‘कलापासून कौलापर्यंत…’ हे संपादकीय (३ जून) वाचले. राजीव गांधींच्या काळात काँग्रेसच्या जागा चारशे पार गेल्या, मात्र तेव्हा लोकशाहीला धोका असल्याची भीती कोणी वर्तविली नव्हती. आता ती वर्तवली जात आहे. लोकशाही धोक्यात येईल आणि विशिष्ट धर्माधारित राज्य येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. एका धर्माचे राष्ट्र ही भूमिका अनेकांसाठी चिंतेचा मुद्दा ठरत आहे. या निवडणुकीचा निकाल लोकशाहीचा निक्काल लावणारा ठरू नये, एवढीच अपेक्षा.
● युगानंद गुलाबराव साळवे, पुणे
मांडलिकत्व मान्य नव्हे सिद्ध केले
‘कलापासून कौलापर्यंत…’ हा अग्रलेख वाचला. गेल्या तीन महिन्यांत सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांची उणीदुणी काढत आरोप- प्रत्यारोपांच्या वारेमाप फैरी झाडल्या. या काळात घोषणांचा पाऊस पडला. सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांनी तथ्यहीन प्रचाराची परिसीमाच गाठली नव्हे, तर ओलांडली! पाठिंबा पुरोगामी विचारांना आहे की प्रतिगामी विचारांना, हे आता स्पष्ट होईल. बहुतेक निवडणूक चाचण्यांनी, प्रसारमाध्यमांनी सत्तापक्ष भाजपलाच यशाचा कौल देऊन आपले मांडलिकत्व मान्य नव्हे सिद्ध करत सत्तापक्षाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे! मतदार सुबुद्ध आहे की निर्बुद्ध या कसोटीचाच निकाल आज आहे!
● श्रीकांत मा.जाधव, अतीत (सातारा)
हेही वाचा >>> संविधानभान : या कोवळ्या कळ्यामाजी…
करायला गेलो एक आणि झाले भलतेच!
‘कलापासून कौलापर्यंत…’ हे संपादकीय (३ जून) वाचले. राज्यात विरोधकांचे पूर्णपणे पानिपत करून भाजप आणि रालोआ यांस ‘नंबर वन’ करण्याच्या मिषाने भाजपचे आधुनिक चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष फोडून, जोरदार तयारी केली होती. परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्हीही नेते अनपेक्षितपणे कुचकामी व बेभरवशी ठरले. चाचण्यांचा अंदाज पाहता, करायला गेलो एक, आणि झाले भलतेच! अशी विचित्र परिस्थिती उद्भवल्याचे दिसते. पाहण्यांतील भाकिते खरी ठरल्यास देवेंद्र फडणवीसच नव्हे, तर एकनाथभाऊ आणि अजितदादाही आपापल्या कपाळावर हात मारून घेतील, हे निश्चित. यानिमित्ताने आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढावी लागणार, हा प्रश्नही कदाचित निकाली निघेल. भाजपने आता आपले गुप्त ईप्सित साध्य करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाच सोबत घेऊन नशीब अजमावून पाहण्याचा पर्याय आहे.
● बेंजामिन केदारकर, नंदाखाल (विरार)
घटक पक्षांचे गणित कारणीभूत
‘कलापासून कौलापर्यंत…’ हा अग्रलेख वाचला. भाजपप्रणीत रालोआ ३५० जागा मिळवेल असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांत वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत भाजपने घटक पक्षांना सोबत घेऊन जुळवलेले गणित आणि व्यूहरचना हे याला कारणीभूत ठरेल, असे वाटते. आपल्या पक्षाची मते कायम ठेऊन इतर पक्षांच्या मतांची विभागणी करण्यात भाजपला यश मिळेल. भाजपने अगदी दोन टक्के मते असलेल्या पक्षांनासुद्धा चुचकारत किंवा डोळे वटारून आघाडीत ठेवले आहे. त्यामुळे काठावरचे बहुमत तरी ते संपादन करतीलच. राज्यात तीन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना खिंडीत पकडून त्यांचे ‘कल्याण’ तरी करतील किंवा ठाण्या-पुण्याच्या बोगद्यात ढकलून मोकळे तरी होतील. नसता व्याप सांभाळण्याऐवजी स्वबळावर ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला जाईल आणि निवडणुकीनंतर पुन्हा गरज भासल्यास जवळ घेतले जाईल. राजकारणात कोणीही अस्पृश्य नसतो. प्रचारात एकमेकांवर चिखलफेक करणारे सत्तेसाठी काहीही करतात. निदान आपले राज्य तरी अपवाद ठरावे अशी अपेक्षा.
● नंदकिशोर भाटकर, गिरगाव (मुंबई)
२०१४ ते २९ हा सुवर्णकाळ ठरेल
‘कन्याकुमारीमधील साधनेतून नवे संकल्प साकारले’ हा लेख (लोकसत्ता- ३ जून) वाचला. ‘मन बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त झाले’ हे त्यांचे विधान प्रत्ययकारी आहे. त्याची प्रचीती त्यांच्या अथक कार्यातून येते. दोन-चार तासांची झोप आणि तरीही सतत १० वर्षे एवढा कामाचा उरक, ही बाब योगसाधनेमुळेच शक्य झाली आहे. सतत तीच तीच भंपक टीका ऐकून, कमी समज असणारे लोक त्यावर विश्वास ठेवू लागतात व अशा लोकांची संख्या भारतात कमी नाही, असे मिर्झा गालिब यांनी पूर्वीच सांगून ठेवले आहे. मोदींचे संकल्प चांगले आहेत व ते ते तडीस नेतील याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. इतिहासकार २०१४ ते २९ हा काळ भारताचा सुवर्णकाळ म्हणून नोंदवतील, याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. पथ्य फक्त एकच, मोदींनी पक्षातील कार्यकर्त्यांकडून केली जाणारी मुस्लीमविरोधी वक्तव्ये थांबवावीत!
● अरविंद शं. करंदीकर, तळेगाव दाभाडे
विक्रम होईलही पण विविधता टिकेल?
‘कन्याकुमारीतील साधनेतून नवे संकल्प साकारले’ या लेखातील (लोकसत्ता- ३ जून) माननीय मोदी यांचे विचार वाचले. पंतप्रधान एकीकडे म्हणतात की माध्यमे तटस्थ राहिलेली नाहीत. पण तरीही आपली छबी आणि विचार सर्व माध्यमांतून झळकविण्याचा त्यांचा अट्टहास काही आटलेला दिसत नाही.
ध्यानधारणा या वैयक्तिक मानल्या गेलेल्या स्व-विकासातही त्यांचा व्यावसायिक माध्यममोहाचा न आवरलेला आवेग अचंबित करून गेला. ध्यानधारणेनंतरही त्यांचे मनोगत राजकीय आणि मोघमच भासले. विरोधकमुक्त भारताकडे सुरू असलेली त्यांची वाटचाल लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचा विध्वंस करणारी आहे. मताचे दान स्वत:च्या पारड्यात पाडून घेऊन ते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा विक्रम कदाचित घडवूही शकतील, पण हे होत असताना भारत मात्र आपले वैविध्यातील ऐक्य टिकविण्यासाठी धडपडताना दिसेल, हे नक्की!
● विजय भोसले, घणसोली (नवी मुंबई)
एकाच व्यक्तीला स्वातंत्र्य?
‘बुकमार्क’मध्ये अभिजीत रणदिवे यांनी लिहिलेल्या सलमान रश्दीबद्दलच्या लेखात वाचलेले वाक्य – ‘‘आपण काही म्हणालो तर त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याविषयी जर भीती वाटत असेल तर तुम्ही स्वतंत्र नाहीत हे रश्दी ठामपणे बजावतो.’’ या वाक्याचा अधिक विचार करताना, स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षीदेखील या देशात फक्त एकाच व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य आहे की काय, असा प्रश्न पडला!
● गिरीश कुलकर्णी, सांगली
हवामान अंदाजांचे नियमन महत्त्वाचे
‘हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांसाठी परवाने लागू करावेत का?’ हे डॉ. अक्षय देवरस यांनी केलेले ‘विश्लेषण’ (लोकसत्ता, ३ जून) वाचले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, हवामानाचा अचूक अंदाज देणे कठीण आणि आव्हानात्मक आहे. तसेच या क्षेत्रात काम करण्यासाठी, प्रशिक्षण आणि अभ्यास आवश्यक आहे. आज मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत, हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या नामवंत वेधशाळा आहेत. त्यांनी वर्तवलेले अंदाजदेखील काहीवेळा चुकू शकतात. उदा: हवामान खात्याकडून आज मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असेल तर, त्यादिवशी हलक्या सरी किंवा चक्क ऊन पडते. याच्या विरुद्धही स्थिती उद्भवू शकते. निसर्गाचे गणित वेधशाळासुद्धा अचूक मांडू शकत नाही. संकेतस्थळे आणि स्वयंघोषित अभ्यासकांचा सुळसुळाट होणे मात्र चिंताजनक आहे. केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी असे काही करणे हा पोरखेळ नव्हे कारण याचा शेतकऱ्यांच्या कामांवर परिणाम होऊ शकतो. वेधशाळेने जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असेल तर, शेतकरी पेरणी करून पावसाची अक्षरश: चातकासारखी वाट पाहत असतो. परंतु मग ८-१० दिवस पाऊस पडतच नाही. सहाजिकच कडक उन्हामुळे बियाणे सुकून जाते व दुबार पेरणीचे संकट ओढवते. शेतकऱ्याला वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाऊस पडावा एवढीच अपेक्षा असते. तो विलंबाने आला, कमी किंवा जास्त पडला, तरीही नुकसान ठरलेलेच असते. त्यामुळे चुकीच्या अंदाजांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने या व्यवसायाचे नियमन करणे गरजेचे आहे. हवामानाचे अंदाज देण्यासाठीसुद्धा परवाना बंधनकारक केला पाहिजे.
● गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (मुंबई)