‘देशभक्तीच्या अभावामुळे हजारो विद्यार्थी परदेशात!; इतिहासाच्या पुस्तकांत रामायण, महाभारताच्या समावेशाची शिफारस’ ही बातमी वाचली. एनसीईआरटीसारख्या राष्ट्रीय संस्थेच्या एका महत्त्वाच्या समितीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या सी. आय. आयझाक यांचे ‘विचार’ हा अतिसुलभीकरणाचा उत्तम नमुना मानावा लागेल.
विद्यार्थ्यांचे परदेशी जाणे, तिकडेच स्थायिक होणे यामागे शैक्षणिक सोयीसुविधा, संधींची मुबलकता, नोकऱ्यांतील वेतन आणि इतर सुविधा यांच्या बाबतीतील फरक, आपल्याकडे ‘आरक्षणा’मुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यातून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर येणारा अतिरिक्त दबाव/ ताण; हे सगळे मुद्दे ‘देशभक्तीचा अभाव’ या एकाच फटकाऱ्यासरशी निकालात काढण्याचे आयझाक यांचे कसब खरोखरच आश्चर्यकारक आहे.
क्षणभर ‘देशभक्तीचा अभाव’, हे गृहीतक खरे धरू. त्यावर उपाय म्हणून रामायण एक वेळ ठीक. त्यातील ‘जननी जन्मभूमिश्च..’सारख्या श्लोकांतून मातृभूमीच्या प्रेमाचे धडे विद्यार्थी शिकतील, असे मानता येईल. पण महाभारताचे काय? त्यामध्ये सर्व मानवी गुणावगुणांचे मोठया प्रमाणावर दर्शन होते. महाभारत हा ‘सुडाचा प्रवास’ असल्याचे विद्वानांकडून म्हटले जाते. तेव्हा महाभारतातून विद्यार्थी नेमकी देशभक्तीच तेवढी शिकतील, असे कसे मानता येईल? ‘महायुद्धाच्या पातळीवर अपरिहार्यपणे पोहोचलेला भावाभावांतील संघर्ष’ – हे महाभारत या महाकाव्याचे स्वरूप आहे, तर त्याचा शालेय पातळीवरील अभ्यास ‘देशभक्तीचे उदात्त ध्येय’च विद्यार्थ्यांसमोर ठेवील, हे कशाच्या आधारावर म्हणता येईल?
हेही वाचा >>> लोकमानस : भयसूचक चिन्हे बघायला मिळाली..
जाती, उपजाती, पोटजाती – यांनी आधीच पोखरलेल्या आणि संघर्षग्रस्त झालेल्या आपल्या देशात – सूतपुत्र कर्ण, वनवासी निषाद एकलव्य, आईने पिठात पाणी घालून दिलेले ‘दूध’ म्हणून पिणारा दरिद्री ब्राह्मणपुत्र अश्वत्थामा, दासीपुत्र विदुर.. अशा व्यक्तिरेखा कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांला काय संदेश देतील आणि कुठल्या सुडाची प्रेरणा देतील, हे कोणी सांगावे?! महाभारतातून विद्यार्थी देशभक्तीच शिकतील, ही अगदी भोळसट अपेक्षा आहे.
सुदैवाने, आयझाक यांच्या गृहीतकाची शहानिशा करता येईल, अशी एक युक्ती त्यांच्याच वक्तव्यात मिळते. ते म्हणतात की, ‘ही सूचना नवीन नाही, काही शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमात आधीच याचा समावेश आहे.’ तर मग आता एनसीईआरटीने ज्या शिक्षण मंडळांनी रामायण, महाभारताचा समावेश इतिहासाच्या शालेय अभ्यासक्रमांत केलेला आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांमधील परदेश गमनाचे प्रमाण तपासून बघावे. ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाईल!
श्रीकांत पटवर्धन, कांदिवली, मुंबई
सुविधा हव्यात, देशभक्तीचा काय संबंध?
‘देशभक्तीच्या अभावामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी परदेशात’ असा अजब दावा ‘एनसीआरटीई’च्या समितीने केल्याचे वृत्त (२२ नोव्हेंबर) वाचले. या दाव्यात तथ्य नाही. प्रतिवर्षी ६.५ लाख भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी ४ अब्ज डॉलर्सचे (३३ हजार कोटी रुपये) परकीय चलन खर्च करून परदेशात जातात आणि तेथेच स्थिरावतात. यामुळे ‘ब्रेन ड्रेन’ होते. याचा ‘रिव्हर्स फ्लो’ होण्यासाठी भारतीय उच्च शिक्षणव्यवस्था जागतिक दर्जाची होणे आवश्यक आहे. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी-व्यवसाय, व्यापार-उदीम, तंत्रज्ञान-उत्पादन, अध्यापन-संशोधन यांच्या उत्तमोत्तम संधी देशातच उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आणि वर्धिष्णू होणे जरुरीचे आहे. प्रदूषणमुक्त वातावरण आणि राहणीमानाचा दर्जा यालाही महत्त्व आहे. या सर्व गोष्टी प्रगत देशात उपलब्ध होत असल्याने हे विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यावर परदेशात राहणे पसंत करतात. बऱ्याच विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी बँकांकडून शैक्षणिक कर्जे घेतलेली असतात त्यांची सव्याज परतफेड करणे आवश्यक असते. परदेशात डॉलरमध्ये कमाई करून ते शक्य आणि साध्य होते. परदेशस्थ भारतीयांनी गतवर्षीच्या आर्थिक वर्षांत ११२.५ अब्ज डॉलर्स इतके परकीय चलन भारतात पाठविले. ही वाढ २६% होती. त्यामुळे यात त्यांचे देशप्रेमच दिसून येते. परदेशात जाणारे भारतीय विद्यार्थी हे अधिक चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि रोजगार, व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असल्यामुळे जातात. विकासाची प्रेरणा ही मानवामध्ये मूलत: नैसर्गिकच असते. अभ्यासक्रमात देशभक्तीचा भडिमार करून ही प्रेरणा नष्ट होणार नाही. तसेच परदेशात गेल्याने त्यांच्या देशभक्तीत खोट येते असे मानणे साफ चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे.
डॉ. विकास हेमंत इनामदार, भूगाव, पुणे</strong>
हेही वाचा >>> लोकमानस : सामान्यांचे प्रश्न चुकूनही चर्चेत नकोत, म्हणून..
देशाभिमानाचा मुद्दा दिशाभूल करणारा..
मुळात कोणत्याही व्यक्तीला स्वस्थ, सुंदर वातावरणात राहायला आवडते. असे वातावरण जिथे मिळेल तिथे जाऊन त्याचा अनुभव घेणे याला देशद्रोह खचितच म्हणता येणार नाही. देशाभिमान ही जितकी पुस्तकातून शिकण्याची गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक ती वातावरणातून अनुभवण्याची आहे. ज्या व्यक्ती देशसेवेच्या व्यवहारात अधिकृतरीत्या जोडलेल्या आहेत, त्यांचे उघड होणारे किंवा न होणारे भ्रष्टाचार, देशातील वाढते प्रदूषण, वाढत्या धार्मिक संघटना, देशातील मूलभूत प्रश्नांना हात घालणाऱ्या व्यक्तीचे होणारे हाल, आरक्षणाचे वातावरण या आणि अशा अनेक बाबी शिकती मुले डोळसपणे पाहत आहेत. त्यामुळे ‘काही हवे’ यापेक्षा ‘हे नको’ असे वाटण्याची शक्यता अधिक. तसे तर परदेशात शिकायला जाणे हे भारतीयांना नवीन नाही. गांधीजी, आंबेडकर, आनंदीबाई अशी ही यादी किती तरी व्यक्तींना समाविष्ट करून घेईल. त्यामुळे परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आणि कृती या गोष्टी देशाभिमानाशी किती प्रमाणात जोडल्या जाव्यात, याचा विचार व्हायला हवा.
वर्षां उदयन कुलकर्णी (शिक्षणशास्त्र अभ्यासक)
चांगल्या जीवनाची अपेक्षा करणे चुकीचे?
‘‘भारतीय तरुणांमध्ये असलेल्या देशभक्तीच्या अभावामुळेच ते परदेशात शिक्षणासाठी जात आहेत’ हा राष्ट्रीय शिक्षण संशोधन परिषदेचा अहवाल,’ ही बातमी वाचली (२२ नोव्हेंबर) आणि डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली!
आपल्या देशाबद्दल सर्वांनाच आदर असतो, प्रेम असते. पण शिक्षणासारख्या मूलभूत हक्कावरच गदा येते, तेव्हा तरुण वर्ग इतरत्र जाण्याचा विचार करतो! राज्यघटनेने शिक्षणाचा हक्क मान्य केला आहे! परंतु त्याचसाठी आरक्षणही अनिवार्य केले आहे! या आरक्षणाची मर्यादा शंभर टक्क्यांवर नेऊन ठेवण्याची देशातील राज्यांची जणू स्पर्धाच लागली आहे! शिक्षण घेऊनही चांगल्या नोकरीची शाश्वती नसेल तर हुशार युवक परदेशात जाऊन शिक्षणासह नोकरीसाठी का धडपड करणार नाही? देशप्रेम ही एक भावना आहे! परंतु भावना उराशी ठेवून माणसाचे पोट भरत नसते!! मानवी जन्म वारंवार वाटयाला न येणाऱ्या माणसाने आपले जीवनमान या जन्मी चांगले असावे असा विचार करणे चुकीचे आहे का?
अरुण गणेश भोगे, सदाशिव पेठ, पुणे
न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकायला हवे होते..
‘कोटयाच्या कपाळी..’ हा अग्रलेख (२२ नोव्हेंबर) वाचला. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पालकाची याचिका दाखल करण्यास नकार देण्याआधी किमानपक्षी सरकारला याबाबतीत बोलावून म्हणणे मांडण्याची संधी द्यावयास हवी होती. सरसकट सर्व दोष पालकांच्या माथी मारणे हे अन्याय करणारे नाही का? किंबहुना कोवळया वयात आत्महत्या हा विषय शिकवणी वर्गाच्या पद्धतीतील स्कोअरच्या अपेक्षांचे ओझे/ दडपण वाटणाऱ्या काही मुलांसंबंधी आहे. याचा अर्थ उरलेल्या ७७ टक्के मुलांनी हे ओझे पेलले असा होत नाही का? शिकवणी वर्गाचे नियमन अशासाठी की, त्यांनी मुलांना/मुलींना प्रवेश देण्यापूर्वी एक वर्ष समुपदेशन आणि पूर्वपरीक्षेचे प्रावधान ठेवण्यास हवे, जेणेकरून पुढे अभ्यासाचा भार सहन न होणाऱ्या मुलांना वेगळे काढण्याचा पर्याय राखीव ठेवता येईल आणि आत्महत्येचे प्रमाण हळूहळू कमी होईल. पालकांना परदेशात मुलांनी जावे असे वाटण्यात तेथील शिक्षण पद्धतीबरोबर जीवनशैली आणि गुणवत्ता यांचा मोठा वाटा आहे. सरकारचे मत जाणण्यासाठी पालकांना न्यायालयापुढे ‘पुनर्विचार’ याचिका करता येईल. विद्यार्थी काय किंवा शेतकरी काय, त्यांच्या ‘आत्महत्या’ टाळणे, ही सरकारबरोबरच समाजाची जबाबदारी नाही का? सध्या आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्या हे जरा अतिच होत आहे.
श्रीकृष्ण फडणीस, दादर, मुंबई
भावनाविकासासाठी भोवतालच कारणीभूत
‘युवांचे भावनाविश्व’ हा अमृत बंग यांचा ‘चतु:सूत्र’ सदरातील लेख वाचला. प्रत्येक व्यक्तीमध्ये भावना असतात, पण त्या व्यक्त करायची प्रत्येकाची पद्धतही ठरलेली असते. सध्याची युवा पिढी सर्वात जास्त आनंद ही भावना मोठया प्रमाणात व्यक्त करताना दिसते. समाजमाध्यमावर फोटो टाकण्याचा ट्रेण्ड सतत आपल्याला सांगत असतो, आनंदी राहा, व्यस्त राहा, दु:खी असाल तर पिझ्झा खा, कॉफी प्या आणि दु:ख विसरा, पण दु:ख कोणाला सांगू नका. या बदलत्या काळानुरूप युवकांचे व्यक्त होण्याच्या पद्धती बदलताना दिसत आहेत. काही प्रमाणात सकारात्मक पण बहुधा नकारात्मक परिणामही दिसत आहेत. युवांचे भावनाविश्व प्रस्थापित होण्यासाठी सभोवतालचे वातावरणही जबाबदार असते. त्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक यांचा समावेश करता येईल.
प्रा. शिल्पा सुर्वे, जुनी सांगवी, पुणे