राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘मनुष्याच्या जगण्याच्याही श्रेणी आहेत. काही लोक इतरांचे शोषण करून जगतात तर काही स्वत:च्या भरवशावर जगून इतरांनाही जगवितात. काही स्वत: जगण्यासाठी इतर अनेकांना दु:खी करतात तर काही इतरांना सुखाने जगू देण्यासाठी आपल्या जिवाचे रान करतात; बलिदान करतात. कोणी सैतान होऊन जगतात तर कोणी भगवान होऊन जगतात. जगाच्या कल्याणासाठी जगणारे आणि मरणारे यांनाच देवमाणसे म्हणायचे! अशांचे जगणे हे जगाला वरदान ठरते! असे जगणे हेच मूर्तिमंत भजन म्हटले पाहिजे! ज्यांना आपण अवतार म्हणतो, अशा पुरुषांचे जीवन हे असेच नसते का? पण जगायचे कशासाठी, या प्रश्नाचे योग्य उत्तर ज्यांनी शोधले तेच असे कार्य करू शकतात. नाहीतर ‘आहार निद्रा भय मैथुनंच’ या पशुलक्षणापलीकडे माणसाची मजल जात नाही.’’
‘‘चैन आणि विलास म्हणजेच खरे जगणे, असे मानणारेच आज जास्त दिसतात. मिष्टान्न खाणे किंवा मांसाहार करून येथेच्छ दारू पिणे किंवा भारी भारी वस्त्राभूषणे घालून नाटक-सिनेमाला जाणे यालाच खरे जगणे म्हणायचे काय? ‘आधी प्रपंच करावा नेटका’ याचा हा अर्थ आहे का? आपल्या स्वैराचारी वृत्तीला आळा घालण्याऐवजी तिच्या पूर्तीकरिता ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’ अशी िहमत बाळगणे योग्य आहे काय? ते जर योग्य मानले तर, मग एवढय़ानेच भागणार नाही. काळाबाजार, लाचलुचपत, चोरी-लूट, फसवेगिरी- विश्वासघात आदी सर्वच गोष्टींना मग योग्य ठरवावे लागेल आणि प्रसंगी त्या गोष्टीही अपुऱ्या पडतील. खून, रक्तपात वगैरे सर्वच मार्गाना मान्यता देणे क्रमप्राप्त ठरेल. परंतु ही दिशा कितपत योग्य आहे? यामुळे ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ असे बलवानांचे व बेबंदशाहीचेच थैमान सुरू होणार नाही का? आणि तसे झाले तर, कोणाला तरी आपल्या जगण्याची शाश्वती वाटणे कसे शक्य आहे का? मग कसले भजन आणि काय? तेव्हा, ‘मला जगावयाचे आहे’ असे म्हणणाऱ्या माणसाला स्वत:वर काही बंधने लादून घेतली पाहिजेत; काही पथ्ये पाळली पाहिजेत. सात्त्विक वृत्तीने, शुद्ध आचारणाने आणि संयमानेच जगायचे असा निर्धार केला पाहिजे. जगण्याकरिता आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि त्या मिळविण्याचे मार्ग किंवा त्यासाठी लागणारा पैसा या सात्त्विकतेचे, न्यायाचे वा प्रामाणिकतेचे बंधन अथवा अधिष्ठान राहील याची काळजी घेतली पाहिजे. हे ओघानेच पदरी येते आणि अशा प्रकारचे जीवन जगण्याचा व्यवहार म्हणजेच ईश्वराचे भजन, असे म्हणायलाही हरकत नाही. भजनासाठी जगणारा माणूस हा मीठ-भाकर खाऊनही मोलमजुरी करतो व सुदृढ राहू शकतो, अशी उदाहरणे आहेत. यातून मला सांगायचे एवढेच आहे की, भजनाची ज्याला तळमळ असेल त्याला ‘निर्वाहापुरते अन्नआच्छादन’ आणि ‘जोडूनिया धन उत्तम व्यवहारे’ ही संतवचने लक्षात घेऊन संयमानेच सदाचरणाने वागून आपल्या साधारण परिस्थितीतदेखील उन्नती करून घेता येईल.’’
rajesh772@gmail.com
