‘पावसाचे थेंब ही ढगांची स्वाक्षरी आहे. कोवळी पानं ही झाडांची स्वाक्षरी आहे. माझ्या स्वाक्षरीसाठी कोणतेही दस्तावेज धुंडू नका. माझ्या मनाची स्वाक्षरी तुम्हाला माझ्या कवितेत आढळेल’ असं स्वत:च्या कवितेबद्दल प्रख्यात तेलुगु कवी ‘सिनारे’ यांनी सांगितलं आहे.

डॉ. चिंगिरेड्डी नारायण रेड्डी म्हणजेच सी. नारायण रेड्डी या नावाचं लघुरूप ‘सी. ना. रे.’ म्हणून त्यांना ‘सिनारे’ या नावानं ओळखलं जातं. मराठीप्रमाणेच अशी नावांची लघुरूपं तेलुगुमध्ये आढळतात. कालीपटनम् रामाराव या नावाचे एक प्रसिद्ध तेलुगु कथाकार आहेत. ‘कारा मास्तरु’या नावानं ते लोकप्रिय होते… तर सिनारे यांचा जन्म तेलंगणातल्या करीमनगर नजीकच्या हनुमाजीपेट या गावी झाला. आई-वडील शेतकरी. मुलांनं खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती. करीमनगरच्या हायस्कुलात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात धाव घेतली. तिथं पीएच.डी. केल्यानंतर महाविद्यालयात अध्यापक म्हणून त्यांनी काम सुरू केलं, पण आधीच्याच काळात कविता कधीतरी हाताशी लागली आणि पुढे त्यांनी या कवितेचं बोट घट्ट पकडून ठेवलं. विविध छंदांमध्ये त्यांनी कवितालेखन केलं. प्रामुख्यानं गझल या काव्यप्रकारातलं त्यांचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं. निजामी राजवटीमुळे तेलुगुप्रमाणेच उर्दूचा समावेशही शालेय शिक्षणात होता. त्यामुळे उर्दूवर प्रभुत्व होतं. गझलकडे वळण्याचं तेही एक कारण. २२ व्या वर्षी ‘नव्वानी पुव्वू’ (लाजणारं फूल) या नावानं आलेला त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यानंतर त्यांची कविता नवनवी वळणं घेत राहिली. माणूस आणि निसर्ग यांच्यातल्या सहसंबंधांचा वेध घेणारी कविता ‘ऋतुचक्रम’ या नावानं प्रसिद्ध झाली. ‘मंथाल मानवुडू’ हा त्यांचा कवितासंग्रह १९७० साली प्रसिद्ध झाला. ‘ज्वाला आणि माणूस’ असा या शीर्षकाचा अर्थ होतो. मानवी मनाचा संताप आणि अपप्रवृत्तींबद्दलचा जो रोष आहे तो समाजातल्या अन्याय्य व अनिष्ट रूढींविरोधात जायला हवा. त्याची दिशा मानवी मूल्यांच्या स्थापनेसाठी व्हावी, समतेचं युग प्रस्थापित व्हावं असा विचार या संग्रहातून त्यांनी सांगितला. त्यांच्या या कवितेला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं.

वसुंधरेवर त्यांनी लिहिलेलं काव्य ‘विश्वंभरा’ या नावानं प्रसिद्ध आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत. मुक्तछंदातल्या या काव्यात माणसाच्या आध्यात्मिक, कलात्मक आणि वैज्ञानिक प्रगतीचं गान आहे. काळाच्या कसोटीवर माणसानं गाठलेल्या या बिंदूंना ही कविता स्पर्श करते. याच कवितेमुळे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांची ‘माटी मनीषी आकाशम्’ हीसुद्धा शंभर पानांची दीर्घ कविता आहे. या कवितेतही ‘सिनारे’ यांनी माणसाच्या महत्तेविषयी भाष्य केलं आहे. स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून पुढे पुढे झेपावणारा माणूस हा या कवितेचा केंद्रबिंदू आहे. ‘माटी मनीषी आकाशम’ चा अर्थच पृथ्वी आणि आकाशापेक्षाही माणूस थोर असल्याचं सांगणारा आहे. त्यांची कविता मानवतेचं मूल्य सातत्यानं अधोरेखित करणारी आहे. माणसाला पूर्णतेच्या दिशेनं नेणारी, त्यासाठी त्याला सतत प्रेरित करणारी ही कविता आहे. काही समीक्षकांनी, ‘माणसावर लिहिलेलं महाकाव्य आहे’ असं तिचं मूल्यमापन केलंय.

कवितेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सिनारे’ यांनी अनेक संगीत नाटकंही लिहिली. आंध्रप्रदेशातल्या अनेक महत्त्वाच्या साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. शैक्षणिक क्षेत्रात कुलगुरू पदापर्यंतची जबाबदारी त्यांनी पार पाडली; पण मुख्यत: ते तेलुगुत सर्वदूर परिचित आहेत कवी म्हणूनच. त्यांच्या कवितेचा सन्मान देशभर वेगवेगळ्या पुरस्कारांनी झाला. ‘भारतीय भाषा परिषद, कोलकाता’च्या भिलवाडा पुरस्कारापासून ते केरळच्या कुमारन आसन पुरस्कारापर्यंत अनेक सन्मान त्यांच्या कवितेला लाभले. भारत सरकारनंही पद्माश्री, पद्माभूषण देऊन त्यांचा गौरव केला. जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांनी भारतीय कवितेचं प्रतिनिधित्व केलं. या साऱ्या लौकिक यशाच्याही वर त्यांच्या कवितेचा माथा उजळ दिसतो कारण ती माणसाच्या थोरवीचं गुणगान करणारी आहे. माणूसपणाला जोजावणारी आहे. एकाच वेळी मुक्त छंद आणि गेय कविता अशा दोन्ही प्रकारात ‘सिनारे’ यांनी विपुल लिहिलं आहे. तेलुगु सिनेसृष्टीत त्यांची अनेक गाणी गाजली. ‘गुलेबकावली कथा’ या सिनेमाद्वारे त्यांनी गीतकार म्हणून पहिलं पाऊल टाकलं. ‘इंकेन्नालू’ हा त्यांचा गीतकार म्हणून शेवटचा चित्रपट. १९६२ ते २०११ अशी त्यांची गीतलेखनाची प्रदीर्घ कारकीर्द राहिली. केवळ त्यांच्या गीतामुळेही अनेक चित्रपट लोकप्रिय झाले. आजही तेलुगु भाषेत त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेल्या गाण्यांची संख्या सुमारे तीन हजारांवर आहे. त्यांच्या कवितेवर ज्यांनी संशोधन केलं त्यांना ‘सिनारे’ यांच्या कवितेत शैलीचे १८ प्रकार आढळल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. या काव्य प्रवासाचं सार त्यांच्याच कवितेतल्या या काही ओळीत आहे.

नडाका नाथल्ली

परुगु नाथांदरी

समता ना भाषा

कविथा ना स्वासा

(मराठीत अर्थ : गती ही माझ्या काव्य प्रवासातली आई आहे. प्रयाण जणू पिता आहे. माझी भाषा समतेची आहे आणि या प्रवासात कविता हाच माझा श्वास आहे) कविता ही सार्वभौम अशा प्रकारची गोष्ट आहे. काळ, भूगोल, जात, धर्म असे सर्व भेद ओलांडून ती पोहोचत असते. हा रस्ता दगडधोंड्यांनी भरलेला आहे पण त्यावरचा प्रवास मात्र आनंददायी आहे असं ‘सिनारे’ यांनी सांगून ठेवलं आहे.

लिहिणं, वाचणं आणि कवितेत जगणं या तिन्ही क्रिया अतिशय उदात्त आहेत. कविता हीच कवीच्या अस्तित्वाची खरी ओळख आहे. कवितेहून वेगळं असं त्यांचं अस्तित्व असत नाही हे सांगणाऱ्या ‘सिनारे’ यांच्या एका कवितासंग्रहाचं नावच मुळी ‘कविथा ना चिरुनामा’ असं आहे. त्याचा अर्थ होतो, ‘कविता हाच माझा पत्ता आहे’.

एका अर्थानं कवितेतून प्रगतिशील मानवतावादाचीच मी वकिली करतो, अशी या कवीची भूमिका आहे. केवळ माणसाच्या उत्थानाचं काव्य असलेली ‘विश्वंभरा’ ही दीर्घ कविता म्हणजे मानवोपनिषद असल्याचं ‘सिनारे’ यांनी म्हटलंय. माणूस हाच या कवितेचा नायक. माणसाची ही कहाणी अनेक नावं आणि तारखांमध्ये विभागलेली आहे. जगातले काही महापुरुष, त्यांनी सांगितलेले सिद्धान्त या कवितेच्या केंद्रस्थानी येतात. निसर्ग सुंदरच आहे. तो माणसापेक्षाही शक्तिशाली आहे पण बुद्धी आणि कल्पनेच्या जोरावर माणसानं या पृथ्वीवर खूप काही करून ठेवलंय. या प्रगतीत माणसाचा वाटा मोठा आहे, हा विचार ही कविता मांडते. माणूस हा आपल्या पटलावर जग बदलण्यासाठी संघर्षरत आहे. जणू आकाशाला तो आपला मुकुट म्हणून आकार देत आहे. माणूस हाच सूत्रधार आहे, असंही ही कविता सांगते.

‘सिनारे’ यांच्या कवितेत माणसाचं प्रतिबिंब हे सकारात्मक आणि आशावादी आहे. ‘या निसर्गाच्या परिवेशात माणूस भले छोटा असेल पण तरीही त्यानं अंतराळावर विजय मिळवला आहे. हवा, पाणी, प्रकाश यांना नियंत्रित केलंय. त्यासाठी तो सतत प्रयत्नरत आहे. या प्रयत्नात माणूस हरतही असेल, पण तो पुन्हा नव्यानं उभा राहतो. माणसाचं जाणं हे त्याच्या शरीराचं असतं, तो देहानं जरी नष्ट होत असला तरी त्याच्या कल्पनांचा मात्र अंत होत नाही, त्या जिवंतच असतात. काळ आणि अवकाश या दोहोंवर सतत विजय मिळवत त्याचं बहुआयामी असणं माणसानं सदैव दाखवून दिलंय’ असं ‘सिनारे’ म्हणतात. नव्या युगाचं जेव्हा तोरण बांधलं जातं तेव्हा जीर्णमतवादी अस्वस्थ होतात. त्यांना उजेडापेक्षा अंधारच बरा वाटू लागतो. पण अशांच्या वाटण्यानं काही होत नाही. सूर्य उजाडणारच असतो असं सांगणारी त्यांची एक कविता आहे. ‘कविता मेरी सांस’या अनुवादित कविता संग्रहातल्या त्या कवितेचा आशय असा आहे, ‘पूर्वेला उजाडल्यानंतर, नवी प्रभा प्रज्वलित झाल्यानंतर लटपटण्याने काहीच होणार नाही. बिळात घुसल्यानेही स्वत:ला वाचवता येणार नाही. सकाळ तर होणारच आहे. सत्याचा जन्मही होणारच आहे. नवा न्याय अवतरणारच आहे.’ आणखी एका कवितेत ते म्हणतात, ‘देशाचा नकाशा मी आज रेखाटलाय. समुद्र हे चरण, झाड म्हणजे हात, नद्या जणू धमन्या, पर्वत म्हणजे स्नायू, फुलं म्हणजे आशा- आकांक्षा, वाफ म्हणजे श्वास, सारं काही आहे पण मग हृदय कुठंय ? थांबा, ऐका, ते आहे दवाखान्यात’ …अशी ही सिनारे यांची कविता!