आपल्याकडे आंग्लकथा-कादंबऱ्या वाचणाऱ्यांना साठोत्तरी ते नव्वदोत्तरीतील जागतिक निवडक कथांच्या संग्रहात ए.एस. बायट हे नाव हमखास सापडणारे. मग ते संकलन अमेरिकी संपादक-प्रकाशनांचे असो किंवा युरोपीय. पेशाने प्राध्यापक असणाऱ्या फारच अपवादात्मक व्यक्ती गुणात्मक साहित्याची निर्मिती करू धजतात. बाकी सारे हे विद्वत्ताप्रचुर समीक्षेच्या प्रांगणातील ‘रांगोळीबहाद्दर’ म्हणून आपल्या तथाकथित साहित्यिक आयुष्याची परिसीमा गाठतात. ए. एस. बायट यांचा विशेष हा की, गुणात्मक कलात्मक साहित्य आणि समीक्षा या दोन्ही प्रांतांत सारखीच कामगिरी घडवत त्यांनी आपली प्राध्यापकी सांभाळली. पण एका विशिष्ट टप्प्यानंतर त्या पेशाला रामराम ठोकून त्यांनी कादंबरी लिखाणावर लक्ष केंद्रित केले. महाविद्यालयीन सुट्टीत आधी त्यांचे कथा-कादंबरी लेखन चाले, तो त्यानंतर पूर्णवेळचा उद्योग बनला. या एककेंद्रित कामाचे फळ त्यांना १९९० साली लाभले. त्यांच्या ‘पझेशन : अ रोमान्स’ या कादंबरीला त्या वर्षी बुकर पारितोषिक मिळाले आणि तीन दशकांची त्यांची लेखनकल्ली वृत्ती सुफळ आणि संपूर्ण बनली.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : पीआरएस ओबेरॉय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅण्टोनिआ सुझन ड्रॅ्बल या मूळ नावाच्या या लेखिकेचा जन्म दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या इंग्लंडमधील शेफील्ड भागातला. कटू बालपणातून शिक्षण घेत त्यांची लेखन उमेदवारी सुरू होती. शाळा आणि महाविद्यालयातील बरेचसे लेखन त्यांनी जाळून टाकले. पुढे शिक्षकी पत्करून चार्ल्स बायट यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांचे कादंबरीलेखन सुरू झाले. इतिहास आणि वर्तमान यांची सांगड त्यांच्या कथानकांत दिसे. पहिली कादंबरी ज्या १९६४ या वर्षांत त्यांनी लिहिली. त्यावर डी.एच. लॉरेन्स, टी.एस. एलियट, एच.जी. वेल्स या गतशतकातील गाजलेल्या लेखकांच्या नामशैलीनुरूप ए.एस. बायट हे नाव त्यांनी गोंदवले. त्याच काळात त्यांची सख्खी बहीण मार्गारेट ड्रॅबल यांचीदेखील कादंबरी आली. या दोघी कादंबरीकार बहिणींचा दबदबा ब्रिटिश साहित्यावर उमटण्याची शक्यता वर्तवली जात असताना दोघींनी आपल्या वेगवेगळय़ा लेखनवाटा सुनिश्चित केल्या. आयरिस मरडॉक, जॉर्ज एलियट आदी लेखकांवर अभ्यास आणि समीक्षात्मक/ संपादनात्मक ग्रंथ, कथात्म साहित्यावर प्रचंड मोठा टीकाग्रंथ, वेगवेगळय़ा प्रकारच्या निबंधांचे महाग्रंथ, ब्रिटनमधील नवीन लेखकांच्या साहित्याचे काही वर्षे सुरू राहिलेल्या खंडांचे संपादन हा कादंबऱ्या आणि प्राध्यापकीव्यतिरिक्तचा बायट यांचा लेखनपसारा. घटस्फोटानंतर, अकरा वर्षांच्या मुलासाठी त्यांनी प्राध्यापकीचा पेशा पत्करला. नोकरीच्या त्याच आठवडय़ात या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. पुढे अकरा वर्षे त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकी केली. लेखनासाठीच्या वेळेला जुळविण्यासाठी मात्र त्यातून निवृत्ती घेतली. ‘विद्यापीठीय संशोधन करणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींना आदल्या शतकातील कवींचे लिखित घबाड हाती लागते. त्याचा पाठपुरावा करताना त्यांच्यातील प्रेमगाठी घट्ट होऊ लागतात..’ ही ‘पझेशन’ कादंबरीची कथा. त्यावर चित्रपट निघाल्यानंतर ए.स. बायट यांची कीर्ती सर्वार्थाने पसरली असली, तरी साहित्यिक जगतात ती पूर्वीपासूनच मोठी होती. गेल्या आठवडय़ात झालेल्या मृत्यूने त्यांच्या लिखाणाला विराम मिळाला.