्रमाणे का वागत नाही?’ त्याला उत्तर देताना महाराज म्हणतात : बुवाचा गणवेश (सरकारमान्य व धर्ममान्य) ठरला नसल्यामुळे त्याच्या स्वभावाला जे सरळ, सात्त्विक व कमीत कमी खर्चाचे दिसते तसे त्याने वागावे. साधारणपणे वागणाऱ्या माणसापेक्षा निश्चित पद्धतीनेच बुवाने राहावे म्हणजेच तो जनतेला मान्य होतो असे मला वाटत नाही. ही गोष्ट मात्र खरी की, त्यात भोगलालसा वा वैभवसंपन्नता असू नये. अवास्तव पैशांचा चुराडा करून लोकांना श्रीमंती व संपन्नता दिसेल असे मुळीच नसावे. बुवाने सरळ सात्त्विक व स्वावलंबी बाण्याने वागावे असे माझे मत आहे. विदेही लोकांच्याकरिता हे उत्तर नाही. कारण त्यांना समाजधारणेची मुळीच आवश्यकता नसते. त्यांच्या इंद्रियांवर तसेच संस्कार भिनलेले असतात. पण जनतेने तसेच राहावे असे मात्र कोणी समजू नये! समाजरचना ही एक स्वतंत्र रचना आहे व या रचनेला मनुष्यपणा, देवभक्ती व देशभक्ती साधायची आहे. या रचनेतून जे तोल सुटून कोणत्याही एका पातळीला जातात ते सृष्टीच्या नियमाला बाधा आणणारे आहेत. कारण विदेहित्वाचा बाणा घेऊन त्यांना नग्न राहणे शक्य नाही व तसा राहण्याचा अभ्यास नसतो. तसेच भोगी प्रवृत्ती धरून विषयांध प्रवृत्तीच्या वेशातही राहणे न्यायाला धरून नाही व म्हणून साधारण जनतेचा जसा वेश असतो तसाच वेश बुवाचा असावा असे माझ्या मनाने घेतले आहे. म्हणून मी या धारणेवर माझा बहिरंग पोशाख ठेवला आहे. त्याला कोणताही रंग न देता व अशुद्ध न ठेवता सात्त्विकतेने सर्वानी वागावे असे मला वाटते. लोक या वेशामुळे मला बुवा समजणार नाहीत म्हणून आपण वेश बदलावा असे मला कधीही वाटू नये, एवढेच मला गुरुदेवांना मागावयाचे आहे.

खऱ्या साधुत्वाची ओळख महाराज आपल्या लोकप्रिय भजनात सांगताना म्हणतात-

अंगि नाही ज्ञान, म्हणे साधु मला मान।

साधु नावानं साधु होत  नाहि  हो।

साधु हॉटेलचा चहा-पाणी नाही हो।।

सत्याचरणाविण साधुत्व नाही।

आत्म-ज्ञानाविण साधुत्व नाही ।

प्रभू-भजनाविण साधुत्व नाही ।

तुकडय़ादास म्हणे, ऐका ही ग्वाही।।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com