कलाकाराला भाषेचे बंधन नसते. देशभरातून कुठल्याही प्रांतातून आलेला कलाकार मग तो गायक असो, संगीतकार असो वा नट असो… सुरुवातीच्या संघर्षानंतर त्याचे पाय आपोआपच मुंबईत हिंदी चित्रपट उद्याोगाच्या दिशेने वळतात. हिंदीत गायक म्हणून नावलौकिक कमावल्यानंतरही आपल्या मूळ मातीशी जोडलेले राहण्याचा, गायक म्हणून आसामी आणि अन्य भाषा-बोलीभाषांतील गाणी गात प्रेक्षकांनाही आपल्याशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न झुबिन गर्ग यांनी आयुष्यभर केला.

कलावंताला रसिकांच्या हृदयात खरे स्थान असते आणि म्हणूनच सिंगापूरमध्ये आकस्मिक अपघाती निधन झाल्यानंतर प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे पार्थिव जेव्हा गुवाहाटीतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा तिथे जमलेल्या त्यांच्या शेकडो चाहत्यांनी त्यांचेच ‘मायाबिनी रतीर’ हे आसामी गाणे गाऊन त्यांना मानवंदना दिली.

झुबिन यांनी गायनाचे धडे अगदी लहान वयात आपल्या आईकडूनच गिरवायला सुरुवात केली होती. त्यांच्या आईने हौसेखातर संगीत-शिक्षण घेतले होते, तर वडील सरकारी सेवेत असले तरी टोपणनावाने कविता करत असत. शब्द, सूर आणि ताल या तिन्हींचा वारसा त्यांना मिळाला होता. त्यामुळे केवळ गायक नव्हे तर उत्तम वादक, तालवादक, गीतकार, संगीतकार, अभिनेता अशी बहुआयामी ओळख त्यांनी निर्माण केली होती. अकरा वर्षं त्यांनी पंडित रॉबिन बॅनर्जी यांच्याकडून तबलावादनाचे शिक्षण घेतले. त्यांचे दुसरे गुरू रमाणी राय यांनी झुबिन यांना लोकसंगीताची ओळख करून दिली.

वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी एकट्याने यूथ फेस्टिव्हलमध्ये पाश्चिमात्य संगीताचा कार्यक्रम सादर केला, त्यासाठी त्यांना सुवर्णपदक मिळाले. या पुरस्काराने त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि मग त्यांनी आसामी भाषेत पहिला गाण्यांचा अल्बम प्रदर्शित केला. १९९० साली झुबिन यांनी हिंदी चित्रपट संगीतात काम करण्यासाठी मुंबई गाठली. ‘चांदनी रात’ हा पहिला हिंदी गाण्यांचा इंडिपॉप अल्बम प्रदर्शित केला. त्यानंतर काही रिमिक्स गाण्यांबरोबरच ‘गद्दार’, ‘दिल से’, ‘डोली सजा के रखना’, ‘फिजा’, ‘काँटे’ अशा हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी गायली.

हिंदीबरोबरच आसामी आणि बंगाली चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी गायली. आसामी, बिहू, मणिपुरी, दिमासा अशा विविध बोलीभाषा आणि मराठी, संस्कृत, तमिळ, उडिया, सिंधी, तेलुगू, भोजपुरी, नेपाळी अशा ४० भाषांत त्यांनी गायलेली गाणी आहेत. बहुभाषिक गायन हे जसे झुबिन यांचे कौशल्य होते, तसेच तालवादन क्षेत्रातही त्यांनी अमाप नावलौकिक कमावला होता. तबला, हार्मिनियम, ड्रम, ढोल, गिटार, मेंडोलिन, आनंदलहरी, दोतारा अशा अनेक पारंपरिक आणि आधुनिक वाद्यांचे वादन करण्यात ते निपुण होते.

लाइव्ह कार्यक्रमांमध्ये सादरीकरण, तेही बिहू, आसामी कार्यक्रमांवर त्यांनी अधिक भर दिला होता. अनेकदा हिंदी चित्रपटसृष्टीत गायक म्हणून नावलौकिक कमावल्यानंतर आणि स्थिरस्थावर झाल्यानंतर मूळ भाषेशी नाळ जोडलेली राहात नाही. झुबिन यांनी मात्र आपल्या भाषेशी, मायभूमीशी असलेले नाते कायम ठेवत अन्य भाषांमध्येही आपल्या कलागुणांचा विस्तार केला. त्यांची ही बहुपेडी प्रतिभा फारशी प्रसिद्धीच्या झोतात आली नसली तरी त्यांच्या मायभूमीतील- आसामातील चाहत्यांनी मात्र त्यांच्या या कलावंतावर निस्सीम प्रेम केले.