अतुल सुलाखे

भूदानाविषयी जाणून घेताना आपण गांधीजी आणि विनोबांचे सत्याग्रहाचे प्रयोग पाहिले. बापूंनी या विषयाचा एवढा शोध घेतला की विनोबांना त्याच्या पुढची मांडणी करणे भागच होते. सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गामुळे गांधीजी अफाट जनप्रिय झाले. परंतु आपल्या कार्याविषयी खुद्द गांधीजींचे मत काय होते ते जाणून घ्यायला हवे.

गांधीजींच्या सत्याग्रहाने प्रत्येक जण भारावून गेल्याचे दिसते. त्यांच्या समकालीन बडय़ा नेत्यांनाही संघर्षांचा दुसरा मार्ग दिसला नाही. आजही सत्याग्रह आणि अहिंसेचा मार्ग सोडता येत नाही, अशी स्थिती आहे. या उभय मार्गाबाबत गांधीजी शेवटचा शब्द होते. त्यांनी या अनुषंगाने केलेले कार्य जगाने गौरविले आहे.

अहिंसा आणि सत्याग्रहाचा विचार हा गांधीजींचा आध्यात्मिक शोध होता. तो त्यांनी सामूहिक केला. त्यांच्या पूर्वीचे सर्व सत्याग्रह व्यक्तिगत होते. अगदी सत्याग्रह शब्दही जन्माला आला नव्हता. सत्याग्रहाऐवजी नि:शस्त्र प्रतिकार हा शब्दप्रयोग वापरात होता. गांधीजींनी सत्याग्रह शब्द निर्माण केला. तो परंपरेशी आणि दक्षिण आफ्रिका, अमेरिका, रशिया आणि इंग्लंड इथल्या अनुभवांशी जोडला.

त्यांनी भक्त प्रल्हादाप्रमाणे थोरो, टॉलस्टॉय, क्वेकर पंथ यांच्याशीही नाते जोडले. थोरोच्या ‘सिव्हिल- डिसओबिडियन्स’चे संस्कृतमध्ये भाषांतर करवून घेतले. अर्थातच विनोबांवर त्यांनी ही जबाबदारी सोपवली होती. दुर्दैवाने आज ती प्रत गहाळ झाली आहे. सर्वोदय, सत्याग्रह यांना याहूनही असंख्य आयाम आहेत. अशा स्थितीत सत्याग्रहाबद्दल गांधीजी पूर्ण समाधानी नव्हते.

अखेरच्या काळात प्यारेलालजींनी त्यांची भूमिका शब्दबद्ध केली आहे. गांधीजींनी सांगितले, ‘सत्याग्रहाचा थोडासाच अंश मला समजला आहे. हे मोठे गहन शास्त्र आहे. त्यात अजून किती तरी शोध व्हावयास हवा.’ शेवटी तर ते म्हणू लागले, ‘परमेश्वराला माझा स्वराज्यप्राप्तीच्या कामात उपयोग करून घ्यायचा होता, म्हणून त्याने माझ्या डोळय़ांवर पट्टी बांधली. म्हणून दिसू शकले नाही की आमचा सत्याग्रह दुर्बलांचा होता. सबलांचा नाही. तो तर नि:शस्त्र प्रतिकाराचाच प्रकार होता. खऱ्या अर्थाने सत्याग्रह नव्हता.’

एखाद्या क्षेत्रात आपला शब्द अंतिम असताना अशी भूमिका मांडायची याला फार मोठी निष्ठा लागते. स्वत:ला सदैव ऐरणीवर ठेवायचे आणि घणही आपणच घालायचा हे अद्भुत आहे. त्याहून कहर म्हणजे विनोबांना बापूंची भूमिका मान्य होती. ‘सत्याग्रह सूर्याचा उदय गांधीजींमुळे झाला हे खरे असले, तरी त्यांच्या काळात त्या सूर्याचा प्रकाश होता,’ असे त्यांनी म्हटले होते.

थोडक्यात अतीव रचनात्मक कार्य म्हणजे सत्याग्रह असा निष्कर्ष यातून निघतो. विनोबाच त्यासाठी योग्य होते. रचनात्मक मानसिकता, आध्यात्मिक अधिष्ठान आणि प्रयोगशीलता याखेरीज गांधीजींचा सत्याग्रहाचा विचार पुढे जाणे अशक्य होते. नि:शस्त्र करा वा सशस्त्र, एकदा प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला की सत्याग्रहाचा शोध संपतो. विनोबांनी जमिनीसाठी संघर्षांचा मार्ग नाकारला आणि भारतीयांकडून भूदान मागितले हे फार सयुक्तिक होते.

jayjagat24@gmail.com