‘‘इंडिया’ने एकास एक उमेदवार दिले तर?’ हा ‘लाल किल्ला’ सदरातील महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. या प्रश्नाला एकच उत्तर- ‘एकास एक उमेदवार दिले तर‘च’ २०२४ ची लोकसभा अपेक्षेपेक्षा वेगळी पाहायला मिळेल. संयुक्त महाराष्ट्र झाला‘च’ पाहिजे मधील ‘च’एवढेच महत्त्व या ‘च’लाही आहे. नाहीतर मोदींच्या विजयाकरिता जनमत चाचणीचीही गरज भासणार नाही. राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या विरोधात थेट लढण्यासाठी आघाडीच्या नेत्यांना आमने-सामने सामना तडीस न्यावाच लागेल. त्यासाठी पक्षाच्या विचारधारेशी तडजोड करणे व मतांच्या टक्केवारीत दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाला उमेदवारी देणे याला पर्याय नाही. ५० टक्के एकंदर सरासरी मतदानात २५ टक्के मतदानावर राजकीय पक्ष राज्य करतो. ‘अगली बार चारसो पार’ नारा खरा ठरला तर जनतेला ‘न्यायालय’ हाच एकमेव आधार राहील असे वाटते.
श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)
‘इंडिया’ने योग्य समन्वय साधणे गरजेचे
‘इंडियाने एकास एक उमेदवार दिले तर?’ हा महेश सरलष्कर यांचा ‘लाल किल्ला’ सदरातील लेख (१५ जानेवारी) वाचला. २०२४ ची निवडणूक ही भाजपसाठी जशी महत्त्वाची आहे तशीच ती आघाडीपेक्षा काँग्रेससाठी गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक महत्त्वाची असेल. इंडिया आघाडीतील पक्षांनी आपसातील वाद टाळले आणि उमेदवारीवर एकमत झाले तर चित्र पालटू शकते, मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत जे विजयी झाले ते आज सोयीसाठी पक्ष बदलत आहेत, त्यामुळे कोणाला तिकीट द्यावे, याविषयी संभ्रम निर्माण होऊ शकतो. योग्य समन्वय साधणे इंडिया आघाडीसाठी अपरिहार्य आहे.
सुनील समडोळीकर, कोल्हापूर
हेही वाचा >>> लोकमानस : धोरण-धरसोड लवकर दूर होणे गरजेचे
परंपरांचे जोखड नाकारणारी ‘स्वरयोगिनी’
‘..मन लागेना मोरा’ हे संपादकीय (१५ जानेवारी) वाचले. हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील एकेक बुरूज ढासळत आहेत. उस्ताद राशिद खान यांच्यामागोमाग शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे जाणे, या दोन्ही घटना हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतक्षेत्रासाठी दु:खद आहेत.
भारतात शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा आहे. मोठमोठी घराणी आहेत. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी किराणा घराण्यातील गायकीचा वसा जपला. त्या घराण्याच्या गायकीत सरगमची भर घालण्याचे फार मोठे काम त्यांनी केले. प्रभाताईंनी किराणा घराण्याची परंपरा मोठया अभिमानाने पुढे नेली. त्याचबरोबर घराणी, रागसंगीत गाण्याच्या ठरलेल्या वेळांची बंधनेही त्यांनी सैल केली. स्वरसाधना असलेल्या प्रभा अत्रे या हिंदूस्थानी शास्त्रीय संगीताशी एकरूप होत्या. कला श्रेष्ठ की परंपरा याबाबतचे चिंतन करताना त्यांनी अनेक परंपरा मोडून, शास्त्रीय संगीताला त्यातून मुक्त केले. ख्याल गायकीसह ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाटयसंगीत, भावसंगीत गायकीवर त्यांचे प्रभुत्व होते. प्रभा अत्रेंच्या गाण्याचे खास वैशिष्टय म्हणजे त्यांच्या गाण्यात आलापीचे प्रमाण इतर गायकांच्या तुलनेत अधिक असे. भविष्याचा विचार करण्याची दृष्टी त्यांनी आपल्या गुरू हिराबाई बडोदेकर यांच्याकडून घेतली आणि त्याच वाटेवर त्या जात राहिल्या. शिवाय शास्त्रीय गायिका असण्यासोबत त्यांनी एक शिक्षणतज्ज्ञ, प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका म्हणूनही लौकिक मिळवला. शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात अत्रे यांचा मोलाचा वाटा होता.
सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)
संगीत विचारवंत, लेखिका, कवयित्री..
‘..मन लागेना मोरा’ हे संपादकीय (१५ जानेवारी) वाचले. डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीत तारकामंडळातील आणखी एक तारा निखळला. स्व-अभ्यास व स्व-संशोधनामुळे संगीतातील बारीकसारीक तपशील- बारकावे- ठोकताळे- खाचाखोचा त्यांना पूर्णपणे अवगत होत्या. संगीत विचारवंत, लेखिका आणि कवयित्री अशी त्यांची ख्याती होती. तब्बल सात दशके त्यांनी आपल्या सुमधुर गायकीने रसिकांवर मोहिनी घातली. डॉ. प्रभा अत्रे यांचे गाणे रसिकांसाठी आनंदपर्वणी असे. संगीत रसिकांच्या हृदयात त्या कायमस्वरूपी वास करतील!
बेंजामिन केदारकर, नंदाखाल (विरार)
अभ्यासू ‘स्वरमयी तपस्विनी’
‘..मन लागेना मोरा’ हे संपादकीय वाचले. अभ्यासपूर्ण गायकी, ‘स्वरमयी गुरुकूल’च्या माध्यमातून शेवटपर्यंत नवोदितांना प्रोत्साहन, गानसेवा, कानसेनांसाठी गानमेवा, नवनवीन बंदिशींची श्रवणीय बांधणी, २०२२पर्यंत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा हातखंडा आणि श्रोत्यांना भान हरपायला लावणारा समारोप यामुळे त्या सातत्याने संगीतक्षेत्रात अग्रस्थानी राहिल्या. ‘तन मन धन तोपे वारू’ असेच जणू आपल्या गायनरसिकांना सांगत राहणाऱ्या या ‘स्वरमयी तपस्विनी’च्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली.
श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे
हेही वाचा >>> लोकमानस: आता जनतेच्या न्यायालयात जाणे उत्तम!
देवरांचे पक्षांतर ही अपरिहार्यता
मिलिंद देवरा यांच्या काँग्रेस पक्षत्यागाचे विशेष आश्चर्य वाटले नाही. भाजपला हरवायचे असेल तर इंडिया आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसला जास्त त्याग हा करावा लागणार, हे उघड आहे. गेल्या दोन निवडणुकांत देवरा यांना एक लाखाहून अधिक मतांनी पराभूत करून दक्षिण मुंबईतून विजयी झालेल्या अरविंद सावंत यांच्यासाठी ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला द्यावी लागणार हे निश्चित होते. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून, मुकेश अंबानी यांनी जाहीर पाठिंबा देऊनही देवरा यांना आपली जागा राखता आली नव्हती. तेव्हा त्यांनी या वेळी त्याग करणे आवश्यक होते, पण स्वातंत्र्यानंतर लगेचच सत्ता मिळाल्यामुळे त्याग व नि:स्वार्थीपणाची परंपराच मोडीत निघालेल्या देवरांसारख्या काँग्रेसमधील नेत्यांनी पक्षत्याग करणे सध्याच्या भ्रष्ट राजकीय व्यवस्थेची अपरिहार्यता म्हणावी लागेल.
डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर (मुंबई)
देवरांना पुढील निवडणुकीत तिकीट द्या
‘मिलिंद देवरांचा शिंदे गटात प्रवेश’ ही बातमी (लोकसत्ता, १५ जानेवारी) वाचली. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे वंशपरंपरागत उमेदवार असलेल्या देवरांनी, निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर केले; ते काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महानतेचा साक्षात्कार झाला म्हणून नाही, तर आपल्याच पारंपरिक मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीला धोका निर्माण झाला आहे म्हणून! तसे नसेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरांना आताच शिवसेनेतर्फे उमेदवारी न देता, पाच वर्षे शिवसैनिक म्हणून कार्य करून, आपली पक्षनिष्ठा सिद्ध करण्याचा सल्ला दिला पाहिजे आणि शिवसेनेतीलच एखाद्या योग्य कार्यकर्त्यांला तेथून निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. मिलिंद देवरांना झालेला हा ‘साक्षात्कार’ खरा असेल तर ते ही ‘ऑफर’ नक्की स्वीकारतील आणि तो नाटकी असेल तर विनाविलंब ‘घरवापसी’ करतील. त्यांचा उद्देश लगेच सिद्ध होईल.
शिवराम वैद्य, निगडी (पुणे)
मंदिरे स्वच्छ तर ज्ञानमंदिरे अस्वच्छ का?
‘भाजप नेत्यांचा मंदिर स्वच्छता मोहिमेत सहभाग’ हे वृत्त (लोकसत्ता- १५ जानेवारी) वाचले. सध्या देशभर मंदिर स्वच्छतेचा ज्वर चढू लागल्याचे दिसते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात स्वेच्छेने स्वच्छता केली. ते करताना भारतातील सर्व मंदिरांत स्वच्छता मोहिमा राबविण्याचे आवाहन मोदींनी देशवासीयांना केले. लगोलग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील प्राचीन कौपीनेश्वर मंदिरात स्वच्छता केली. वास्तविक मंदिरांत सकाळ, संध्याकाळ नित्यनेमाने स्वच्छता केली जाते. त्यानंतरच इतर सोपस्कार पार पडतात. मग ही मंदिर स्वच्छता मोहिमांची प्रतीकात्मकता कशासाठी? देशातील अनेक शाळा आजही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. शाळांमधील स्वच्छतागृहे कोणत्या अवस्थेत आहेत, हे जरा या तथाकथित स्वच्छता वीरांनी जाऊन पडताळावे आणि गरज आहे तिथे स्वच्छेने स्वच्छता करावी. मंदिरे स्वच्छ आणि ज्ञानमंदिरे अस्वच्छ अशी, ही परिस्थिती म्हणता येईल. बाळकृष्ण शिंदे, पुणे