सर्वांना विदितच आहे की सरकारचे ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाचे कार्य ठिकठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गाला काही ठिकाणी विरोध तर बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांचे समर्थन मिळते आहे. जिथे विरोध आहे तिथे शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी सदिच्छादूतांची नेमणूक केलेली आहेच. मात्र कोकणात खास नारायण राणेंच्या आग्रहावरून फटकेदूत नेमण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. विशिष्ट मुदतीत हा मार्ग पूर्ण करून लोकांकडून पथकर वसूल करणे राज्याच्या हितासाठी (कंत्राटदाराच्या नाही) आवश्यक असल्याने व चिवट प्रतिकार करण्यात तरबेज असलेल्या कोकणी शेतकऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कंत्राटी पद्धतीने या नव्या दूतांची नेमणूक करायची आहे. त्यासाठीच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे असतील.
१) नियुक्ती मिळालेल्या फटकेदूताला स्वत:चा चाबूक सोबत आणावा लागेल. त्याला चांगले वळवणे, तेलपाणी करण्याची जबाबदारी सर्वस्वी त्याचीच राहील.
२) या दूतांना महिन्याला २० हजार रुपये मानधन मिळेल. शिवाय प्रतिफटका शंभर रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळेल. दररोज जास्तीत जास्त फटके मारून अतिरिक्त कमाईची संधी असेल.
३) दूतांची शारीरिक क्षमताही पोलीस व लष्करी जवानांसारखी असणे आवश्यक.
४) ज्यांना फटके मारायचे आहेत त्या शेतकऱ्यांना पकडून आणण्याची जबाबदारी राणे यांची असेल. ते कार्यक्रमातून वेळ काढून कधी कधी फटके मारताना प्रत्यक्ष हजर राहतील.
५) फटके मारण्याचे काम हे प्रचंड शारीरिक श्रमाचे असल्याने या दूतांना रोज राणे यांच्याकडून मल्हार मटण व कोंबडीचा खुराक दिला जाईल.
६) नेमणूक झालेला दूत हा कणखर मनोवृत्तीचाच हवा. शेतकऱ्यांना मारताना त्याचे मन अजिबात द्रवायला नको. तसे लक्षात आल्यास त्यालाच फटक्यांची शिक्षा देऊन कंत्राट रद्द केले जाईल.
७) फटके इतके जोरकसपणे मारायला हवेत की त्याचा आवाज संपूर्ण तळकोकणात घुमायला हवा.
८) राणेंच्या आग्रहावरून खास कणकवलीत तयार केलेल्या फटके केंद्रावर दूताला रोज सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत हजर राहावे लागले.
९) फटक्यांची तीव्रता एवढी हवी की शेतकरी शक्तिहीन व्हायला हवा व त्याने शक्तिपीठाचा गजर करायला हवा.
१०) हे फटके मारणे इतर शेतकऱ्यांनी बघणे व त्यांची भीतीने गाळण उडणे अपेक्षित असल्याने फटके केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी जमवण्याचे काम राणेंच्या मार्गदर्शनात पार पाडले जाईल.
११) फटके मारताना दूतांचा चेहरा निर्विकार व जल्लादासारखा असायला हवा. कोणत्याही दूताच्या चेहऱ्यावर शेतकऱ्यांविषयी थोडी जरी दया दिसली तरी त्याची तात्काळ हकालपट्टी केली जाईल.
१२) ‘राणेंचे फटके, सदिच्छा दूतसे हटके’ असे या मोहिमेचे नामकरण करण्यात आले असून इच्छुकांनी अर्ज करताना तसा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.
१३) शक्तिपीठाला विरोध करणाऱ्या कोकणातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीची कातडी सोलून झाल्यावर व मार्गाला होणारा विरोध पूर्णपणे मावळल्याचे लक्षात आल्यावर दूतांची कामगिरी संपुष्टात येईल. मात्र भविष्यात त्यांची जेव्हा गरज पडेल तेव्हा राणे त्यांच्याशी थेट संपर्क साधतील याची नोंद सर्वांनी घ्यावी.